जड्डू कडे दुहेरी शतक झळकावण्याची संधी असताना कोणी केला डाव घोषित? स्वतः जड्डूने केला खुलासा
मोहालीच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने या सामन्यात मजबूत पकड बनवली आहे. भारतीय संघाने पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. या सामन्यात चर्चेत राहिला तो भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा. आपल्या तुफान फटकेबाजीने त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. परंतु दुहेरी शतक करण्याची संधी असताना रोहित शर्माने डाव घोषित केला. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर त्याने डाव घोषित करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात ८ गडी बाद ५७४ धावा केल्या. या डावात भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक १७५ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १७ चौकार आणि ३ षटकार मारले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ झाल्यानंतर रवींद्र जडेजाने खुलासा करत म्हटले की, "मी संघाला डाव घोषित करण्याचा संदेश दिला होता कारण त्यावेळी श्रीलंकेचे खेळाडू खूप थकले होते आणि आम्हाला त्यांना बाद करण्याची संधी होती."
भारतीय संघाने पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला होता. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने आतापर्यंत ४ गडी बाद १०८ धावा केल्या आहेत. श्रीलंका संघाकडून थिरीमानेने १७ धावा केल्या. तर करुणारत्नेने २८ आणि मॅथ्यूजने २२ धावा केल्या.




