डिलिव्हरी बॉय, ड्रायव्हर ते आयटी इंजिनिअर!! या मुलाचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे....
शिक्षण आणि नोकरी हा प्रवास करताना अनेक मुलांना तारेवरची कसरत करावी लागत असते. शिक्षण स्वस्त नाही, इतर खर्च मोठा, त्यातही कुठले क्लासेस करायचे म्हटले तर अजूनच भार. अनेकांची परिस्थिती बेताची असते. पण काही पोरं खमकी असतात. दिवसा कॉलेज आणि रात्री जॉब करतील, पण मागे हटत नाहीत. इतका सगळा अडचणींचा डोंगर पार करूनही जे यशस्वी होतात, त्यांचे कौतुक तर करायलाच हवे.
डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी अनेक मुले नोकरीसोबत इतर कुठेना कुठे तरी धडका मारत असतात असेही अनेकवेळा दिसते. तर ही गोष्ट आहे शेख अब्दुल सतार या मुलाची. विशाखापट्टणम येथे इंजिनियरिंग करत असताना पठ्ठ्या साईड बाय साईड नोकरी करून आपले शिक्षण पूर्ण करत होता. कधी झोमॅटो, कधी स्वीगी यांच्यासाठी फूड डिलिव्हरी.. तर कधी ओला उबेसाठी ड्रायव्हिंग अशी कामे करून त्याने शिक्षणाचा आणि स्वतःचा खर्च भागवला.
अब्दुलचे वडील मजूरी करतात. लवकरात लवकर कमाई सुरू करावी आणि कुटूंबाला आधार द्यावा हे इतर मुलांप्रमाणे त्यालाही वाटत होते. अशात त्याला एका मित्राने कोडिंग शिकल्यास चांगले पैसे तू कमवू शकतो असा सल्ला दिला. संध्याकाळी ६ ते अर्ध्यारात्रीपर्यंत त्याचे डिलिव्हरीचे काम सुरु असल्याने कोडिंग कसे शिकायचे असा प्रश्न त्याला पडला.
पठ्ठ्याने यातूनही मार्ग काढत आपला सकाळचा पूर्ण वेळ तो कोडिंग शिकण्यासाठी देऊ लागला. पोटातली भूक अधिकाधिक मेहनत करायला प्रेरणा देते. अब्दुल कमी कालावधीत वेब ऍप्लिकेशन बनवायला शिकला. त्याने मग काही प्रोजेक्ट केले आणि नोकरीसाठी मुलाखती सुरू झाल्या. या काळात त्याने कम्युनिकेशन स्किल्स पण शिकून घेतले होते. याचा थेट फायदा त्याला मुलाखतीत झाला.
बंगळुरूच्या एका सॉफ्टवेअर कंपनीत त्याची निवड झाली आणि रात्रंदिवस केलेल्या त्याच्या या मेहनतीचे चीज झाले. ती सांगतो की काहीच दिवसांपूर्वी अशी परिस्थिती होती की 'एक रुपया खर्च करायला, शंभर वेळा विचार करावा लागत असे. आता मात्र इतका पगार आहे की काहीच दिवसांत आपण आपल्या वडिलांचे कर्ज दूर करू शकतो".
काही मुलं जेव्हा लाखोंचे क्लासेस करून नोकऱ्या मिळवत आहेत, तिथे गरीब घरातील मुलांचे काय असा प्रश्न पडतो. पण अब्दुल शेखसारखी मुले अशा सर्व गरीब मुलांसाठी प्रेरणा आहेत. कठीण परिस्थिती असली तरी त्यातून मार्ग काढून यशस्वी होता येते, हेच त्याने सिद्ध केले आहे.




