computer

२०२१ ने शिकवलेल्या या ७ गोष्टी आपण नेहमीसाठी अंगी बाणवायला हव्यात!!

चला आता २०२१ ला गुड बाय म्हणण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे. २०२० संपलं आणि त्यानंतर २०२१ ही! २०१९ च्या शेवटानंतर या एकाच वर्षात जग पूर्ण १८० अंशात बदलेल असं जर कुणी सांगितलं असतं तर त्याला भोंदू म्हणून खुळ्यात काढलं असतं. पण प्रत्यक्षात एका वर्षात आपल्या भोवतालाचा जो कायापालट झाला आहे तो पचवणं‌ अजूनही कित्येकांना जड जात आहे. तरीही सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षाने आपल्याला नेमकं काय दिलं याचा लेखाजोखा तर मांडलाच पाहिजे. तर सरत्या वर्षाने आपल्यात सामूहिकरित्या काही नवे धडे शिकवले आहेत आणि काही चांगल्या सवयी रुजवल्या आहेत, ज्या आपल्याला कायमच्याच स्वीकारायच्या आहेत. तर पाहूया या सवयी काय आहेत ज्या आपल्याला येत्या काळातही अवलंबायच्या आहेत.

महामारीच्या या काळात आपण सर्वांनी शिकलेला एक महत्वाचा धडा म्हणजे स्वत:ला आहे तसं स्वीकारणं आणि स्वतःवर प्रेम करणं. या काळातील तणाव झेलण्यासाठी हा एक महत्वाचा गुण ठरला आहे, हे आपण सर्वांनी मान्य करायला हवं. ओमिक्रोनचा वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा आपल्याला आपापल्या घरातच डांबून राहावं लागू शकतं. अशा अवघड काळात आपल्याला आपल्यातील सुप्त गुणांवर काम करण्याची गरज आहे. स्वतःवर प्रेम करण्याची ही कला आपल्याला नेहमीसाठी जतन करायची आहे. या काळात अनेकांनी आपले प्रियजन गमावले, काहींना आर्थिक फटका बसला, काही जणांची नोकरी गेली, तरीही हे सगळे फटके आपण सोसले. आपल्याच लोकांपासून दूर राहण्याचाही अनुभव घेतला. त्यामुळे बिकट काळात आपण स्वतःच स्वतःला कसा धीर देऊ शकतो हेही आपल्याला कळालं आहे. या काळात आपण स्वतःची काळजी कशी घ्यावी, हे शिकलो, पुरेशी झोप आणि सकस आहाराची किंमत आपल्याला कळाली.

आळशीपणामुळे म्हणा किंवा रोजच्या दगदगीमुळे म्हणा, आपण आपल्याला आपल्या शरीराकडे आणि मनाकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नव्हता. आता या दोन्ही गोष्टींचे महत्व आपल्या लक्षात आलं आहे. योगासन, ध्यान, विपश्यना यापैकी एक तरी सवय आपण प्रत्येकाने उचलली आहे, तर येत्या काळातही ही सवय आपल्याला उपयोगीच ठरणार आहे.

या काळात आपल्याला एकमेकांच्या उपयोगी पडण्याची, मदतीला धावून जाण्याची, एकमेकांच्या अडचणींवर उपाय शोधण्याची, एक चांगली सवय लागली आहे. ही सवयही आपल्याला येत्या काळात अशीच सुरू ठेवायची आहे. पुन्हा एकदा हा कोरोना नव्या अवतारात हाहा:कार माजवायला येत आहे तर आपणही त्याला हरवायला सज्ज व्हावंच लागेल. या गुणांसह आपण एक सशक्त ‌समाज निर्माण करण्याकडे वाटचाल‌ करत आहोत. या सगळ्यांमुळे माणुसकीचा झरा पुन्हा वाहू लागला आहे तो आपल्याला असाच पुढे न्यायचा आहे. या काळात तर प्रत्येकाशी बोलतानाही आपला टोन कसा आहे इथपासून आपण त्या व्यक्तीला काही मदत करू शकतो का यावर विचार करण्याची आणि ती अंमलात आणण्याची सवय लावून घेतली. ही सवय आपण कायमची स्वीकारली तर इतरांसह स्वतःसाठीही फायद्याची ठरेल.

जिथे गरज आहे तिथे वेळ देण्यापेक्षा इतर ठिकाणी वेळ खर्च केल्याने नंतर येणारा ताण किती भयानक असतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या वर्षात प्राध्यान्यक्रमाची कामं कुठली आणि वेळखाऊ टाईमपास कामं कुठली हेही आपल्याला कळून चुकलं. वेळेचा अधिक अचूकपणे वापर करून आपले प्रत्येक काम प्रभावीपणे कसे करता येईल यासाठी आपण आपल्या कामाची यादी बनवणं, त्यासाठी किती वेळ द्यायचा याचे नियोजन करणं, ठरवलेले काम ठरलेल्या वेळेत उरकणं, इतरांना दिलेला शब्द पाळणं आणि शक्य नसेल तर नाही म्हणनं याही गोष्टी आपल्या अंगवळणी पडल्या असतील तर चांगलेच आहे. क्षुल्लक आणि फालतू गोष्टींना नाही म्हणण्याची कला जर तुम्ही याकाळात आत्मसात केली असेल तर ती तशीच असू द्या. कारण अयोग्य गोष्टींना योग्य वेळी नाही म्हणता आलं तर पुढचे कित्येक अनर्थ टाळतात.

महामारीच्या काळात आपण अनेकांनी आपले छंद पुन्हा नव्या जोमाने जोपासायला सुरुवात केली. काहींनी नवनव्या गोष्टी शिकण्याला प्राधान्य दिले. आपल्यातील कलागुणांना वाव दिला. आपल्यातील सुप्त गुण शोधले. तुम्हीही हे केलं असेल तर पुढच्या वर्षीही हे छंद, या कला अशाच जोपासण्याची प्रतिज्ञा करा. यानिमित्ताने आपल्याला आपलीच नव्याने ओळख होते आणि हा अनुभव खूपच मजेशीर असतो.

या काळात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कमी काळात जास्त चढ-उतार अनुभवले. हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी चिकाटी किती महत्वाची असते हेही आपल्याला या काळाने शिकवलं, पुढच्या आयुष्यातही हा गुण आपल्याला हवाच आहे.

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हात धुणं, मास्क वापरणं आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर राखणं. तर येत्या काळात या सगळ्याच छोट्या-मोठ्या सवयी आपल्याला टिकवून ठेवायच्या आहेत. कोरोना सोबत जगताना या सवयीच आपल्याला तारून नेणार आहेत.

मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required