computer

'हम रहे या ना रहे कल' म्हणणाऱ्या केकेची ही टॉप गाणी तुम्हालाही मोहवून टाकतील.

आयुष्य कधी दगा देईल याचा भरोसा नाही. कोरोनाच्या काळात तर आपण याचा खूप जवळून प्रत्यय घेतलेला आहे. पण, काल प्रसिद्ध गायक केके म्हणजेच कृष्णकुमार कुन्नाथ याच्या अकस्मात जाण्याने पुन्हा एकदा या क्षणभंगुरतेची प्रकर्षाने जाणीव झाली. आपल्या आवडत्या गायकाने अवघ्या ५३ व्या वर्षी आयुष्याच्या रंगमंचावरून अशी कायमची एक्झिट घेणे अनेकांच्या पचनी पडलेलं नाही. त्याच्या चाहत्यांसह सबंध बॉलीवूडलाच या घटनेने शोकसागरात लोटले आहे.

हिंदी, तेलगु, मल्याळम, पंजाबी, कन्नड आणि तमिळ अशा वेगवेगळ्या ११ भाषांतून आपल्या गायकीची छाप सोडणारा हा कलाकार असा चटका लावून जाईल अशी कल्पनाही करवत नाही. केकेची गाणी अफाट लोकप्रिय झाली. त्याचा चाहता वर्गही मोठा होता तरीही त्याने स्वतःला बॉलीवूडच्या झगमगाटापासून दूरच ठेवले होते. त्याला प्रसिद्धीचा सोस नव्हता. त्याची गाणी म्हणजे ९० च्या दशकातील तरूणाईच्या भावभावनांचे मूर्तिमंत प्रकटीकरण होते. अनेकांना हा आवाज आणि हे गाणे फक्त आपल्याच साठी आहे असे वाटत राहायचे म्हणूनच केके हे नाव अनेकांच्या हृदयात बंदिस्त झाले होते. आज त्याच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांच्या मनातील या भावना ओसंडून वाहत आहेत. केके म्हणजे ९०च्या दशकातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला होता. त्याच्या प्रेमाखातर आम्ही ही आज त्याची अत्यंत गाजलेल्या दहा गाण्याची यादी इथे देत आहोत. ही गाणी तुम्हालाही नक्कीच आवडली असतील.

  1. कल याद आयेंगे ये पल –

आयुष्याच्या अस्थिरतेच समर्पक वर्णन करणाऱ्या या गाण्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. केकेच्या पल अल्बममधील बहुतांश गाणी हिट ठरली. त्याचा पल अल्बम लोकांना आजही आवडतो. यातले यारों हे मैत्रीवर बेतलेले गाणे आजही तितक्याच आवडीने ऐकले जाते.

योगायोग असा की हेच गाणं त्यानं लाइव्ह कन्सर्ट मधील शेवटचं गाणं ठरलं.

२. हम दिल दे चुके सनम - 'तडप तडप के'

ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप तडप के' या गाण्याने लोकांना वेड लावले होते. या गाण्याची क्रेझ आजही कायम आहे. त्या गाण्यातले बोल केके यांनी इतके खोलवर गायले की ते गाणे ऐकून नायकाला झालेले दुःख जाणवत राहतं.

फक्त रोमँटिकच गाणी नाही, तर आणि अशी ब्रेक-अप गाणीही गाऊन केके यांनी आपलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध केलं.

३. 'बचना ए हसीनो' - 'खुदा जाने'

रणबीर कपूरच्या 'बचना ए हसीनो' या चित्रपटातील 'खुदा जाने' या लोकप्रिय गाण्यात केकेच्या आवाजाने जादू निर्माण केली. हे गाणे रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. त्याकाळात संगीतविश्वात ते गाणे बराच काळ पहिल्या क्रमांकावर राहिले आहे.

४.काईट' - 'जिंदगी दो पल की'

केकेने गायलेले हृतिक रोशनच्या काइट चित्रपटातील 'जिंदगी दो पल की' हे गाणे एक रोमँटिक गाणे आहे. यातल्या प्रेमाच्या भावना खूप सुंदर गायल्या आहेत. हे गाणे हृतिक रोशन आणि बार्बरा मोरी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते.

५.तुम मिले' - 'दिल इबादत'

इमरान हाश्मी आणि सोहा अली खान यांच्यासोबत असलेले 'दिल इबादत' हे गाणे केकेच्या जादुई आवाजाने रोमँटिक गाण्याची एक वेगळी ओळख आहे. याच चित्रपटातले तुम मिले हे गाणेही खूप गाजले होते.

६. 'जन्नत' - 'जरा सी'

रोमँटिक गाण्यांवर केकेची खास पकड होती.. २००८ मध्ये त्यांनी गायलेल्या 'जरा सी' या रोमँटिक गाण्याने केवळ रोमँटिक गाण्यांमध्येच नाही तर संगीताच्या जगात एक नवा विक्रम केला. या गाण्याला यूट्यूबवर ६०००००००हून अधिक लोकांनी लाइक केले आहे.

७- दिल चाहता है - 'कोई कहे'

२००१ मध्ये दिल चाहता है चित्रपटाने खूप रेकॉर्डस मोडले. या चित्रपताटली गाणीही गाजली. तीन मित्रांवर असलेल्या कोई कहे या गाण्यात केकेचाही आवाज आहे.

८- 'बजरंगी भाईजान' - 'तू जो मिला'

सलमान खानच्या बजरंगी भाईजान चित्रपटातील 'तू जो मिला' हे गाणे आजही लोकांच्या हृदयात आहे. केकेच्या आवाजातले हे गाणे ऐकणाऱ्याला भावूक करते.

९- 'दस' - 'दस बहाने कर ले गये दिल'

'दस बहने कर ले गये दिल' या मल्टीस्टारर गाण्यातील केकेच्या आवाजाची जादू लोकांना थिरकायला लावते. या चित्रपटापेक्षा हे गाणेच हीट ठरले होते.

१०- 'ओम शांती ओम' - 'आँखों में तेरी अजब सी'

ओम शांती ओम या चित्रपटातील दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित केलेले 'आँखों में तेरी अजब सी' हे गाणे त्यांच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. हा चित्रपट जेवढा गाजला, तेवढेच हे गाणेही गाजले.

‌केके आज आपल्यातून निघून गेले असतील, पण त्यांच्या आवाजाने ते कायम आपल्यात राहतील हे नक्की!
तुमचे यातले आवडते गाणे कोणते आहे? कॉमेंट करून सांगा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required