computer

जनानखाना उर्फ हरम!! तिथे काय असे, स्त्रियांचे आयुष्य याबद्दल परदेशातून आलेल्या प्रवासी लेखकांनी काय लिहिले आहे हे ही वाचा..

मुस्लिम राजांच्या कथांमध्ये येणारा हमखास उल्लेख म्हणजे जनानखाना. याला हरमही म्हणतात. काळ-धर्म-सामाजिक परिस्थिती यानुसार अशा काही प्रथा जगात आहेत. यांतल्या काही काळानुसार बंदही झाल्या. सांगोवांगीच्या कथा ते कुतूहल यातून हरमबद्दल बरंच काही चांगलं वाईट तुम्ही आजवर वाचलं असेल. म्हणूनच या विषयावर बोभाटा घेऊन आले आहे एक विस्तृत लेख. हे प्रकरण कसे सुरू झाले असेल, त्यात काय सोयीसुविधा असत, या स्त्रियांची कुचंबणा या सर्वांवर हा लेख प्रकाश टाकेल.

हरम म्हणजे स्त्रियांसाठी घरात राखून ठेवलेली जागा. त्याला जनानखाना देखील म्हणले जाई. हरम हा शब्द मूळ अरबी भाषेतील आहे. या शब्दाचा अर्थ होतो पवित्र किंवा वर्ज्य. हरम म्हणजे घरातील स्त्रियांसाठी राखून ठेवलेली जागा जिथे कुठल्याही पुरुषाला जाण्यासाठी परवानगी नसायची. मुघलांनी आपल्या हरममध्ये अनेक देशाच्या, अनेक धर्माच्या स्त्रिया ठेवल्या होत्या. या हरममध्ये मुघलांच्या बायका आणि त्यांच्या नातेवाईक स्त्रिया राहायच्या. यामधल्या बायका सहसा लग्न करून आलेल्या किंवा भेट म्हणून दिलेल्या असायच्या. काही मुलींचा जन्म देखील हरममध्येच झालेला असायचा व त्यांचे संपूर्ण आयुष्य हरममध्येच जायचे. हरममध्ये असणाऱ्या स्त्रियांना पडदा पद्धतीत राहण्याची सक्ती होती. त्यांना स्वतःच्या मर्जीने हरम बाहेर जायला परवानगी नव्हती. मुस्लीम समाजामध्ये स्त्रियांना कुठल्याही प्रकारच्या व्यवहारात दुय्यम स्थान असायचे. स्त्रिया स्वतःच्या रक्षणासाठी असमर्थ असतात त्यामुळे त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी पुरुषांवर असते असे मानले जायचे. मुस्लीम समाजात बहुपत्नीत्वाची प्रथा होती. त्यामुळे त्यातूनच जनानाखाण्याची प्रथा रूढ झाली असावी. हरम प्रामुख्याने मुसलमान समाजातील बादशहा, अमीर, उमराव, सुलतान अशा उच्च पदस्थ लोकांकडे असायचा. त्यांना बायकाही जास्त असायच्या व त्या सर्वांची राहण्याची सोय करणे त्यांना भाग होते. हरममध्ये स्त्रियांना पडदा पद्धतीमध्ये राहणे भाग होते. पडद्यात राहणे हे उच्च कुळाचे घरांदाजापणाचे लक्षण मानले जाई.

