भारतातल्या पहिल्या सिनेमातील पहिलं स्त्री पात्र पुरुषाने वठवलं होतं ? वाचा हा भन्नाट किस्सा !!

आज दादासाहेब फाळके यांचा जन्मदिन. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांनी नाटक कंपनी मध्ये चित्रकार आणि पुरातत्व विभागात फोटोग्राफर म्हणून काम केलं. पुढे त्यांनी या कामांना रामराम ठोकला आणि स्वतःचा चित्रपट तयार करण्याचा बेत आखला. त्यासाठी शिक्षण आवश्यक होतं म्हणून त्यांनी मित्रांकडून पैसे घेतले आणि थेट लंडन गाठलं.

लंडन मधून सिनेमा विषयावर अभ्यास केल्यानंतर ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी हरिश्चंद्राची कथा हाती घेतली. या फिल्मची निर्मिती त्यांचीच कंपनी ‘फाळके फिल्म’ तर्फे होणार होती. पहिला अस्सल भारतीय सिनेमा तयार होणार होता पण हा मार्ग तेवढा सोप्पा नव्हता राव. या चित्रपटातील स्त्री पात्र शोधताना दादासाहेबांना कोणकोणत्या अडचणी आल्या त्याचाच हा गमतीदार किस्सा आहे.

स्रोत

मंडळी आजच्या काळात जिथे अभिनेत्रींची रांग लागलेली आहे तिथे हे समजून घेणं थोडं अवघड जाईल. त्याकाळात महिलांना काम करू दिलं जात नसे. चार भिंतीतल्या महिला चक्क चित्रपटात काम करायला तयार होणार हे त्याकाळात विचार करणेही कठीण होते. पण तारामती शिवाय हरिश्चंद्र पूर्ण कसा होणार.

दासाहेबांनी जंगजंग पछाडलं. ते नाचणारीच्या कोठ्या पर्यंत जाऊन आले. पण त्यांना नकार मिळत गेला. त्यांच्या पत्नी सरस्वती यांनी तारामतीचा रोल करण्यास तयारी दाखवली पण त्यांची एकाच अट होती, “चित्रपटात माझं नाव लागता कामा नये..”

स्रोत

‘The Moving Image: Melodrama and Early Indian Cinema 1913-1939’ या अनुपमा कापसे लिखित पुस्तकात सांगितल्या प्रमाणे. कोणतीही स्त्री तयार नसल्या कारणाने सरस्वती फाळके तारामती म्हणून चित्रीकरणाला तयार झाल्या. पण ते दादासाहेबांना मनापासून पटलं नाही. नाटक सिनेमात काम करण्यासाठी कुलीन स्त्रियांना पाठवणे हीन समजले जायचे. या गोष्टीचा पगडा कुठे तरी त्यांच्याही डोक्यावर होता. म्हणूनच दादासाहेबांनी त्यांना हा अभिनय करू दिला नाही.

स्रोत

पुढे त्यांना सुदैवाने अण्णा साळुंखे भेटले. ते एका भोजनालयात काम करायचे. दादासाहेबांनी त्यांना बघितल्याक्षणी तारामतीच्या पत्रासाठी विचारलं. आणि त्यांनी होकार दिला. मंडळी अशा पद्धतीने भारतातल्या पहिल्या सिनेमातील पाहिलं स्त्री पात्र हे एका पुरुषाने वठवलं होतं.