computer

जगप्रसिद्ध गूढ, रहस्यमय नैसर्गिक जागा जिथे तुम्ही प्रत्यक्षात भेट देऊ शकता. याठिकाणी दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात.

कितीही अवघड कोडी सोडवली असली तरी माणसाच्या आकलनापलिकडे अनेक गोष्टी घडत असतात. प्रत्येकाला गूढ, रहस्यमय गोष्टीबद्दल खूप कुतूहल असते. तुम्ही जुने वाडे, मंदिरे, विहिरी यांबद्दल अनेक भितीदायक कथा ऐकल्या असतील. काहींनी तिथे जाऊन भेटही दिली असेल. अशा ठिकाणी जाणे एक वेगळेच धाडस किंवा थ्रिल असते, हो ना? जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जी विचित्र गूढ रहस्यांनी भरलेली आहेत. आज पाहूयात जगप्रसिद्ध गूढ, रहस्यमय नैसर्गिक जागा जिथे तुम्ही प्रत्यक्षात भेट देऊ शकता. याठिकाणी दरवर्षी अनेक पर्यटक भेट देतात.

ओकीहारा (Aokigahara) - जपानचे आत्महत्येचे जंगल

फुजीच्या पर्वतरांगामध्ये ओकीहाराचे दाट जंगल पसरलेले आहे. या जंगलात इतकी दाट झाडी आहे की सूर्यप्रकाश जमिनीवर पडतच नाही. १४ मैलांच्या जमिनीवर अनेक मोठमोठे वृक्ष उभे आहेत. त्यामुळे या घनदाट जंगलाला एक नावही आहे "द सी ऑफ ट्रीज" म्हणजे झाडांचा सागर. पण याशिवाय या जंगलाची एक विचित्र ओळख आहे. याला आत्महत्येचे जंगल असेही म्हणतात, कारण एकदा का कोणी या जंगलात गेला तर कितीही शोधले तरी कधीच सापडत नाही. त्यामुळे आत्महत्या करण्यासाठी सगळ्यात लोकप्रिय जागा म्हणून हे जंगल ओळखले जाते.
 

जेकबची खोल विहिर

टेक्सासमधील जेकबची विहीर पर्यटकांसाठी एक जबरदस्त पिकनिक स्पॉट आहे. उन्हाच्या लाहीपासून वाचण्यासाठी इथले थंडगार पाण्याचे आकर्षण अनेकांना होते. अनेक साहसी पर्यटक इथे सूर मारण्यासाठी करण्यासाठी येतात. ही विहीर तब्बल ६००० फूट खोल आहे. त्यामुळेच ती जास्त धोकादायक आहे. पोहोण्यासाठी उतरलेले आठ लोक या विहिरीच्या खोल पाण्यात गायब झाले आहेत आणि त्यांचे अवशेषही सापडले नाहीत.
 

यूकेचे किंचाळणारे डियरिंग जंगल

दक्षिण पूर्व इंग्लंडमधील केंटचा हा जंगली भाग. ही सर्वात रहस्यमय आणि भुताटकीची जागा म्हणून प्रसिद्ध आहे. इथे काही विलक्षण घटना घडल्या आहेत म्हणून याला "स्क्रीमिंग वुड्स" म्हणजेच किंचाळणारे जंगल म्हटले जाते. इथे घडलेल्या भयानक घटना अपहरण, हत्याकांड, बलात्कार यामुळे इथे किंचाळणारे आवाज ऐकू येतात असं म्हणतात. हे आवाज झुडपे आणि तिथल्या झाडांमधून ऐकू येतात असं इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे.

ट्रान्सिल्व्हानियामधील होईया बाकियू जंगल

हे रहस्यमय जंगल युरोपातल्या रोमेनियामधल्या ट्रान्सिलवेनियामध्ये आहे. या जंगलात एक लटकलेल्या चेटकीनीची आख्यायिका खूप गाजली होती. तसेच अजून दोन विचित्र घटना इथे घडलेल्या होत्या. पहिली म्हणजे इथे एक मेंढपाळ त्याच्या २०० मेंढरांबरोबर बेपत्ता झाला होता तो परत कधीच सापडला नाही. दुसरी घटना म्हणजे १९६८ मध्ये युएफओ म्हणजे उडती तबकडी पाहिल्याचा दावा सैन्यातील एकाने केला होता. या जंगलातली विचित्र आकाराची झाडे आणि त्यांची सावली भीती वाढवण्यासाठी पुरेशी आहे. होईया जंगलामध्ये जो कोणी गेला आहे त्याला काही ना काही अमानवी दिसले आहे.

