computer

गर्भावस्थेतल्या बाळाचा अल्बम!! जाणून घ्या कुणी, कसा आणि कुठे हा प्रयोग केला आहे..

अनेक कलाकार आपल्यातील गुण दर्शवण्यासाठी संधी कधी मिळेल याची वाट पाहत असतात, तर कधीकधी संधीच काही कलाकारांची वाट पाहत असते. अवघ्या सव्वा वर्षाच्या वयात पहिला म्युझिक अल्बम प्रसिद्ध करणाऱ्या ल्युकाबद्दल वाचल्यानंतर तुम्हीही हेच म्हणाल.

हो बरोबर वाचलेत. बालकलाकार म्हणून झळकण्याची संधी तर अनेकांना मिळते. परंतु अवघ्या पंधरा महिन्याच्या वयात अल्बम प्रसिद्ध करणारी कदाचित ल्युका युपांक्वी ही जगातील पहिलीच कालकार असेल. नव्हे आहेच.

२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणाऱ्या या म्युझिक अल्बमचे नाव आहे “साउंड ऑफ अनबॉर्न”. पंधरा महिन्याची असताना जर या छोट्या कलाकाराचा अल्बम प्रसिद्ध होत असेल तर हा अल्बम रेकॉर्ड कधी केला गेला असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

तर ल्युका युपांक्वीचा हा अल्बम तिच्या गर्भावस्थेत रेकॉर्ड करण्यात आला आहे. तिची आई एलिझाबेथ हार्ट आणि बाबा इव्हान दियाज मेथ हे दोघेही संगीतकार आहेत. हा अल्बम रेकॉर्ड करण्यात आला तेंव्हा ल्युका तिच्या आईच्या पोटातच होती. बायोसोनिक एमआयडीआय (MIDI) तंत्राचा वापर करून गर्भाचा आवाज रेकॉर्ड करण्यात आला आहे. एलिझाबेथच्या गर्भाशयावर एमआयएसआय यंत्रे लावण्यात आली आणि पाच भागात हे रेकॉर्डिंग पूर्ण करण्यात आले. प्रत्येकवेळी रेकॉर्डिंगसाठी सुमारे तासभर तरी वेळ द्यावा लागायचा.त.

हे रेकॉर्डिंग करण्यासाठी एलिझाबेथच्या गर्भाशयावर लावण्यात आलेले इलेक्ट्रोड्सच्या सहाय्याने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इम्प्लसेस मोजण्यात आले आणि एमआयडीआय तंत्राच्या सहाय्याने हे इम्प्ल्सेस सिंथेसायझरवर टाकण्यात आले. सगळा खेळ खरे तर तंत्रज्ञानाचा आहे. एलिझाबेथने यापूर्वी  याच तंत्राचा वापर करून प्राणी आणि झाडांतील संगीत सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तिने गर्भाचे संगीत ऐकण्याच्या आणि इतरांनाही ऐकवण्याचा एक अनोखा प्रयोग केला आहे.

गर्भाचे संगीत या शब्दातच कितीतरी आनंदाचे तरंग लपल्याचा भास होतो. ल्युकाचे हे संगीत म्हणजे मानवी संगीत नाही तर हे अशा जीवाचे संगीत आहे जे अजून पूर्णत्वास पोहोचले नव्हते. मन, तर्क-वितर्क, प्रभाव आणि मानवी संवेदना या सगळ्यांच्याही अलीकडचे हे संगीत आहे. म्हणूनच याला एलिझाबेथने अजन्मेय म्हटले आहे. या अल्बम मधील अनेक ध्वनींची पुनरावृत्ती टाळली आहे. विशेष म्हणजे तिचा तो गर्भित आवाज स्पष्ट एकता यावाआणि तो इतर ध्वनित मिसळून जाऊ नये म्हणून त्यांनी याला इतर संगीत जोडलेले नाही. हा आवाज विकसित होत जाताना आपल्याला जाणवतो.

हे रेकॉर्डिंग जरी ल्युका गर्भावस्थेत असताना केले असले तरी, तिच्या जन्मानंतर याचे मिक्सिंग करण्यात आले. ल्युकला जेंव्हा तिचे रेकॉर्डिंग ऐकवले तेंव्हा ती अगदी आश्चर्याने आपल्या आई-बाबांच्याकडे पाहत होती. जणू तिला सांगायचे होते हा आवाज माझा आहे. वेगवेगळ्या भागात रेकॉर्ड केलेले हे संगीत मिक्सिंग करताना ल्युकालाही आश्चर्य वाटत होते आणि ते तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. बाल्यावस्थेतचा आई-बाबांचे बोट धरून तिने हा संगीताच्या दुनियेतील एक अद्भुत प्रवास सुरु केला आहे. ल्युकाच्या या पहिल्यावहिल्या आणि आगळ्यावेगळ्या अल्बमला रसिकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणेही औत्सुक्याचे ठरेल.

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलाला हा प्रयोग मानवी कलेला एक वेगळे परिमाण देणारा ठरेल हे मात्र निश्चित.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required