काही हरम लहान तर असायचे, तर काहींचे रुप छोट्या शहरासारखे विस्तृत असे. तिथे कपड्यांची-दागिन्यांची दुकाने असत, धोबी शिंपीदेखील हरममध्ये असत. त्याचबरोबर तिथे जन्म घेणाऱ्या लहान मुलांसाठी शाळा, खेळण्यासाठी मैदानदेखील होते. हरममध्ये शाही खजाना देखील असायचा. यात महत्वाचे दस्त आणि शाही मोहोरा असायच्या. हरम एक असे ठिकाण होते जिथे बादशहा आपली शाही कामे कुठल्याही अडचणीशिवाय करू शकत होते. शाही हरमचा आकार इतका मोठा असायचा तिथे काम करणाऱ्या दासींना बादशाहाला बघायला कित्येक वर्षे थांबावे लागायचे. हरममध्ये देखरेख करण्यासाठी महिला अधिकारी असत. अर्थातच त्यांमध्ये बादशहाच्या बायका आणि नातेवाईक असत. हरमची प्रमुख प्रामुख्याने बादशाहाची आईच असायची. त्यांच्या हाताखाली अनेक दासी आणि वेश्या काम करत. हरममधील आयुष्य अतिशय विलासी आणि सुखसोयींनी भरलेले असायचे. रोज सकाळी शाही बायकांसाठी नवीन कपडे येत असत. ते नंतर त्यांच्या आवडत्या दासींना मिळत. स्वतःलाच खुश करण्यासाठी स्त्रिया मोठ्या कारंज्यापाशी पडून राहत. गझल, गाणी, संगीत ऐकत. कबुतर उडवणं, कोंबड्यांची लढाई, धनुष्य बाण चालवणं, पत्ते खेळणं, गोष्टी सांगणं या सारख्या गोष्टी त्या करायच्या.

हरममधील स्त्रियांना सर्व सुखसोयी मिळायच्या. उंची कपडे, सुंदर दागिने, उत्कृष्ठ जेवण आणि बरंच काही, परंतु त्या स्त्रियांना संभोग आणि स्वातंत्र्यापासून वंचित राहावे लागत असे. जर बादशाहने ठरवलं तरच एखाद्या स्त्रीला संभोगाचे सुख मिळायचे नाहीतर सर्व आयुष्य त्यांना तसेच काढावे लागे. अशा वेळी काही चतुर स्त्रिया तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर लपूनछपून संबंध ठेवायच्या. अशा गोष्टींमध्ये जीवाचा धोका देखील होता. हरममधील स्त्रियांना तिथून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य नव्हते. त्या संपूर्ण आयुष्य हरममध्येच राहायच्या. एकदा जर एखादी स्त्री हरममध्ये आणली गेली तर त्यानंतर बाहेरच्या जगाशी तिचा कोणताही संबंध राहत नसे. अगदी बादशहाच्या मृत्युनंतर देखील त्या स्त्रीला हरममध्येच राहावे लागे. अशा स्त्रियांसाठी हरममध्ये वेगळी जागा असे त्याला ‘सुहागपुरा’ असे म्हणाले जाई.

हरमच्या सुरक्षेसाठी तीन टप्प्यांची सुरक्षा व्यवस्था होती. पहिल्या टप्प्यात मजबूत आणि ताकदवान स्त्रिया होत्या. त्यांच्यासोबत धनुष्य बाण आणि भाला चालवणाऱ्या उझबेक स्त्रिया असत. या उझबेक मुलीना तुर्कस्तानच्या रहस्यमयी दऱ्यां-खोऱ्यांमधून आणले जाई. या नंतरच्या टप्प्यात असत हिजडे. हिजड्यांचे काम हरममध्ये शिस्त आणि शांतता पाळण्याचे होते. हे हिजडे आशियाई-आफ्रिकन असत. यांना लहानपणापासूनच हरममध्ये आणण्यात आले असे किंवा ते बादशाहाला भेट म्हणून मिळाले असत. एक चतुर आणि हुशार हिजडा हा बादशहासाठी अतिशय मोलाचा ठरे. हिजड्यांना माणसांची उत्तम पारख करता येत असे. काहीवेळा तो आपल्या मालकाला राजनीतीविषयक सल्लादेखील देत असे. जर या सगळ्यांत तो अतिशय निपुण असेल तर त्याला राजनैतिक स्थानदेखील मिळत असे. काही वेळा बादशहाचा हिजड्यांवरती खूप विश्वास असायचा. ते त्याला मित्राप्रमाणे वागवत. आग्र्यामध्ये अशा अनेक हिजड्यांचे मकबरे आहेत जे बादशहाच्या अतिशय जवळचे होते. सुरक्षेच्या तिसऱ्या टप्प्यात मजबूत शिपाई असायचे. यांच्याकडे बंदुका देखील असत. हरममध्ये घुसखोरी करणाऱ्या कुणालाही गोळी घालण्याचा आदेश बादशाहने त्यांना दिला होता.

