computer

सोशल मिडियाचे स्टार: विद्या वोक्सची हॉलीवूड-बॉलीवूड गाण्यांची मॅश-अप्स कधी ऐकली आहेत?

हॉलीवूड गाणी हिंदी बॉलीवूड गाण्यांचं मॅश-अप मिक्स ऐकलंय? विद्या वोक्सने केलेली मॅश-अप्स ऐकली आहेत? तिचं कबीरा आणि क्लोझरचं मॅश-अप ऐकलंय? हे जर सगळं ऐकलं नसेल तर नक्की ऐकाच.

संगीतात वेगवेगळे प्रकार आणि प्रयोग होत असतात. त्यातले काही लोकांना रुचतात तर काही भलतं 'फॅड' म्हणून विसरले जातात. हाताशी यु-ट्यूब असल्यानं असे प्रयोग लोकांपर्यंत पोचतात आणि चांगल्या कामाची वाहवा तर होतेच. अशीच वाहवा होतेय विद्या वोक्सची.

 

विद्या वोक्स हे नाव यु ट्यूबवर चांगलेच लोकप्रिय आहे. वेगळ्या धाटणीची गाणे गाण्यासाठी प्रसिद्ध असलेली विद्या आज यु ट्यूबच्या माध्यमातून बॉलिवूड गायकांइतक्याच तोलामोलाची आहे. आजच्या घडीला तिचे ७.४५ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. पण तिच्या यशाचा हा प्रवास सोपा नव्हता.

तिचे मूळ नाव आहे विद्या अय्यर! ती लहान असताना कुटुंब अमेरिकेत शिफ्ट झाले, तशी तीही अमेरिकन झाली. आता काही गोष्टी या लहानपणीच दिसून येतात. या पोरीला संगीताची आवड होती. भरीसभर तिची मोठी बहीण कर्नाटकी संगीत शिकत असल्याने ही पण तिच्या सोबत बसत असे. सध्याच्या जमान्यात एक वेगळी आयडिया माणसाचे करियर सेट करू शकते. विद्याचा छंद तिला चांगलाच फायद्याचा ठरला. तो म्हणजे हॉलीवूड गाण्यांना बॉलिवूड गाण्यांमध्ये मिक्स करण्याचा. ही आवड भविष्यात तिचे करियर घडवणार आहे. आपली गायनाची आवड जोपासण्यासाठी सुरुवातीला तिने अमेरिकन म्युझिशियन शंकर टकर सोबत काम सुरू केले. शंकर सोबत तिने अनेक वाद्य वाजवायला शिकून घेतले.

अनेक मुलामुलींच्या आयुष्यात येतो तसा फेज आता तिच्याही आयुष्यात आला. तो म्हणजे गायनात लक्ष केंद्रित करावे की आपले शिक्षण बघावे. तिला डॉक्टर व्हावे म्हणून सगळीकडून दबाव होता. पण शेवटी तिने निर्णय पक्का केला. तिने थेट मुंबई गाठली. इथे येऊन तिने भारतीय संगीतकारांकडून शास्त्रीय संगीत शिकून घेतले.

२०१५ साली ती पुन्हा अमेरिकेत परतली. तिने आता आपली जुनी आवड जोपासण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने प्लॅटफॉर्म म्हणून यु ट्यूब निवडले. पूर्ण तयारीनिशी ती यात उतरली. यात तिच्या कुटुंबाने पण तिला पुरेपूर पाठिंबा दिला. २०१५ साली सुरू झालेलं चॅनेल अल्पावधीतच लोकप्रिय ठरलं.

२०१७ साली गुगलने एक सर्व्हे केला होता. यात विद्या वोक्स टॉप टेन कंटेंट क्रिएटर्सपैकी एक होती. तिच्या गाण्याचा भन्नाट अंदाज यामुळे ती लोकप्रिय असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले होते. तिच्या गाण्यांना आजवर १०० कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हे झाले तिचे करियरबद्दल. पण सामाजिक कामांमध्येही तिचा चांगलाच पुढाकार असतो. तिच्या यु ट्यूब कमाईचा आणि लाईव्ह शोजचा मोठा हिस्सा हा गरीब रुग्णांच्या खर्चासाठी आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च होतो.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required