computer

ब्रेकअप कशामुळे होतो? तो टाळायचा कसा हे ही पाहून घ्या...

दूरच जायचं असतं तर लोकं जवळ तरी का येतात? किंवा ब्लॉक करून नाती तुटत नाहीत, फक्त प्रोफाईल दिसत नाही, अशा प्रकारचं स्टेटस अनेकदा ब्रेकअप झालेल्या लोकांच्या व्हाट्सअप स्टेटसवर बघायला मिळतं. अजून काही वर्षांनी आपल्याकडील विवाहसंस्था नष्ट होईल असं मॅरेज ब्युरो क्षेत्रातले जाणकार म्हणतात आणि याच्या मुळाशी आहे ब्रेकअप‌. ज्यांचं झालं आहे त्यांच्यासाठी काळीज चिरणारा शब्द.

'I am going through a break up' हे सध्या कायम हवेत तरंगत असलेलं वाक्य आहे. पण ब्रेकअप का होतो? काय कारणे असतात? ब्रेकअपनंअतर पॅचअप होते का? व्यक्तिस्वातंत्र्याला मिळालेलं वाढतं महत्व ब्रेकअपचं कारण आहे का? हेच पाहूयात आजच्या लेखात..

आजकाल ब्रेकअप होण्यासाठी क्षुल्लक निमित्तही पुरतं. पण वरवर दिसायला क्षुल्लक दिसणारं निमित्त हिमनगाच्या टोकासारखं असतं. त्याच्याखाली अनेक कारणांचा मोठा भाग असतो. मुख्यतः ब्रेकअप होण्याची खालील कारणं आहेत.

१. हम करे सो कायदा (स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे दुसऱ्याला वाकायला लावणं)
लहानपणी मुलांचा खोडकरपणा, हट्टीपणा, प्रसंगी हवं ते मिळवण्यासाठी आदळ आपट करणं या गोष्टींकडे लहान म्हणून दुर्लक्ष केलं जातं. पुढे वय वाढल्यानंतर, बऱ्या वाईटाची समज आल्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टींकडे एका वेगळ्याच नजरेने बघितलं जातं. खास करून ज्या वेळी त्या व्यक्तीवर कुटुंबाची जबाबदारी असते त्यावेळी तर या गोष्टींना अजिबात थारा नसतो. हट्टीपणा, हेकटपणा, समोरच्याचं ऐकून न घेणं यातून पुढे भांडणं, वाद वाढत जातात. त्या पराकोटीला पोहोचल्या तर समोरच्या व्यक्तीच्या सहनशीलतेचा अंत होऊन ब्रेकअप होण्याची शक्यता बळावते.

२. अशी ही बनवाबनवी (फसवणूक करणं)
ब्रेकअप होण्याचं दुसरं प्रमुख कारण म्हणजे नात्यात झालेली फसवणूक. कोणत्याही नात्यांमध्ये विश्वास, प्रामाणिकता, कमिटमेंट या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आयुष्याच्या जोडीदाराबरोबरच्या नात्याचा तर विश्वास हाच पाया असतो. जोडीदाराकडून फसवणूक झाल्याची भावना मनात निर्माण झाल्यास असं नातं टिकणं अशक्य होतं आणि मग ब्रेकअप शिवाय पर्याय उरत नाही.

