computer

'आई कुठे काय करते?' मालिकेने भारतीय टिव्ही इतिहासात एक नवीन रेकॉर्ड केला आहे... काय घडलंय?

मराठी मालिका म्हणजे महाराष्ट्रात कुठल्याही घरात जिव्हाळ्याचा विषय. स्त्रिया आणि मालिका यावर जरी अनेक विनोद केले जात असले तरी घरात रात्री सगळेजण एकत्र बसून मालिका पाहतात. भले त्या आवडो न आवडो, टिव्हीवर त्या आवर्जून चालू असतात. स्त्रियांना तर मालिकेतील पात्रं अगदी जवळची वाटतात. त्यामुळेच या मालिका बहुतांश महिलाप्रधान असतात. सध्या 'आई कुठे काय करते' ही मालिका छोटा पडदा गाजवतेय. मालिकेचा विषय, दर्जेदार लिखाण, उत्तम दिग्दर्शन आणि या सर्वाला न्याय देणारा कलाकारांचा कसदार अभिनय यामुळेच या मालिकेने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे.

२५ वर्ष संसाराचा गाडा अगदी मनापासून हाकणाऱ्या अरुंधती देशमुखची कहाणी यात मांडली आहे. मुलांचं संगोपन, सासू-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर हिने ही भूमिका केली आहे.

या मालिकेचे अजून एक विशेष म्हणजे या मालिकेचे एकाच वेळी सात भाषेत प्रक्षेपण होत आहे. हे टीव्ही इतिहासात पहिल्यांदाच घडत असावे. ही मूळ बंगाली मालिका आहे. श्रीमोयी या नावाने स्टार जलसावर ही बंगाली भाषेत १९ जून २०१९ पासून सुरू आहे. तिचे लेखन लीना गंगोपाध्याय यांनी केले आहे. लीना गंगोपाध्याय हे टॉलीवुड चित्रपट सृष्टी म्हणजेच बंगाली भाषिक सिनेसृष्टीत एक प्रसिद्ध नाव आहे. त्या लेखिका, निर्माता आणि दिग्दर्शकही आहेत.त्यांनी अनेक लोकप्रिय मालिका लिहिल्या आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामांमध्ये इष्टी कुटम, जोल नुपूर, बिन्नी धनेर खोई, केया पातार नौका, चोखेर तारा तूई, इच्छा नोदे, पुण्युकूर, कुसुम डोला याचे लेखन त्यांनी केले आहे. लीना गंगोपाध्याय आणि सैबल बॅनर्जी मॅजिक मोमेंट्स पिक्चर्स या प्रॉडक्शन हाऊसचे संस्थापक आहेत. 

बंगालीशिवाय ही मालिका कन्नडमध्ये इन्थी निम्मा आशा या नावाने स्टार सुवर्णा वर, मल्याळममध्ये कुडुंबविलक्कू या नावाने एशियानेटवर, तेलुगूत इन्तिती गृहलक्ष्मी या नावाने स्टार मा वर, हिंदीत अनुपमा या नावाने स्टार प्लसवर, आणि तामिळमध्ये बाकियालक्ष्मी या नावाने स्टार विजय वर चालू आहे. मराठीत या मालिकेचे लेखन मुग्धा गोडबोले यांनी केले आहे. इतर भाषेतही या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आई हा विषय काळजात हात घालणारा असतो. हा विषय नवीन नाही पण तरीही तो मांडून नव्याने मांडणे हे आव्हान असते. या मालिकेचे अनेक प्रसंग खूप गाजले. आई होणं एवढ्यातच स्त्रीचं स्त्रीत्व आहे का या विषयावर भाष्य करणारा एक प्रसंग मालिकेत सलग तीन दिवस चालला. त्याचे कौतुकही खूप झाले. या मालिकेतील ट्विस्ट ही प्रक्षेकांना आवडत आहेत!

अर्थात जसे चाहते आहेत तसेच ट्रोलर्स ही भरपूर आहेत. अनेकांना यातल्या आईचे निर्णय पटले नाहीत. पण सध्या तरी टी.आर.पी. मध्ये ही मालिका अव्वल आहे. टीव्हीला OTT ची जोरदार टक्कर असणार आहे. नवी पिढी वेबसिरीज,चित्रपट पाहणे जास्त पसंद करते. त्यामुळे मालिकांमध्ये नवनवीन प्रयोग होणार आहेत. जर दर्जेदार असेल ते प्रेक्षक नक्कीच आवडीने पाहतील. 'आई कुठे काय करते' ही मालिका सात भाषेत प्रक्षेपण करणे म्हणजे एक नवीन प्रयोगच आहे. येणाऱ्या काळात या मालिकेला पुढे कसा प्रतिसाद मिळतो हे पाहाणं रंजक ठरेल.

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required