या माणसाच्या ३५रुपयांच्या परताव्याच्या लढ्यामुळे जवळजवळ तीन लाख लोकांना २.४३ करोड रुपयांचा परतावा मिळाला!!

आपल्या समाजात काही लोक आपल्या हक्काचा एक रुपयाही सोडत नाहीत. एक दोन रुपयांसाठी हुज्जत घालणारे लोक बघितले की आजूबाजूचे अशा व्यक्तीला मूर्खात काढतात. पण कधीकधी अशाच लोकांमुळे इतर बऱ्याचजणांचा फायदा होतो. अशाच एका पठ्ठ्याने आधी ३५ आणि नंतर २ रुपयांसाठी चक्क सरकारसोबत लढा दिला. हा लढा तो जिंकला आणि त्याचा फायदा लाखो लोकांना झाला.

राजस्थानच्या कोटा येथील सुजीत स्वामी हे इंजिनियर असलेले गृहस्थ. सर्वसामान्य लोकांप्रमाणे नोकरी कुटुंब सांभाळत जगणारे सुजीत यांनी रेल्वे तिकीट बुक केले. हे तिकीट कॅन्सल केले असता त्यांचे ३५ रुपये कापले गेले. आपलेही असे कधीतरी पैसे कापले गेले असतील. आपण दुर्लक्ष करतो, त्यांनी मात्र पैसे सोडायचे नाहीत हा पक्का निर्णय केला.

ही गोष्ट २०१७ सालची आहे. तेव्हा जीएसटीची भानगड नव्हती. ७ एप्रिलला त्यांनी स्वर्ण मंदिर मेल या रेल्वेत कोटा ते दिल्ली तिकीट बुक केले. नंतर त्यांनी तिकीट कॅन्सल केले. या तिकिटाची किंमत होती ७६५ रुपये. त्यांचे १०० रुपये कापले जाऊन ६६५ रुपये परत देण्यात आले. नियमानुसार ६५ रुपये कापले जायला हवे होते. अधिकचे ३५ रुपये कापल्याने ते भडकले.

त्यांनी माहिती अधिकारात अर्ज केला. एक दोन नाही, तर असे ५० अर्ज त्यांनी केले. यासोबत ४ सरकारी विभागांना त्यांनी पत्र लिहिले. एवढे सगळे प्रयत्न करत असताना त्यांनी पंतप्रधान, रेल्वेमंत्री, अर्थमंत्री, जीएसटी कौन्सिल अशा सर्वांना ट्विटरवर टॅग करून हा विषय मांडला.

त्यांच्या या लढाईला अर्धवट यश आले. २०१९ साली त्यांचे ३३ रुपये परत आले. आता अजून २ रुपये अडकल्याने त्यांनी लढाई सुरूच ठेवली. मागील ३ वर्षं ते या २ रुपयांसाठी लढत होते. शेवटी त्यांना विजय मिळाला असून त्यांचे २ रुपये परत मिळाले आहेत.

आता विषय इथेच संपत नाही. देशात अशा २.९८ लाख लोकांचे ३५ रुपये अधिकचे कापले गेले होते. स्वामी यांच्या या लढाईने या प्रत्येकाला त्यांचे ३५ रुपये परत मिळाले आहेत. सरकारकडून एकूण २.४३ कोटींच्या रिफंडला मंजुरी देण्यात आली आहे.

आता तुमच्या लक्षात आले असेल सुरुवातीला जो लढा मूर्ख वाटत होता, त्याच्या फायदा इतक्या मोठया प्रमाणावर लोकांना झाला आहे. काही वेळेस विषय पैशाचा नसतो, तर नियमानुसार वागण्याचा असतो. आपल्याला माहिती अधिकारामुळे प्रचंड मोठा अधिकार मिळालेला आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required