हॅन्सी क्रोनिए: दक्षिण आफ्रिका संघाचा हिरो ते खलनायक बनण्याची गोष्ट,आजच्याच दिवशी विमान दुर्घटनेत गमावले होते प्राण...
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हॅन्सी क्रोनिए (Hansie Cronje) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याला अधिक काळ दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व करता आले नाही मात्र त्याने आपल्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. एक फलंदाज, एक उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक म्हणून त्याने आपली छाप सोडली होती. ज्यावेळी १९९२ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले त्यावेळी तो या संघाचा एक भाग होता. १९९९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने दक्षिण आफ्रिका संघाला सेमी फायनलमध्ये पोहचवले होते. २० वर्षांपूर्वी १ जून २००२ रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. एका विमान दुर्घटनेत त्याला आपले प्राण गमवावे लागले.
हॅन्सी क्रोनिए हा त्यावेळी सर्वोत्कृष्ट कर्णधार होता. सामना कसा जिंकायचा, कुठल्या रणनीतीचा वापर करायचा हे त्याला चांगलेच माहीत होते. त्याने ५३ कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व केले. ज्यात त्याने २७ सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाला विजय मिळवून दिला. तर ११ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलिया संघाला वगळता त्याने सर्व संघाविरुद्ध खेळताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यासह त्याने १३८ वनडे सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले ज्यात त्याने ९९ सामन्यात विजय मिळवून दिला तर एक सामना बरोबरीत सुटला होता.
तर झाले असे की, २००० साली मार्च महिन्यात भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये शारजहाच्या मैदानावर त्रिकोणीय मालिका सुरू होती. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी खळबळजनक खुलासा करत म्हटले होते की, हॅन्सी क्रोनिएने काही खेळाडूंसह मिळून स्पॉट फिक्सिंग केली आहे. सुरुवातीला हॅन्सी क्रोनिएने हे आरोप फेटाळून लावले होते. परंतु नंतर त्याने युनायटेड क्रिकेट बोर्ड ऑफ साऊथ आफ्रिकाला फोन कॉल करून स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्यावर आजीवन बंदी देखील घालण्यात आली होती.
हॅन्सी क्रोनिएच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ६८ कसोटी सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले होते. ज्यात त्याने ३७१४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ६ शतक आणि २३ अर्धशतक झळकावले होते. तसेच वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर त्याने १८८ वनडे सामन्यांमध्ये २ शतक आणि ३९ अर्धशतकांच्या साहाय्याने ११२ धावा केल्या होत्या.




