computer

झुलन, मिताली राज, विश्वनाथन आनंद, युवराज.. कुणाकुणावर बायोपिक्स येत आहेत? आणि त्या भूमिका कोण करणार आहे?

घाबरू नका, एकाही सिनेमात सुबोध भावे मुख्य भूमिका करत नाहीय..

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक सिनेमांची चलती आहे. गेल्या काही वर्षात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या आयुष्यावर बायोपिक तयार झाल्या आहेत. यात मात्र खेळाडूंचे नाव टॉपवर घ्यावे लागेल. मिल्खा सिंग, धोनी, सचिन, मोहम्मद अझरुद्दीन, मेरी कोम अशा खेळाडूंवर सिनेमे आले आणि ते तुफान चालले. भारतातील खेळाडूंबद्दल असलेले आकर्षण आणि कुतूहल यामुळे हे सिनेमे चांगले चालतात हे सूत्र निर्मात्यांना सापडले आहे. म्हणून अजूनही ही यादी लांबू शकते. या यादीत भर घालणारे अजून काही सिनेमे येत्या काही काळात येणार आहेत. त्यात कोणत्या खेळाडूवर कुठला सिनेमा येत आहे यावर एक नजर फिरवूया.

१) चकडा एक्सप्रेस

झुलन गोस्वामी ही खेळाडू आपल्या बॉलिंगने विरोधी संघातील खेळाडूंना नामोहरम करत आली आहे. भारताचा महिला क्रिकेटमध्ये असणाऱ्या दबदब्याचे मोठे श्रेय झुलनकडे जाते. झुलनच्या नावावर देशासाठी जगात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आहे. तिच्या याच सर्व प्रवासावर आधारित सिनेमा चकडा एक्सप्रेस लवकरच येऊ घातला आहे.

२) शाबास मिथु

झुलनप्रमाणे मिताली राज ही भारतीय महिला संघाची सर्वाधिक यशस्वी कॅप्टन महिला क्रिकेटमधील महान खेळाडू आहे. मिताली जगात सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. तिची भूमिका तापसी पन्नू करणार आहे.

३) दादा

धोनीनंतर भारतीय क्रिकेटचा सर्वाधिक यशस्वी कॅप्टन आणि चाहत्यांचा लाडका दादा सौरव गांगुली दादा याच नावाच्या सिनेमातून त्याची गोष्ट सांगणार आहे. पदार्पणात शतक ते बीसीसीआय अध्यक्ष हा त्याचा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. रणबीर कपूर हा गांगुलीच्या भूमिकेत दिसेल.

४) ग्रँडमास्टर

ग्रँडमास्टर नुसतं म्हटलं तरी विश्वनाथन आनंद डोळ्यासमोर येतो. भारतीयांसाठी बुद्धीबळ म्हणजे आनंद हेच समीकरण आहे. ५ वेळा विश्वविजेता ठरलेल्या आनंदवर आनंद एल राय सिनेमा बनवत आहे. यासाठी आमीर खान हा आनंदच्या भूमिकेत दिसणार आहे. आमीरच्या इतिहासाला साजेसा हा सिनेमा काहीतरी भन्नाट असेल हे नक्की.

५) मैदान

सैय्यद अब्दुल रहीम हे नाव आताच्या काय मागच्या पिढीलाही माहीत असण्याची शक्यता कमी आहे. पण देश स्वतंत्र झाल्यावर १९५० ते १९६३ या काळात भारतीय फुटबॉल संघाचे कॅप्टन आणि मॅनेजर असलेले रहीम हे भारतीय फुटबॉलचे शिल्पकार मानले जातात. त्यांची कहाणी घेऊन अजय देवगण मैदान या सिनेमातून येत आहे.

६) युवराज

करण जोहर कडून २०१९ सालीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. यासाठी तो सिद्धांत चतुर्वेदी या गली बॉय फेम अभिनेत्याला घेणार होता. पण यासाठी हृतिक किंवा रणबीर कपूर असावा असा युवराज सिंगचा हट्ट आहे. लवकरच हाही सिनेमा बॉक्सऑफिस गाजवणार आहे.

७) लायगर

लायगर म्हणजे लायन आणि टायगर हे नांव एकत्रित करून तयार झालेले नाव. या सिनेमातून विजय देवरकोंडा बॉलीवुडमध्ये एन्ट्री करणार आहे. हा सिनेमा माईक टायसनवरून प्रेरित असल्याची चर्चा आहे. खुद्द माईक टायसनही यात भूमिका करताना दिसणार आहे.

लवकरच हे सारे बायोपिक्स आपल्याला पाहायला मिळतील..

सबस्क्राईब करा

* indicates required