“शाही घराण्याच्या रिवाजानुसार जेव्हा एखाद्या वैद्याला हरममध्ये बोलावलं जायचं त्यावेळी तिथे असणारे हिजडे त्या वैद्याच्या अंगावर डोक्यापासून कमरेपर्यंत येणारे एक कापड पांघरत आणि मगच त्याला हरममध्ये प्रवेश दिला जाई. ते त्या वैद्याला घेऊन आत जात व रोग्याची तपासणी होईपर्यंत तिथेच थांबत. तपासणी झाल्यानंतर ते वैद्याला घेऊन बाहेर येत. पण मी अनेक वेळा हरममध्ये गेलो असल्यामुळे त्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास होता.”
हा किस्सा आहे निकोलाव मनुची यांचा. मनुची हा एक इटालियन प्रवासी होता. तो सतराव्या शतकात भारतात आला. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. मनुची हा व्यवसायाने वैद्य होता. तो शहाजहान बादशहाचा मोठा मुलगा दाराशुकोहच्या चाकरीत होता. त्याने आपल्या आठवणी पोर्तुगीज आणि फ्रेंच भाषेत लिहिल्या आहेत. त्यामध्ये हा एक किस्सा त्यांनी सांगितला आहे.

त्याने शाही घराण्यातील हरम म्हणजेच जनानखाण्याबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. ते म्हणतात, हरममध्ये जाण्यासाठी कुणालाच परवनागी नसायची. त्यामुळे तेथील महिलांना आपल्या नवऱ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही पुरुषाला पाहणे अशक्य होते. म्हणून त्या मुद्दाम आजारी असण्याचं नाटक करायच्या. त्यामुळे त्या महिलांना एखाद्या वैद्याला बघण्याची, त्याच्याशी बोलण्याची, नाडी परीक्षेच्या बहाण्याने त्याला स्पर्श करण्याची संधी मिळायची. अशा वेळी वैद्य आणि त्या स्त्रीच्या मध्ये एक पडदा असायचा. वैद्य जेव्हा पडद्याच्या मागे नाडी परीक्षण करण्यासाठी हात पुढे करायचा तेव्हा त्या स्त्रिया त्याच्या हाताला कुरावाळायच्या. वैद्याच्या हाताचे चुंबन घ्यायच्या, हळूच चावायच्या. काही स्त्रिया तर तो हात आपल्या स्तनांपर्यंत ओढून स्तनांना स्पर्श करायला भाग पडायच्या. खुद्द मनुची सोबत पण असे अनेकवेळा झाले होते. पण ते या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचे, जेणेकरून तिथे बसलेल्या हिजड्यांना आणि परिचारिकांना काही कळणार नाही. मनुची हे दाराशुकोहचे खूप जवळचे आणि खास होते. त्यांच्यावर दाराशुकोहचा पूर्ण विश्वास होता म्हणूनच त्याने मनुचीला अंगावरती कापड न पांघरता हरममध्ये जाण्याची परवानगी दिली होती. दाराशुकोहच्या म्हणण्यानुसार ख्रिश्चन लोकांच्या डोक्यामध्ये तसली अश्लीलता नव्हती जी मुसलमान लोकांच्या डोक्यात असते.

मनुचीला हरमबद्दल इतकी सारी माहिती असण्याचे कारण म्हणजे तो वैद्य होता. नाहीतर शाही घराण्यातील पुरुषांशिवाय हरममध्ये कोणीही जाऊ शकत नव्हते. यामुळेच हरमच्या आतील भागाविषयी दरबारी इतिहासकार असणारे अबुल फझलसुद्धा जास्त माहिती देऊ शकले नाहीत. परंतु मनुची सारखेच वैद्य असणारे बर्नियर, थोमस रो, जॉन मार्शल, फ्रान्सिसको पेलसर्ट, विलियम फिंच यांच्या त्यांनी लिहिलेल्या आपल्या भारतामधील आठवणींमध्ये हरमबद्दल माहिती सापडते. यामध्ये काहींनी अनेक गोष्टी वाढवून चढवून लिहिल्या आहेत. पण त्यांच्या लिखाणातून हरमबद्दल अनेक प्रकारची माहिती मिळते.

