computer

जगप्रसिद्ध येल युनिव्हर्सिटीला दान देणाऱ्या येलने तो पैसा खरंतर भारतातून लुबाडला होता!! हे माहित आहे?

जगात उत्तमोत्तम शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांमध्ये जगात नावाजलेले विद्यापीठ म्हणून येल हे विद्यापीठ ओळखले जाते. अमेरिकतले हे विद्यापीठ जगभरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे मोठे केंद्र आहे. भारतातूनही अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी जातात.मात्र या जगप्रसिद्ध विद्यापीठाच्या उभारणीत अप्रत्यक्षपणे भारतीय पैसा होता हे मात्र अनेकांना माहीत नसते.या विद्यापीठाची उभारणी १७०७ साली करण्यात आली. येल हे नाव या विद्यापीठाला इलिहू येल या प्रतिष्ठीत (!) व्यक्तीच्या नावावरून देण्यात आले होते. आता हा येल आणि भारत हे कनेक्शन मोठे आहे हेच या लेखात तुम्ही वाचणार आहात.

१६ व्या शतकात भारतात व्यापारात बस्तान बसविण्यासाठी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी प्रयत्न करत होती. त्याकाळी इथे काम करण्यासाठी त्यांचे अनेक कर्मचारी येत असत. इलिहू येल हा इंग्लिश मनुष्य कारकून म्हणून १६८० साली भारतात आला. ईस्ट इंडिया कंपनीच्या कामानिमित्त आलेले काही कर्मचारी अतिशय धूर्त होते आणि इथून जाताना ते मालामाल होउन गेले. हा येलही त्यातलाच एक होता.

इलिहू येल नावाचा हा अधिकारी मात्र फक्त भारतासोबतच नाही, तर इंग्लंडसोबतही विश्वासघात करण्यासाठी ओळखला जातो. येल एकेक पायरी चढत जेव्हा तो फोर्ट सेंट जॉर्जचा गव्हर्नर झाला तेव्हा त्याने भारतीय लोकांना गुलामी करण्यासाठी युरोपमध्ये पाठविण्यास प्रोत्साहन दिले. फोर्ड सेंट जॉर्ज हे मद्रासमधील इंग्लिश व्यापाराचे केंद्र होते. गव्हर्नर असताना त्याने असा नियमच केला की भारतातून युरोपात जाणाऱ्या प्रत्येक जहाजात कमीतकमी १० भारतीय गुलाम हवेत. त्याच्या क्रूरतेची सीमा एवढी होती की एका भारतीय व्यक्तीला त्याने घोडा चोरी करण्याच्या आरोपात थेट फाशीची शिक्षा दिली होती.

इलिहू येल असे वागायचं यामागे दोन कारणे होती. पहिले म्हणजे त्याला भारतीयांबद्दल असलेला द्वेष आणि दुसरा म्हणजे त्याला या सर्वांतून होणारी घसघशीत कमाई. पण खुद्द ईस्ट इंडिया कंपनी त्याच्या या सर्व कारस्थानांमुळे वैतागली होती. १६९९ मध्ये या येलला इंग्लंडला परत पाठविण्यात आले. त्याकाळी भारतातून मोठी कमाई करून इंग्लंडला परत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तिथे तुच्छतेने नवाब म्हटले जाई. कारण त्यांचा थाट भारतातील नवाबांसारखाच असे. भारतात कामासाठी जाणे म्हणजे मोठी लॉटरी लागण्यासारखेच इंग्लंडमध्ये समजले जात असे.

भारतातून कमाई करून गेलेला येल मग हे पैसे अनेक कामांना दान देऊ लागला. असेच दान त्याने अमेरिकेत तयार होत असलेल्या एका विद्यापीठाला दिले. या विद्यापीठाच्या उभारणीसाठी त्याने त्याकाळी ८०० डॉलर दिले म्हणून विद्यापीठाला त्याचे नाव देण्यात आले आणि हे विद्यापीठ येल विद्यापीठ म्हणून ओळखले जाऊ लागले.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required