computer

१९७०साली व्हेलची डायनामाईटने लावलेली विल्हेवाट आणि कोरोनासंबंधीची काळजी. काय संबंध आहे या दोन घटनांचा?

कोरोनाव्हायरसपासून स्वतःचं रक्षण कसं करावं याबद्दल सरकारी यंत्रणा तसेच तज्ञ मंडळी वेळोवेळी सांगतच असतात. इंग्लंडच्या यॉर्कशायर येथील डाँकस्टर परिषदेने जनजागृतीसाठी एक हटके मार्ग निवडला आहे. त्यांनी १९७० साली घडलेल्या एका घटनेतून कोरोनाव्हायरस बद्दल ३ मुख्य बाबी समजावून सांगितल्या आहेत. या ३ बाबी महत्त्वाच्या तर आहेतच, पण ती घटनाही रंजक आहे. चला तर वाचूया.

१९७० साली अमेरिकेच्या ओरेगॉन येथील किनाऱ्यावर एक मृत व्हेल मासा आढळला होता. माशाचा मृतदेह कुजत होता. लवकरात लवकर त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडे ३ पर्याय होते.

१. नैसर्गिक पद्धतीने त्याचं विघटन होऊ द्यायचं.
२. त्याचे तुकडे करायचे आणि ते पुरायचे.
३. डायनामाईटने स्फोट घडवून माशाचा निकाल लावायचा.

अधिकाऱ्यांनी चक्क तिसरा पर्याय निवडला. तब्बल अर्धा टन डायनामाईट आणण्यात आलं. हे प्रमाण घातक ठरू शकतं असा तज्ञांनी सल्ला होता, त्याकडे अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केलं. त्याचे काय परिणाम झाले हे पुढे संपूर्ण जगाने बघितलं.

ही घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले होते. जेव्हा स्फोट झाला तेव्हा व्हेलच्या कुजलेल्या मांसाचे तुकडे या बघ्यांच्या अंगावर पडले. एवढंच नाही तर मांस आणि चरबीचे तुकडे वाहनांवर पडल्यामुळे अपघात घडले. असं म्हणतात की मांसाचे तुकडे तब्बल ८०० फुट लांब फेकले गेले होते. त्यादिवशी सडक्या मांसाचा पाऊस पडत होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

एकूण काय, तर एका चुकीच्या निर्णयामुळे समस्या भयंकर वाढल्या. या गोष्टीतून डाँकस्टर परिषदेला कोरोनाव्हायरसच्या संदर्भात काय सुचवायचं आहे ते पाहू या.

१. तज्ञ मंडळी सल्ला देत असतील तर तो ऐका.
२. कधी कधी घरात बसून राहणं बाहेर जाऊन समस्या ओढवून घेण्यापेक्षा सुरक्षित असतं.
३. तज्ञांचा सल्ला न ऐकता मूर्खपणा केला तर तुम्ही इतरांचा जीव धोक्यात घालता.

एकंदरीत तज्ञांचं ऐका आणि घरी राहा. स्वतःचा आणि इतरांचाही जीव वाचवा, हेच त्यांना सांगायचं आहे. जाता जाता या घटनेचा व्हिडीओ पाहून घ्या. यावर्षी या घटनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत.

सबस्क्राईब करा

* indicates required