computer

वयाच्या केवळ २१ व्या वर्षी हॉलीवुडला पोहचलेला नवा भारतीय चेहेरा -केबीएस काश्यप !

तब्बल दोन वर्ष बंद असलेले सिनेमा थेटरं आता सुरू झाली आहेत. दर्जेदार चित्रपट बघणार्‍या  प्रेक्षकांची हौस भागवणारा 'स्पायडरमॅन नो वे होम' हा सिनेमा थेटरमध्ये लागला आणि थेटर हाऊसफुल्ल झाले. मार्व्हलचा सिनेमा त्यातही स्पायडरमॅनच्या पुनरागमनाची ताणून धरलेली उत्सुकता यामुळे 'स्पायडरमॅन नो वे होम' चांगलाच ब्लॉकबस्टर ठरला आहे. 

स्पायडरमॅनच्या या नव्या सिनेमाच्या जाहिरातीसाठी म्हणजे टिव्हीवरच्या जाहिरातीसाठी जे संगीत वापरण्यात आले ते एका भारतीयाने दिले आहे.या ट्रॅकचे नाव आहे 'स्टार्ट द मशिन' एका अर्थाने हे एका भारतीयाचे हॉलीवुड्मधील पदार्पण आहे.एखादा भारतीय अभिनेता किंवा अभिनेत्री हॉलीवुडमध्ये पदार्पण करतात तेव्हा त्याची किती किती चर्चा होते. पण एवढ्या मोठ्या बॅनरच्या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी  म्युझिक देणारी व्यक्ती कुणी फेमस चेहरा नाही. विशेष म्हणजे हा पठ्ठ्या फक्त २१ वर्षांचा आहे. हे सांगताना तो म्हणतोय So PROUD to share that my track “Start the Machine” has been used in “Marvel’s SPIDER-MAN: NO WAY HOME” TV SPOTS!! 


केबीएस कश्यप असे या पोराचे नाव आहे. त्याचे स्टेजवरील नाव हे KASYAP असे आहे. त्याने स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवर स्पायडरमॅनसाठी वापरण्यात आलेले 'स्टार्ट द मशीन'हा ट्रॅक त्याने तयार केले असल्याची माहिती दिली आहे. कश्यप हा अष्टपैलू म्हणावा असा कलाकार आहे.

हा भाऊ जेव्हा सहा वर्षांचा होता तेव्हा त्याने पियानो हातात घेतला आणि त्याचा संगीतासोबतचा प्रवास सुरु झाला.त्यानंतर त्याने अनेक गिटार आणि इतर प्रकारची वाद्ये शिकून घेतली. तो गाणी गातो, गाणी लिहितो, तसेच त्यांना संगीत देण्याचे कामही करतो. हे सर्व त्याने २१ वर्ष वयात केले आहे. 

त्याचे आदर्शही साधेसुधे नाहीत, ए आर रहमान, ब्रुनो मार्स,  जस्टीन टिम्बरलेक हे त्याचे आदर्श. बरे स्पायडरमॅन हा काही त्याचा पहिलाच प्रोजेक्ट नाही. याआधी त्याने साहो, असुरन, अंतरिक्षम या सिनेमांसाठी म्युझिक असिस्टंट म्हणून काम बघितले आहे. 

स्पायडरमॅनचा हा चित्रपट या मुलाच्या हॉलिवुड करियरची सुरुवात आहे.. कलेच्या माध्यमातून  माणूस सर्व बंधने ओलांडून सातासमुद्रापार झेप घेऊ शकतो हे कश्यपने या निमित्ताने सिद्ध केले आहे. भविष्यात या भारतीय चेहऱ्याने हॉलीवुड गाजवावे यासाठी त्याला बोभाटाकडून शुभेच्छा...
 

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required