'खूब लड़ी मर्दानी' : झाशीच्या राणीची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर....टीझर पाहून घ्या !!

‘मनिकर्णिका’ म्हणजे आपल्याला सर्वांना माहित असलेली ‘झाशीची राणी लक्ष्मी बाई’. १८५७ च्या युद्धात पुरुषांनाही लाजवेल अशा शौर्याने लढलेली. शेवटी लढतालढता देशासाठी प्राणार्पण करणारी रणरागिणी.

या भारताच्या वीरांगनेवर एक भव्यदिव्य सिनेमा येतोय. ज्याचं नाव आहे ‘मनिकर्णिका – दि क्वीन ऑफ झांसी’. कंगना राणावत झाशीच्या राणीच्या भूमिकेत आहे. कंगना राणावत मुख्य भूमिकेत म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सिनेमाच्या टीझर वरून तरी सिनेमा तितका वाईट नसेल असंच दिसतंय.

ऐतिहासिक सिनेमा म्हटलं की चित्रपटात एक व्यक्ती हमखास असते - “अमिताभ बच्चन”. गंभीर आवाजात प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेत प्रवेश करून द्यायला अमिताभ तात्यांपेक्षा बेष्ट कोण असेल ? लगानची सुरुवात आठवा भौ. मनिकर्णिकाच्या टीझरची सुरुवात त्यांच्याच आवाजात होते.

आता अमिताभ बच्चन यांच्या आवाजातल्या ओपनिंगचा कंटाळा आला असला तरी बाकी टीझर अफलातून वाटतो. आपल्यातील अनेकांना अंगावर काटा येण्याचा ‘फील’ देखील येईल राव. आणखी बारकाईने बघितलं तर काही दृश्य हे चक्क भंसाली छाप वाटू शकतात. VFX चा बऱ्यापैकी वापर केलाय. हा आता कंगना तोतरी बोलते हे इथेही आहेच. हरहर महादेवचा ‘हलहल महादेव’ झालाय. पण तिने भूमिकेसाठी घेतलेली मेहनत प्रत्येक सीन मध्ये दिसून येते.

एकंदरीत ऐतिहासिक चित्रपटांच्या रांगेत आपलं भक्कम स्थान मिळवण्यापुरती जादू चित्रपटात नक्कीच असेल असं आपण म्हणू शकतो.

चला तर आता टीझरवर तुमची प्रतिक्रिया द्या.

सबस्क्राईब करा

* indicates required