computer

पावसाची गाणी : आज ऐकू या अहिराणी भाषेतील टॉप पावसाची गाणी...

अहिराणी गाणी सध्या देशभर धिंगाणा घालत आहेत. बबल्या इकस केसावर फुगे या गाण्याला तर तब्बल ८५० लाख व्ह्यूज आले आहेत. सगळीकडे बबल्याचीच चर्चा आहे. सचिन कुमावत यांनी या गाण्याच्या माध्यमातून प्रभावीपणे ग्रामीण भागातील बेरोजगारीवर भाष्य केले आहे. अहिराणी गाणी म्हटली म्हणजे सहसा कानबाईचीच गाणी डोळ्यासमोर येतात. पण त्याव्यतिरिक्त सुध्दा अहिराणी गाणी खूप लोकप्रिय आहेत राव!! त्यातलाच एक प्रकार म्हणजे पावसाळी गाणी.

बाकीच्या लोकगीत प्रकारांबद्दल नंतर कधीतरी तुम्हाला सांगूच, पण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याचे दिवस म्हणजे वातावरणात एक वेगळीच फिलिंग असते राव!! अशा या प्रसन्न वातावरणात आहिराणी गाणे, ते पण पावसावरचे असेल तर मेजवानी असते मंडळी!! आज आम्ही अशाच काही पावसाळी अहिराणी गाण्यांची तुम्हाला ओळख करून देणार आहोत... 

1) सावन ना महिना

हे गाणे अहिराणीच नाही, तर इतर भाषिक लोकांनासुद्धा माहित आहे. २ वर्षापूर्वी हे गाणे पावसाळ्यात आले होते आणि तेव्हाच ते पूर्ण महाराष्ट्रात तुफान हिट झाले होते. आजही या गाण्याची क्रेज कमी झालेली नाही. एक प्रेमभंग झालेला तरुण, ज्याला आम्ही आहिराणीत 'गम मा पडेल' म्हणतो, तो आपल्या सोडून गेलेल्या प्रेयसीसाठी गाणे म्हणतो. 'सावन ना महिना मा तुले प्यार करना ये'! म्हणजे पावसाळ्यातील या रोमँटिक वातावरणात मी तुझ्यावर प्रेम केले. अशी थीम असलेले हे गाणे मात्र पुढे ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेते राव!! 

गम मा पडेल आमना खान्देश ना पोरे ते गाणं आयकीनीच कानाबाना व्हई गयतात. आणि अगदी तीच फिलिंग हे गाणे ऐकल्यावर तुम्हाला पण येईल याची खात्री आहे.

लोकगीते हे खऱ्या अर्थाने स्थानिक जनजीवनाचा आरसा असतात. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे त्यात प्रतिबिंब दिसते. हेच पाहा ना, खेड्यातला तरुण आपल्या प्रेयसीसाठी एखाद्या मॉलमधून नाहीतर यात्रेतून गिफ्ट आणतो. म्हणूनच 'धरणगाव ना बजार मा तुले चुडी लयना ये' असे तो म्हणतो.

२. धोंड्या धोंड्या पाणी दे

सध्या अमिताभ बच्चनच्या "शावा शावा'  गाण्यावर एडिट केलेले धोंड्या धोंड्या पाणी दे गाणे खूप गाजत आहे. खरेतर हे एक खान्देशी लोकगीत आहे. सध्या ते डिजे रिमिक्स वगैरे होऊन वायरल होत आहे. धोंड्या धोंड्या पाणी दे म्हणजे देवाला पाऊस पाडण्यासाठी घातलेली साद आहे. खान्देशात जेव्हा जून उलटूनही पाऊस पडत नाही तेव्हा लोक डोक्यावर घागर घेऊन पाणी मागत असतात.

धोंड्या म्हणजे देवाला पाऊस दे अशी विनवणी लोक करत असतात. शेवटी गावभर पाणी मागून झाले की एके ठिकाणी थांबून घागर ठेवली जाते, आणि सगळे गावकरी त्या घागरीभोवती गोळा होतात. आणि घागरीला हलकासा हात लावतात. जर घागर फिरली तर देवाने आपले गाऱ्हाणे ऐकले असून लवकरच पाऊस पाडणार असा संदेश देवाने आपल्याला दिला असे समजले जाते. तर घागर फिरली नाहीतर देवाला आपला राग आला असून अजून काही दिवस आपल्याला पावसाची वाट पाहावी लागेल हे गृहीत धरले जाते.

३. 'देव गरजना इज चमकणी'

देव गर्जत असतो, विजा चमकत असतात, पण पाऊस काय येत नाही.  अशावेळी कानबाई मातेला या गाण्यातून हाक घातली आहे. लवकर पाणी पाड म्हणजे आम्ही शेतात जायला आणि पेरणी करायला मोकळे होऊ अशी  कानबाई मायला विनवणी केलेली आहे. 

 

याशिवाय हिरवा डोंगर, पाणी उना अशी अनेक खान्देशी लोकगीते प्रसिद्ध आहेत. खान्देशी जनजीवनात पावसाळी गाण्यांना खूप महत्व आहे. त्यात अगदी प्रेमगीतापासून ते देवाला साद घालणाऱ्या अशा सगळ्या प्रकारच्या पावसाळी लोकगीतांची इथे रेलचेल आहे.

 

लेखक : वैभवराजे पाटील.

 

आणखी वाचा :

पावसाची गाणी : लता दीदींच्या आवाजातील सदाबहार पावसाचे गाणे 'ओ सजना' !!

हा आहे खानदेशचा गली बॉय....या ८ वर्षांच्या मुलाने खानदेशला वेड लावलंय राव...