विजय हजारे ट्रॉफी हे नाव कसं पडलं? कोण होते विजय हजारे? वाचा...

विजय हजारे यांचे नाव क्रिकेटविश्वात आजही घेतले जाते. या दिवशी जगातील महान फलंदाजांपैकी एक, विजय सॅम्युअल हजारे (Vijay Hazard birthday) यांचा जन्म झाला. विजय हजारे यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम केले आहेत. तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील प्रसिद्ध स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी ही स्पर्धा देखील त्यांच्याच नावाने आयोजित केली जाते.

विजय हजारे यांचा जन्म ११ मार्च १९१५ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला होता. शिक्षकाच्या घरात जन्मलेल्या विजय हजारे यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वांची मने जिंकली. आज विजय हजारे यांची १०८ वी जयंती आहे. १९५२ मध्ये विजय हजारे यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना जिंकला होता.

विजय हजारे हे भारताचे असे खेळाडू होऊन गेले, ज्यांच्या पिढ्याही क्रिकेट जगताशी निगडीत आहेत. त्यांचे भाऊ विवेक हजारे, मुलगा रणजित हजारे आणि नातू कुणाल हजारे देखील क्रिकेट खेळायचे.

विजय हजारे सुरुवातीला फलंदाजीसोबत गोलंदाजीही करायचे. त्यांनी १९५१ ते १९५३ पर्यंत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यादरम्यान भारताला १४ सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आणि या सामन्याची इतिहासात नोंद झाली. कारण भारताच्या कसोटी इतिहासातील हा पहिलाच विजय होता. या १४ सामन्यांपैकी भारताने ५ सामने गमावले आणि ८ सामने अनिर्णित राहिले होते.

विजय हजारे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५८.३८ च्या सरासरीने एकूण १८,७४० धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे या काळात त्यांनी १० द्विशतकके ठोकली होती. इतकेच नव्हे तर विजय हजारे हे रणजी स्पर्धेचा इतिहासात त्रिशतक झळकावणारे पहिले फलंदाज आहेत. विजय हजारे यांनी महाराष्ट्राकडून खेळताना बडोद्याविरुद्ध झालेल्या सामन्यात ३१६ धावांची नाबाद खेळी केली होती. 

साल १९४३-४४ मध्ये भारत स्वतंत्र होण्यापूर्वी, विजय हजारे यांनी 'द रेस्ट'कडून खेळताना 'द हिंदूज' विरुद्ध नाबाद ३०९ धावांची खेळी केली होती. या सामन्यात संपूर्ण संघाने केवळ ३८७ धावा केल्या होत्या.

विजय हजारे ट्रॉफीची सुरुवात २००३-०४ मध्ये झाली होती. सुरुवातीला ही स्पर्धा रणजी वनडे ट्रॉफी म्हणून ओळखली जायची. त्यानंतर या स्पर्धेला विजय हजारे ट्रॉफी असं नाव देण्यात आलं. 

सबस्क्राईब करा

* indicates required