computer

अन्नपदार्थांना वेगळी चव देणाऱ्या काजूचे हे ५ फायदे माहित आहेत का?

ड्रायफ्रुट्स म्हणजे सुकामेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यातही असे काही ड्रायफ्रुट्स आहेत, जे आपण अगदी रोजच्या पदार्थांमध्येदेखील वापरतो. सणासुदीला बनवली जाणारी मिठाई असली की त्यात बदाम,काजू, बेदाणे, चारोळी हवेतच. सुक्यामेव्याबद्दल जेव्हाही बोलले जाते तेव्हा काजूला खूप महत्व आहे. काजू म्हणजे सुक्या मेव्याचा राजा. गोड-तिखट कोणत्याही पदार्थांत काजू चपखल बसतो. पुलाव, बिर्याणी, चिकन, पंजाबी भाज्या, मिठाईचे पदार्थ या सगळ्यांमध्ये काजूचा गर वापरला जातो. काजू हा मूळचा ब्राझिलचा पण आता आपलाच वाटावा इतका तो कोकणात रुजला आहे. गोव्यात गेले तर काजू घेतल्याशिवाय कोणी परत येत नसेल. पण काजूचा वापर केवळ पदार्थांत होतो असे नाही, तर शरीराच्या अनेक समस्या कमी करण्यात देखील काजू महत्त्वाचा ठरतो. आज जाणून घेऊया काजू खाण्याचे फायदे.

डोळ्यांचे आरोग्य:

काजूमध्ये डोळ्यांचे संरक्षण करणारे झेक्झॅन्थिन (zeaxanthin) आणि ल्युटीन(lutein) असतात. ल्युटीन हा व्हिटॅमिनचा एक प्रकार आहे. त्यामुळे डोळ्यांचे मोतीबिंदू पासून संरक्षण होते. जसे आपल्या त्वचेला सूर्यकिरण त्रासदायक ठरतात तसाच डोळ्यांनाही प्रदूषण आणि प्रखर सूर्य किरणांमुळे संसर्ग होतो. डोळयातील पडदाही खराब होऊ शकतो. काजूंमध्ये झेक्सॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट असते, जे डोळयातील पडद्याद्वारे शोषले जाते आणि डोळ्यांचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करते.

वजन कमी करण्यासाठी:

काजू खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक असलेले फॅट मिळण्यास मदत होते. पण वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास तंतुमय पदार्थ चांगले, आणि काजूमध्ये भरपूर तंतू असतात. अशा पदार्थांमुळे पोट भरल्यासारखे वाटते. काहीही खाण्याची इच्छा होत नाही. याशिवाय काजूमध्ये असलेले मॅग्नेशीअम पचनशक्ती वाढवते. यामध्ये असलेली कार्बोदके वजन कमी करण्यास मदत मिळते. काजू योग्य प्रमाणात खाल्ले तर वजन कमी करण्यास मदत मिळते. काजू कच्चे खाणे जास्त चांगले, भाजून किंवा तळून खाल्यास कॅलरीज जास्त वाढतात.

त्वचा आरोग्य:

काजूमध्ये जस्त, लोह, फॉस्फरस खच्चून भरलेले असते. यासोबतच काजूमध्ये प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट घटक असतात. हे घटक त्वचेसाठी खूप चांगले असतात आणि सुरकुत्याही कमी येतात. त्यात सेलेनियम सुद्धा असते ज्यामुळे फ्री रॅडिकल्समुळे होणारे त्वचेचे नुकसान वाचते. तसेच सेलेनियममुळे कर्करोगापासूनही रक्षण होते. खूप ठिकाणी काजूच्या गरापासून तेल काढले जाते. या तेलाचा वापर केसांसाठी आणि त्वचेसाठीही केला जातो. त्वचेसाठी हे तेल वापरल्यास त्वचाही तजेलदार दिसू लागते.

केसांच्या वाढीसाठी:

चमकदार केसांसाठी असलेला महत्वाचा घटक म्हणजे तांबे. काजू तेलामध्ये असलेले तांबे त्वचा आणि केसांमध्ये असलेले मेलानिन तयार करतात. या मेलानिनमुळे केसांचा रंग काळा राहण्यास मदत होते. तसेच मेलानिन केस अकाली पांढरे होण्यापासून वाचवते. तेलामध्ये मुबलक प्रमाणात लिनोलिक (linoleic) आणि ओलिक ऍसिड (oleic acids)असते, ज्यामुळे केसांची वाढ छान होते. केसांना चमक मिळून ते दाट होण्यास मदत होते.

आपल्या नेहमीच्या सुक्यामेव्यातल्या या घटकात इतके फायदे असतात हे तुम्हांला माहिती होते का? ही माहिती तुम्हांला कशी वाटली, आवडल्यास नक्की शेअर करा.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required