अकबर बादशाहने जेव्हा फतेहपुर सिकरीला राजधानी हलवली तेव्हा त्याने हरमला देखील नवीन रूप दिले. त्यावेळी तिथे पाच हजारपेक्षा जास्त स्त्रिया होत्या. अकबराने हरमचे वेगवेगळे हिस्से केले होते, जेणेकरून तिथली व्यवस्था बघणे सोयीचे होईल. हरममध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये शांतता राहावी, तेथील लोकांना सर्व सोयी मिळाव्यात म्हणून अकबराने तिथे हवालदाराची नेमणूक केली होती. तेथील दासींना आणि बाकी कामगारांना पगार देण्यासाठी- हरमचा खर्च बघण्यासाठी देखील एक अधिकारी होता. बादशाहने हरममधील खबर देणारे हेरदेखील ठेवले होते. बादशहाने हरमसाठी जे काही नियम आणि कायदे बनवले होते ते त्याच्यानंतर ही पाळले गेले.

मनुची सारखाच डच व्यापारी फ्रांसिस्को पेल्ससर्ट याचीसुद्धा पोहोच हरमपर्यंत होती. तो जहांगीर बादशहाचा मित्र होता. त्याने त्याचे पुस्तक ‘जहांगीर इंडीया’ मध्ये लिहिले आहे की मुघल बादशहा खूप विलासी होते. जहांगीर बादशहाची वयाच्या पंचविसाव्या वर्षीच २०हून जास्त लग्ने झाली होती. त्याच्या हरममध्ये तीनशेहून अधिक बायका होत्या. त्याच्या वयाबरोबरच त्याच्या बायकांची संख्या वाढत गेली. जहांगीरच्या बायकांचे प्रत्येकीचे वेगळे कक्ष होते. प्रत्येकीच्या सेवेत वीस दासी असायच्या. सगळ्या राण्यांना मासिक भत्ता मिळायचा. तो त्या दागिने आणि कपड्यांवरती खर्च करायच्या. त्या जहांगीर बादशाहाला आकर्षित करण्यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या.

पेलसर्ट लिहितो की, जेव्हा केव्हा जहांगीर आपल्या एखाद्या राणीला भेटण्याची योजना करायचा तेव्हा तो कक्ष खूप सुंदर असा सजवला जाई. कक्षात उंची अत्तर शिंपडले जाई. जेव्हा बादशहा तिथे येई तेव्हा तिथल्या दासी त्याचे कपडे काढत आणि शिसव व चंदन पासून बनवलेल्या क्रीमने त्याचे मालिश करत. मालिश करत असताना निर्वस्त्र असणारा बादशहा अफिम किंवा दारूसारख्या उत्तेजित करणाऱ्या द्रव्यांचे सेवन करायचा. काही दासी त्याला पंख्याने वारा घालत, काहीजणी गुलाबपाण्याचा शिडकाव करत राहत. या दरम्यान जर बादशाहाला जर एखादी दासी आवडली तर तो ती रात्र तिच्यासोबतच घालवायचा. जर त्या दासीने बादशहाला संतुष्ट केले तर तिला खूप मोठे बक्षीस मिळे, अन्यथा तिला हरममधून घालवले जाई किंवा मारून टाकले जाई.

बहुपत्नी रूढ असणाऱ्या हिंदू राजांमध्ये ही हरमसारखीच अंत:पुर ही संस्था होती. तिथे असणाऱ्या राण्या देखील पडद्यामधेच असायच्या. हिंदू समाजात पडदा पद्धतीशी जुळणारे संकेत राजस्थानमध्ये जास्त आढळून येतात.

सबस्क्राईब करा

* indicates required