computer

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रोजच्या आहारात असायलाच हवेत असे ५ अन्नपदार्थ!!

'रोगप्रतिकारशक्ती' हा शब्द गेले वर्षभर खूप वेळा तुम्ही ऐकलाच असेल. पण फक्त कोविडविरुद्ध ही रोगप्रतिकारशक्ती महत्त्वाची आहे असे नाही, तर सर्व व्याधींविरोधात लढण्यासाठी आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. ही शक्ती एक दोन दिवसांत तयार होत नाही, तर हळूहळू शरीरात ती निर्माण होत असते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारशक्ती फक्त खाण्यावर अवलंबून नसते तर तुमची जीवनशैली म्हणजे तुम्ही खात असलेले अन्नपदार्थ, झोप, व्यायाम, मानसिक आरोग्य यांवर देखील अवलंबून असते.

चांगली झोप, उत्तम आहार आणि व्यायाम या तीन गोष्टी रोगप्रतिकारकशक्ती समतोल राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक असतात. आजच्या लेखातून आपण आहार या विषयावर बोलणार आहोत. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारात असयलाच हवेत अशा ५ पदार्थांची यादीच आम्ही आणली आहे. चला तर पाहूया.

१. आवळा

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व असते. क जीवनसत्व हे अँटिऑक्सिडेंट आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे जीवनसत्व आहे. क जीवनसत्वामुळे मुळे एंटीबॉडीचा प्रतिसाद वाढतो तसेच पांढऱ्या रक्त पेशींचे कार्य वाढण्यास मदत होते. आवळ्यात अँटीऑक्सिड भरपूर असल्याने तो आहारात असणे आवश्यक आहे. बहुतेक आयुर्वेदिक पदार्थामध्ये आवळा वापरला जातो. 'रोगप्रतिकारशक्ती बूस्टर' म्हणून आवळ्याचे पदार्थ उपयोगी पडतात.

आवळ्याचे पदार्थ - लोणची, चटणी, रस, कँडी, मुरब्बा, च्यवनप्राश.

२. शेवगा

शेवगा ही किरकोळ वाटणारी भाजी जवळजवळ सगळीकडे उपलब्ध असते. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण शेवग्यात जवळजवळ ९० बायोएक्टिव संयुगे(compund) असतात. आणि त्याचबरोबर प्रत्येक जीवनसत्व आणि खनिजे असतात. यात अँटिऑक्सिडेंट्सचे प्रमाण खूप जास्त असते. याखेरीज जीवनसत्त्व ब १, ब २ आणि ब ३ ही असतात. याच्या शेंगा जश्या उपयोगी असतात तसेच पानेही औषधी असतात. शेवग्याच्या पानांत अ‍ॅमिनो आम्ले, क जीवनसत्व आणि इतर अँटीऑक्सिडेंट असतात.

शेवगा एखाद्या शक्तिशाली नैसर्गिक मल्टीव्हिटॅमिनपेक्षा कमी नसतो. यात प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, क्रोमियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, झिंक हे सारे घटक मुबलक प्रमाणात असतात. सर्दीवर उपाय म्हणून शेवग्याची फुले ही काढ्यात घालून दिली जातात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शेवगा हा एक सर्वोत्तम पर्याय आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

शेवग्याचा उपयोग -  सूप, भाजी, सांबार, पावडर, रस.

 

शेवग्यावर आणखी सविस्तर वाचण्यासाठी आमचा हा लेख जरूर वाचा:

शेवग्याच्या पाने: पुराणकथा ते स्वस्त-सहज उपलब्ध असा हिमोग्लोबिन आणि क्षयरोगावरचा उपाय!!

३. रताळे

रताळे हे स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेले प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी एक सुपरफूड आहे. यात क जीवनसत्व, जीवनसत्व ब ५ आणि ७ भरपूर प्रमाणात असतात. यात असलेले अँथोसायनिन्स आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कर्बोदकेयुक्त फळ असल्याने शरीरात ऊर्जा तयार होते. यात फायबर मुबलक प्रमाणात असल्याने ते आतड्याचे आरोग्य सुधारते, तसेच वजन कमी करण्यासाठी देखील फायबरचा उपयोग होतो.

रताळ्याचा वापर - सूप, पराठे, नुसता उकडूनही खाल्ला जातो.

४. आंबा

फळांचा राजा आंबा हे सर्वांचे लाडके फळ. आबालवृद्धांना आवडणाऱ्या या फळात आरोग्यासाठी पोषक असे अनेक गुणधर्म आहेत. आंब्यात भरपूर क जीवनसत्व असते. तसेच अ जीवनसत्व, इ जीवनसत्व, बीटा-कॅरोटीन, पोटॅशियम, ड जीवनसत्व, बहुतेक सर्व ब जीवनसत्त्वे (ब १२ वगळता) समाविष्ट आहेत. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी याची खूप मदत होते.

आंब्याचा वापर -  संपूर्ण पिकलेले फळ, रस, जॅम, आईस्क्रिम. कच्च्या कैरीचे लोणचे, पन्ना, चटण्या असे अनेक पदार्थ.

५. भोपळा

भोपळा ही जरी कंटाळवाणी भाजी असली तरी यात अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्व ए, सी आणि ई यांचे भरपूर प्रमाण असते. यात असणारे अ जीवनसत्व हे दाह-विरोधी असून त्याचा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयोग होतो. एक लक्षात ठेवायला हवे, ते हे की भोपळा जुना झाल्यावर कडवट होऊन विषारी होऊ शकतो त्यामुळे नेहमी ताजा वापरावा.

भोपळ्याचा उपयोग - भोपळा सूप, भाजी करणे, हलवा, रस.

 

असे हे पाच रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे अन्नपदार्थ रोजच्या आहारात वापरले तर कोणत्याही रोगाशी सामना करण्यास सज्ज होता येईल.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required