३. वड्याचं तेल वांग्यावर (बाहेरच्या टेन्शनचा राग घरातल्यांवर काढणं)
ऑफिसमध्ये दिवस अत्यंत वाईट गेलाय, कामाचं जबरदस्त टेन्शन आहे, बरोबरचे सहकारी थोडेही ॲड्जस्ट करायला तयार नाहीत, बॉसची बोलणी खावी लागली... अशा अनेक गोष्टींमुळे एखादा दिवस पार बिघडलेला असतो. मग त्या ताणतणावाचं ओझं तुम्ही तुमच्या बरोबर घरी घेऊन येता. कपाळावरच्या आठ्यांमधून आणि एकंदरीत चेहऱ्यावरून काहीतरी बिनसलंय असा सिग्नल घरच्यांना जातो. क्वचित आल्यानंतर शूज काढून भिरकावून दिले जातात, किंवा बॅग आदळली-आपटली जाते. या गोष्टी तणावात अजूनच भर घालतात. यातून साध्य काय होतं? काहीही नाही! उलट घरातलं वातावरण अजून नकारात्मक होतं. त्यापेक्षा घरी आल्यावर घरच्यांना तुमच्या दिवसभरातल्या ताणतणावांची, धावपळीची स्पष्ट कल्पना द्या. तीही शक्य तितक्या सौम्य शब्दात. शक्य झाल्यास त्यांना अर्धा तास तुम्हाला शांत बसायचं आहे असं आधीच सांगा. बघा परिस्थिती किती चटकन नियंत्रणात येते!

४. मी, ऑफिस, आणि मीटिंग्ज (आवश्यक तेव्हा सपोर्ट न देणं)
अनेकदा जोडीदाराला तुमच्या केवळ 'असण्याची' गरज असते. जोडीदार टेन्शनमध्ये किंवा एखाद्या घटनेमुळे निराश झालेला असतो तेव्हा तुम्ही केवळ त्याच्याबरोबर असणं हेही खूप बोलकं ठरतं. पण काम, मीटिंग, डेडलाईन्स किंवा इतर कार्यक्रम अशा सबबी सांगून तुम्ही तुमच्या जोडीदाराला गरजेच्या वेळी उपलब्ध होत नसाल, तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात. तुमचा तसा हेतू नसेल तरी तुमच्या आयुष्यात जोडीदाराला किंमत नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे नातं टिकवायचं असेल तर जोडीदाराला सपोर्ट करायलाच हवा. अनेकदा जोडीदाराच्या नजरेत आपल्याला किंमत नाही या तक्रारीतूनही नाती तुटतात.

५. बिगडे दोस्त (चुकीच्या माणसांच्या संगतीत असणं)
बरेचदा तुमच्या जोडीदाराला तुमचे मित्रमैत्रिणी आवडत नाहीत. याची मुख्यतः दोन कारणं असतात. एक तर तुम्ही तुमच्या जोडीदारापेक्षा तुमच्या मित्रांनाच झुकते माप देत आहात, किंवा त्या मित्रांच्या काही गोष्टी खरोखर खटकण्यासारख्या आहेत. जर त्या मित्रांना खरोखर काही वाईट सवयी असतील तर कोणाला प्राधान्य द्यायचं हा विचार तुम्ही करायलाच हवा. अशावेळी, 'काल आयुष्यात आलेल्या पोरीसाठी मी माझ्या जानी दोस्तांना अंतर देणार नाही' हा बाणा सोडायला हवा! म्हणजे तुम्हाला ब्रेकअप नको असेल तर ... मात्र तुम्ही कोणाला महत्त्व देता हा मुद्दा असेल तर मात्र एकदा कठोर आत्मपरीक्षण करायला हवं. ब्रेकअप टाळायचं असेल तर निदान एवढं तरी करायला हवंच ना!

६. का रे दुरावा.. (प्रेम व्यक्त न करणं)
ही अजून एक चूक बरीच कपल्स करतात. तुमचं प्रेम असेल तरी छोट्याछोट्या, साध्यासोप्या कृतीमधून ते दिसायलाही हवं. जोडीदाराने केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीला मनापासून दाद देणं, बाहेर फिरताना हातात हात धरून चालणं, स्पर्शातून प्रेम व्यक्त करणं, अडचणीच्या प्रसंगी हात हातात दाबून धीर देणं या कृती वरवर दिसायला छोट्या असल्या तरी फार मोठा परिणाम साधतात. तुमचं नातं जास्त सुदृढ आणि चिरंतन होण्यासाठी एखादी जादू की झप्पी देऊन बघा काय जादू करून जाते ते.

