कोविडची लागण, फुफ्फुसांची चाळण!! लसीकरण गांभीर्याने घेतलं असतं तर कदाचित हे टळलं असतं!!

एप्रिलमध्ये कोविडची जी दुसरी लाट अनुभवली, ती परत कधीच येऊ नये. तेव्हा जी गंभीर परिस्थिती आजूबाजूला होती ती कधीच विसरता येणार नाही. लॉकडाऊन जरी संपले असले, निर्बन्ध उठले असले तरी टांगती तलवार आहेच. त्यासाठी लसीकरण किती महत्वाचे आहे हे वारंवार सांगितले जाते. पण अजूनही लसीकरणासाठी कित्येक जण उत्सुक नाहीत. याचे कारण या लोकांना कदाचित भीती नाही किंवा निष्काळजीपणा. हा विषाणू फुफ्फुसे निकामी करतो. जॉर्जियातील एका २५ वर्षाच्या तरुणाला या विषाणूमुळे खूप काही भोगावे लागले आहे. त्याच्या फुफ्फुसांत अक्षरशः बबलगमसारखे तुकडे झाले आहेत. त्यासाठी त्याला दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपणही करावे लागले आहे.

जॉर्जियातील ब्लेक बार्गेट्झ याला एप्रिलमध्ये कोविड विषाणूची लागण झाली. तो अवघा २५ वर्षांचा आहे. त्यापूर्वी त्याला कुठलेही शारीरिक आजार नव्हते. आरोग्याची कोणतीही समस्या नव्हती. पण विषाणूचा संसर्ग झाल्यावर परिस्थिती बिकट झाली आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल व्हावे लागले. त्याला श्वास घेणे अशक्य झाले होते. डॉक्टरांनी त्याच्या फुफ्फुसांची परिस्थिती सांगताना सांगितले की कोरोना व्हायरसमुळे ते एखाद्या चाळणीसारखे झाले आहे. त्याला खूप छिद्रं होती. बाहेर काढल्यावर ते एखाद्या बबलगमचे तुकडे चघळल्यासारखे दिसले. त्याला जगवायचे असेल तर फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करावे लागेल. त्यासाठी खर्च ही मोठा होणार होता. कुटुंबाने त्यासाठी GoFundMe पेज तयार केले आणि आर्थिक मदतीसाठी आवाहन केले. सगळे प्रयत्न झाल्यावर अखेर जूनमध्ये त्याची यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया झाली.

खूप मोठया संकटातून तो थोडक्यात वाचला. त्यासाठी तो देवाचे आभार मानतो. एका कार्यक्रमात त्याला विषाणूची लागण झाली होती. त्याने मास्क घातला होता, पण त्याचे लसीकरण झाले नव्हते. तो म्हणतो, "मी तेव्हा लसीकणारसाठी फार उत्सुक नव्हतो, कदाचित मी ते केले असते तर ही परिस्थिती आली नसती" दिवसाला ५० गोळ्या त्याला खाव्या लागल्या आहेत. ब्लेक फार कमी भाग्यवंतांपैकी आहे जो यातून सुखरूप बाहेर पडला. त्याने बरं झाल्यावर लसही घेतली आहे. नेहमीचे आयुष्य सुरू झाल्यामुळे तो आता खुश आहे. आता तो सर्वांना लसीकणारसाठी आवाहन करत आहे. लसीकरणाचे महत्व आहे हे पटवून देत आहे.

आजही खूप मोठा समाज लसीकरण टाळत आहे. लसीकरणानंतर संसर्ग होऊ शकतो, पण त्याची तीव्रता खूप कमी असेल हे सिद्ध होत आहे. कदाचित हे वाचल्यावर, लसीकरण किती गांभीर्याने घेतले पाहिजे याची कल्पना त्यांना येईल.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required