आपले लाडके 'सुशि' आणि आपली आवडती 'दुनियादारी' !!
आता चाळीशीच्या घरात पोहोचलेल्या एका पिढीचे सुशि हे एक लाडके दैवत होते. जेव्हा घराघरात टीव्ही चॅनेल्सचा सुळसुळाट झाला नव्हता आणि सपक, कंटाळवाण्या मालिकांचा भडीमार होत नव्हता तेव्हा या पिढीचा क्वालीटी टाईम (संध्याकाळ) सुशिंच्या सोबत नाक्या-नाक्यावर जायचा. सुशिंच नवीन पुस्तक ज्यांनी वाचलं नाही तो इसम ‘बावळटेस्ट’ समजला जायचा. सुशिंच्याच शब्दात सांगायचं झालं तर “पुण्यापासून गोव्यापर्यंत आणि पुण्यापासून नागपूरपर्यंत मी चालत गेलो तर प्रत्येक गावात मला माझा चाहता भेटेल. मला हॉटेलात जेवावं लागणार नाही.”
वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या ' दुनियादारी ' या पहिल्याच कादंबरीला भरपूर लोकप्रियता लाभली आणि लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांची लेखन शैली प्रसन्न, खेळकर होती. छोट्या छोट्या सुटसुटीत वाक्यरचना, बोली भाषेचा भरपूर वापर आणि संवादात्मक शैलीमुळं त्याचं लेखन कधीही कंटाळवाणं होत नसे. पण समीक्षक आपल्याला महत्त्व देत नाहीत, इतिहासात आपला उल्लेख हेटाळणीने केला जातो, असं त्यांना वाटत राहायचं. त्यांनी सुमारे १५० रहस्यमय कादंबऱ्या आणि कोवळिक, वास्तविक, वेशीपलीकडे, यांसारख्या ७१ लोकप्रिय कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. याशिवाय ११ कथासंग्रह, पाच नभोनाट्ये आणि विविध वृत्तपत्रांत त्यांनी विपुल लेखनही केले. दुनियादारी ' या कादंबरी वर चित्रपट आला व त्याला तुफान लोकप्रियता लाभली. मा. सुहास शिरवळकर यांचे ११ जुलै, २००३ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडून मा. सुहास शिरवळकर यांना आदरांजली.
लेखक - संजीव वेलणकर, पुणे.






