computer

फोटोस्टोरी: दोन महत्त्वाच्या व्यक्तींच्या जगप्रसिद्ध फोटोंमागची गोष्ट!!

प्रसिद्ध व्यक्तींचे अनेक फोटो इंटरनेटवर सापडतात, पण त्यातला एखादा फोटो सर्वात अधिक प्रसिद्ध असतो. आज आम्ही जगातल्या दोन प्रसिद्ध व्यक्तींच्या फोटोबद्दल बोलणार आहोत. या दोन व्यक्तींचे हे दोन फोटो जगभरात सर्वत्र वापरले जातात, पण त्या फोटोंच्या मागची गोष्ट अगदीच कुणाला ठाऊक असेल. आजच्या फोटो स्टोरीमध्ये आपण त्या दोन फोटोंबद्दल जाणून घेणार आहोत.

या दोन व्यक्ती म्हणजे विन्स्टन चर्चिल आणि महात्मा गांधी. सुरुवात करूया विन्स्टन चर्चिल यांच्यापासून. विन्स्टन चर्चिल यांचा हा फोटो तुम्ही अनेक ठिकाणी बघितला असेल. या फोटोत दिसणारा विन्स्टन चर्चिल यांचा चेहरा जगात सगळीकडे दिसतो.
आता या फोटो मागची एक गोष्ट जाणून घेऊया. साल होतं १९४१. नुकताच पर्ल हार्बर बेटावर जपानने हल्ला करून अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धामध्ये ओढलं होतं. त्यावेळी विन्स्टन चर्चिल हे ओटावा येथे होते. ते मित्रराष्ट्रांच्या सैनिकांचे आभार मानण्यासाठी आले होते. त्यांना याची कल्पना नव्हती की त्या त्यादिवशी त्यांचा एक फोटोग्राफ घेण्यात येणार आहे. हे माहीत नसल्यामुळे त्यांनी तोंडातली सिगार काढली नाही आणि फोटोसाठी अचानक बोलावणं आल्यावर ते तसेच फोटोसाठी उभे राहिले.

फोटोग्राफर होते युसुफ कार्श. युसुफ यांनी फोटोसाठी फ्रेम सेट केल्यानंतर चर्चिल यांच्या चेहर्‍याकडे पाहिले आणि त्यांना चर्चिल यांच्या तोंडातील सिगार फोटोसाठी योग्य वाटले नाही. खरी गंमत पुढे आहे. युसुफ यांनी चर्चिल यांना सिगार काढण्याची सूचना दिली नाही. त्याऐवजी ते स्वतःच कॅमेरामागून आले आणि कोणताही विचार न करता त्यांनी चर्चिल यांच्या तोंडातील सिगार काढून घेतली. हे एवढे सहज होते की चर्चिल यांनाही काय झाले ते समजले नाही. ते आहे त्याच अवस्थेत उभे राहिले आणि फोटो घेण्यात आला. तोच फोटो पुढे जगभर वापरला गेला आणि प्रसिद्ध झाला.

युसूफ यांची सहजता पाहून स्वतः चर्चिल म्हणाले की "तुम्ही मनात आणलं तर डरकाळ्या फोडणाऱ्या सिंहालाही फोटोसाठी शांत उभे करू शकता."
 

आता वळूया दुसऱ्या फोटोकडे. फोटोग्राफर Margaret Bourke-White यांनी भारताच्या फाळणीच्या काळात खास भारतातील नेत्यांचे फोटोग्राफ्स घेतले होते. हे फोटोज टाइम मासिकात छापून आले. नाव होतं “India’s Leaders”. या सिरीजसाठी त्यांना महात्मा गांधींचे फोटो हवे होते. पण ते सोपे नव्हते. त्यांना अनेक प्रयत्न करावे लागले. शेवटी एकदाची संधी मिळाली. पण पुढचं काम तेवढं सोपं नव्हतं. गांधी रोज १ तास सूत कातायचे आणि त्यानंतर इतर कामांना सुरुवात करायचे. त्यांचा चरखा तर जगप्रसिद्ध आहे. त्या एक तासात आश्रमातील सर्वजण सूत कातायचे. हा अलिखित नियमच होता. गांधी आणि त्यांचे सहकारी सर्वांना प्रोत्साहन द्यायचे.

मार्गारेट यांच्यावर गांधींच्या अशा व्यस्त आयुष्याशी जुळवून घेऊन फोटोग्राफ्स घेण्याची जबाबदारी आली होती. हा फोटो घेतला त्यावेळी मार्गारेटनाही सूत कातण्याची सूचना देण्यात आली होती. आणि त्यांनी ते आनंदाने केलंही. मार्गारेट यांनी घेतलेला इतिहासप्रसिद्ध फोटो याच दरम्यानचा आहे. पुढे १९४८ साली गांधींचा खून झाल्यावर लाईफ मासिकाने हाच फोटो घेऊन गांधींना श्रद्धांजली वाहिली होती. सोबत एक ओळ देण्यात आली होती - “India Loses Her ‘Great Soul,'”.
तर अशा या दोन फोटोंच्या दोन कथा. क्यूबन क्रांतिकारक चे गेव्हारा याच्या जगप्रसिद्ध फोटोचा असाच किस्सा इथे वाचा. आणि हो, हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.

सबस्क्राईब करा

* indicates required