 

तुर्कमेनिस्तानमधले नरकाचे दार (डोअर टू हेल)

"डोअर टू हेल"या नावाने हे खरोखरंच अस्तित्वात आहे. तुर्कमेनिस्तानमधील कराकम वाळवंटातील मध्यभागी आगीने वेढलेला हा एक मोठा खड्डा आहे. इथे नेहमी धूर आणि आग असते. हा, म्हणलं तर खड्डा पण याचा आकार फार विचित्र आहे. असं म्हणतात १९७१ पासून हा खड्डा तसाच आहे.त्यावेळी सोव्हिएत युनियनने या भागात तेलाच्या साठ्याच्या शोधात जमीन खोदली होती. इथे खोदल्यावर सिंक होल तयार झाले आणि अचानकपणे जवळपासच्या वस्तू गिळंकृत होऊ लागल्या. त्याच्या आतून गॅसही येऊ लागला. म्हणून शास्त्रज्ञांनी तिथे आग पेटवली,पण गॅसचे प्रमाण कमी झाले नाही. आजही तिथे आग पेटतच आहे. याचं कारण अजूनही कोणाला कळलेले नाही.
 

कॅरिबियन बेटामधील सेंट क्रोइक्स

कॅरिबियन बेटामधील सेंट क्रोइक्स हे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे व खोल पाणी असलेले बेट आहे. त्यामुळे या पाण्यात अनेक प्रकारचे जिवंत प्राणी राहतात. असं म्हणतात इथल्या समुद्राच्या तळाशी दोन मैलांच्या अंतरावर काही रहस्यमय प्राणीही आहेत. हे रहस्यमय प्राण्यांमुळे निळे पाणी गडद होऊन जाते. याची खोली इतकी जास्त आहे की तळ दिसतच नाही.
 

एव्हरेस्टचा डेथ झोन

माउंट एव्हरेस्ट हे जगातले सर्वात उंच शिखर आहे. या शिखरावर चढताना एक एक पॉईंट येतो जिथे ऑक्सिजन खूप कमी होतो आणि श्वास घेणे अशक्य होते. याला अक्षरशः "डेथ झोन" म्हणून ओळखले जाते. आणि समजा तिथे कोणीही तयारी न करता गेला तर जिवंत परत येत नाही. समजा, कोणी एव्हरेस्टच्या उंच भागात हरवले तर मृतदेह परत मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. म्हणून समजा तिथे कोणी हरवले तर परत आणता येत नाही. म्हणून हा डेथ झोन.

मलेशियाच्या विचित्र गोमंतोंग लेणी

मलेशियातील गोमंतोंग लेणी ही प्राचीन आहेतच. पण याची अजून एक ओळख फार विचित्र आहे.
या लेण्यांच्या भोवती घनदाट जंगल आहे तसेच खूप मोठया संख्येने वटवाघूळ आहेत. ज्यांनी तिथल्या लेण्यांच्या जवळील एक शंभर फूट टॉवर भरलेला आहे. फक्त वटवाघूळ असेल तर कसे वाटेल? एवढेच नाही इथे पूर्ण भिंती झुरळे आणि इतर किड्यांनी भरलेल्या आहेत.
 

प्राणघातक माडिडी राष्ट्रीय उद्यान

राष्ट्रीय उद्यान म्हणजे अनेक वन्यजीव प्राण्यांचे घरच असते. पण बोलिव्हियाचे माडिडी राष्ट्रीय उद्यान हे विचित्र कारणासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या उद्यानात जायलाच बंदी आहे. तसे पाहिले तर, या उद्यानात अनेक सुंदर देखावे, वनस्पती आणि वन्यजीव आहेत. परंतु जितके सुंदर आणि मोहक हे राष्ट्रीय उद्यान दिसते तितकेच ते धोकादायक आहे. या उद्यानात अनेक विषारी वनस्पती आणि प्राणी आहेत. त्यामुळे माणूस आत गेला तर जिवंत परत येत नाही. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या विषारी वनस्पती आणि प्राणी याच उद्यानात पाहायला मिळतात. त्यामुळे याला मृत्यूचा सापळा म्हणतात.
 

मिनेसोटाचा धबधबा

मिनेसोटा मध्ये अनेक सुंदर धबधबे आहेत. ते जितके सुंदर आहेत तितकेच आश्चर्यकारकही आहेत. ब्रूल नदीचे पाणी हे उंचावरून खाली धबधब्यात रूपांतर होऊन येते. हा देखावा खूप मोहक दिसतो. परंतु हे पाणी असे काही खोल खड्यात जाते की त्याला अंतच दिसत नाही. म्हणजे धबधब्यात खाली पाणी गेले की ते जणू पृथ्वीच्या पोटात अंतर्धान पावते. अनेक वस्तू खाली फेकून पहिल्या पण पाण्याचा प्रवाह नेमका कसा जातो कळतच नाही. त्यामुळे ही नदी आणि त्यावरचा धबधबा एक रहस्यच राहिले आहे.

तुम्हाला अश्या कुठल्या विचित्र , रहस्यमय जागा माहिती आहेत का? जरूर कमेंट करून सांगा.

सबस्क्राईब करा

* indicates required