computer

युट्यूबच्या माध्यमातून ६८०० कोटींचे घबाड भारतीयांच्या हाती लागले! वाचा ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचा रिपोर्ट!

सध्या एकूणच जगाचा आणि जगायचा पॅटर्न दिवसागणिक बदलतोय. एकेक करत रोजच्या जगण्यातल्या गोष्टी बदलत जात आहेत. सध्या डिजिटल क्रांतीच्या परिणामाने बदलाचा वेग वाढत आहे. रोजगार हा अतिशय कळीचा मुद्दा, तोदेखील यातून सुटलेला नाही. नोकरी-व्यवसाय यांच्या संकल्पना पूर्णपणे बदलल्या आहेत. लाखो-करोडो रुपयांचे भांडवल ओतून लोक कमवण्यापेक्षा जबरी आयडिया घेऊन, त्या विकून लोक करोडोंचे भांडवल बनवताना दिसत आहेत

युट्यूब हे या डिजिटल क्रांतीचे मोठे प्रतिक आहे. अगदी मोठ्या सेलब्रिटींपासून सामान्य लोकांपर्यंत सर्वांना युट्यूब हे पैसे कमावण्याचे सहज साधन झाले आहे. घरबसल्या कॅमेऱ्यासमोर बसून काहीतरी वेगळे जगाला दिले म्हणजे पैसे कमवण्याचा रस्ता मोकळा होतो आहे. यासाठी हातातला व्यवसाय किंवा नोकरी सोडण्याचीही गरज नसते. 

 युट्यूब लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरवत आहे, या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र त्यासाठी आधी युट्यूबवर जम बसायला हवा. 
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स यांनी एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे. युट्यूब कंटेंट ईकोसिस्टमने २०२० पासून भारतीय जीडीपीमध्ये ६,८०० कोटींचे योगदान दिले आहे. तर यातून तयार झालेला रोजगार हा तब्बल ६,८३,९०० इतका प्रचंड आहे. म्हणजेच या काळात युट्यूबवरून इतक्या मोठ्या संख्येने लोक पैसे कमवायला लागले आहेत. 

१ लाखाहून जास्त फॉलोअर्स असणाऱ्या चॅनेल्सची संख्या ही भारतात ४०,००० आहे. म्हणजेच या ४०,००० चॅनल्सशी संबंधित लोक चांगली कमाई करत आहेत. यात विशेष गोष्ट अशी आहे की भारतीय लोकांची चॅनेल्स भारताबाहेरील लोकही मोठ्या प्रमाणावर पाहतात, त्याचाही फायदा या चॅनेल्सना होताना दिसतो. एकूण चॅनेल बघणाऱ्या लोकांपैकी १५% वॉचटाईम हा बाहेरील देशांमधून आलेला असतो. 

यातही अजून एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गाणी किंवा संगीत संबंधित जे काही लहान मोठे चॅनल्स आहेत, त्यांना आपले गाणे देशाबाहेर घेऊन जाण्यात यातून मोठा फायदा झाला आहे. एकूण म्युझिक चॅनल्सपैकी ९५ टक्के लोक ही गोष्ट मान्य करतात. त्याचबरोबर युट्यूब पैसे कमवून देण्याबरोबरच पैसे वाचवण्यातही पुढेच आहे.

विद्यार्थी युट्यूबवरची फ्री ऑनलाइन लेक्चर बघून अभ्यास किंवा आपली असाइनमेंट पूर्ण करण्यासारखी कामे सहज करतात. याचा फायदा त्यांचे पैसे वाचण्यात होतो. युट्यूबवरून पैसे कमावण्याच्या बाबतीत वर्षभरातच ६०% वाढ नोंदविण्यात आली आहे. यावरून यात होणारी वाढ झपाट्याने होत आहे हे लक्षात येते. 

ही कमाई कशी होते?

  युट्यूब चॅनेलवर आलेल्या व्ह्यूजमधून गुगल पैसे देते, तसेच काही आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध ब्रँड्सची जाहिरात करतात या दोन्ही प्रकारांतून लोक कमाई करतात. चॅनेल मोठे होते तेव्हा लोक इतरांना नोकरी देऊन चॅनेल्स आपल्या कामाचा आवाका अजून वाढवतात. म्हणजे यातूनदेखील रोजगारात भर पडते. 

या रिपोर्टमध्ये असे देखील म्हटले आहे की, जे लघु आणि मध्यम उद्योगांना याचा मोठा फायदा होताना दिसतो. कारण त्यातून हे लोक थेट आपले प्रॉडक्ट लोकांपुढे भन्नाट कल्पना लढवून घेऊन जाताना दिसतात. कोव्हिड काळात तर यात भरच पडली. घरी बसून लोकांनी युट्यूब सुरू केले आणि कमाईचे साधन हाती लागले.
 

सध्या लोकांचा ओढा युट्यूबकडे जास्त आहे. ते मोफत आहे. टिव्हीपेक्षा हातात असलेल्या मोबाईलवर लोक अधिक अवलंबून असतात. त्यामुळे माहितीसाठी युट्युब हाच सर्वात मोठा स्त्रोत आहे. युट्यूब बघून कौशल्य आत्मसात करून पैसे कमवणाऱ्या लोकांची संख्या तर अजूनच जास्त भरेल. लॉकडाऊन काळात विविध स्किल्स शिकून व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांच्या कथा तुम्ही बोभाटावर वाचल्या असतील.

युट्यूब चे सर्वात मोठे योगदान म्हणजे अगदी लहानतल्या लहान खेड्यात असणारे लोक मोबाईल आणि इंटरनेटच्या साहाय्याने स्वतःचे टॅलेंट जगापुढे आणत आहेत. युट्यूब च्या माध्यमातून झालेली ही सर्वात मोठी क्रांती म्हटली पाहिजे.

पण वाचकहो, हे दिसतं तितकं सोपंही नाही. युट्यूबच्या 'मॉनेटायझेशन'साठी म्हणजे युट्यूबकडून पैसे मिळवण्यासाठी अनेक अटी-शर्ती पार कराव्या लागतात. अर्थात त्या अटी पूर्ण करण्यासाठी गुगल तुम्हाला मार्गदर्शन करतच असते.

तुमचे स्वतःचे युट्यूब चॅनेल असेल तर कमेंट बॉक्सध्ये लिंक टाका, बोभाटाच्या अनेक वाचकांचा तुम्हाला सहज सहभाग मिळेल!

 उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required