७. झूट बोले कौआ काटे (खोटं बोलणं)
अगदी फार मोठा विश्वासघात नाही, पण लहानसहान गोष्टींमध्ये खोटं बोलणं ही तुमची विश्वासार्हता गमावण्याची पहिली पायरी असते. एखादी गोष्ट तुमच्या जोडीदाराला आवडत नाही आणि तुम्ही नेमकी तीच केली, तर तुम्ही काय कराल? सहाजिकच लपवण्याचा प्रयत्न कराल. पण यातून विश्वासाला छोटे-छोटे तडे जाऊ लागतात. त्यामुळे शक्य असेल तर आजच हिंमत करून प्रामाणिकपणे जोडीदारापुढे चुकीची कबुली देऊन टाका.

८. इधर का उधर (चोरी करणं)
आर्थिक बाबींवरून जोडीदारांमध्ये होणारे मतभेद हे ब्रेकअपचं एक मुख्य कारण आहे. बऱ्याचदा दोघांपैकी एकजण जरा जास्तच कंजूष असतो आणि दुसरा तितकाच उधळ्या असतो. लग्नाच्या गाठी खरोखर स्वर्गात बांधल्या जात असतील तर देव तरी अशा विचित्र जोड्या का जमवतो, हे त्याचं त्यालाच माहीत! पण अशा जोड्या असतात खऱ्या. आणि त्यावरून होणारे मतभेद, वाद, आणि भांडणं बरीच कॉमन आहेत. अर्थात याची चांगली बाजू अशी, की संसारात आर्थिक बाबींचा योग्य तो बॅलन्स साधला जातो. दोघंही नवरा-बायको उधळे किंवा दोघंही कंजूष असतील तर विचारायलाच नको...!! मात्र याचा अतिरेक झाला किंवा आर्थिक बाबींमध्ये तुम्ही जोडीदारापासून काही लपवाछपवी करायला लागलात तर मामला गंभीर आहे असं समजा. जोडीदाराच्या नकळत मोठे खर्च करणं, त्याच्या संपत्तीवर माझा अधिकारच आहे असं म्हणत वारेमाप उधळपट्टी करणं, किंवा त्याला विश्‍वासात न घेता परस्पर तिसऱ्या व्यक्तीशी मोठे आर्थिक व्यवहार करणं या सगळ्याच बाबी पुढे जाऊन फार मोठ्या समस्या निर्माण करतात. त्यामुळे आर्थिक बाबतीत तरी जोडीदाराबरोबर पारदर्शकता ठेवलेली नक्कीच चांगली.

९. न मौनम् सर्वार्थ साधनम् (संवादाचा अभाव असणं)
नात्यात संवाद नसणं म्हणजे नात्याची आत्महत्या. जर तुम्ही जोडीदाराशी संवादच साधत नसाल तर त्या नात्याला अर्थ नाही. तुम्ही जितकं जास्त बोलाल, व्यक्त व्हाल, मोकळे व्हाल तेवढं चांगलं. दिवसभरातला तुमचा दिनक्रम कितीही धावपळीचा आणि तणावपूर्ण असेल, तरी सकाळी चहा घेताना किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळी तरी जोडीदाराशी आवर्जून संवाद साधण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी अवश्य वेळ काढा.

एक म्हण आहे, वेळीच घातलेला एक टाका पुढचे दहा वाचवतो. हे ब्रेकअप आणि त्याच्या आधीची परिस्थिती यांना तंतोतंत लागू होतं. उद्याचा ब्रेकअप आणि त्यातून येणारी अनिश्चितता, नैराश्य टाळायचं असेल तर आजच त्या दृष्टीने काही पावलं उचलायला हवीत. तुम्हाला काय वाटतं?

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required