computer

BF.7 कोव्हीडच्या विषाणूचा नवा अवतार - घाबरू नका पण सावध रहा,सतर्क राहा!

चीनमध्ये पुन्हा एकदा कोव्हीडचा संचार सुरु झाल्याच्या बातम्यांनी गेल्या चार दिवसात जगाच्या इतर भागात आणि अर्थातच भारतात भीतीचा संचार झाला आहे. ही भीती  केवळ मानसिक आहे की आपण खरोखर सतर्क व्हायला हवे आहे हे समजून घेणे हा या लेखाचा उद्देश आहे.

 हा नवा विषाणूचा प्रकार काय आहे ?
गेल्या वर्षी ओमायक्रॉन या कोव्हीडच्या विषाणूचा अवतार तुम्हाला आठवत असेलच. त्याच ओमायक्रॉनची सुधारित नवी आवृत्ती म्हणजे हा नवा विषाणू आहे. अशा विषाणूंना सब व्हेरिअंट अशी संज्ञा आहे.म्हणजेच मुळ जातकुळी कोव्हीडचीच पण नवा अवतार म्हणजे पोटजात असे म्हणायला हरकत नाही.प्र्त्येक जिवंत पेशीत म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन होत असते. हा निसर्गक्रम आहे. हे उत्परिवर्तन वेगाने होत असेल तर काळजी करण्याची गरज असते.हे उत्परिवर्तन थांबवणे पूर्णतःआपल्या हातात नसते.त्या उत्परिवर्तीत विषाणूचे गुणधर्म अभ्यासून नेमकी काळजी घेणे हेच श्रेयस्कर असते. 

म्हणजे हा नेमका कोणता  सब व्हेरिअंट आपल्याला पिडण्याची शक्यता आहे ?


२०२१साली दक्षिण आफ्रीकेत ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणू प्रकाराचा उदभव झाला. त्या सब व्हेरिअंटचा पुढचा प्रकार म्हणजे ba.5  आला. आता ba.5 चा नवा व्हेरिअंट म्हणजे bf.7 ! थोडक्यात नवी उत्परिवर्तीत आवृत्ती !
हा नवा अवतार वेगाने पसरणारा आहे. त्याचे पुनरुत्पादन होण्यासाठी लागणारा वेळ कमी आहे. या दोन्हीमुळे प्रसार वेगाने होण्याची शक्यता (तूर्तास शक्यताच म्हणू या !) आहे. त्याचा रिप्रॉडक्शन नंबर १० ते १८.६ आहे. याचा अर्थ असा की एखाद्या माणसाला याची लागण झाली तर त्यामुळे तो इतर १० ते १८ माणसांना ती लगण देऊ शकतो. 

आपल्याकडे हा नवा विषाणू bf.7 आला आहे का ?


गुजरातमधील प्रयोगशाळेने हा विषाणू ३ महिन्यांपूर्वी आढळल्याची नोंद केली आहे.त्यामुळे कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही.त्यामुळे घाबरून जायला नको पण 
अ-लक्षणदर्शी (asymptomatic) म्हणजे लागण होऊनही लक्षणे न दाखवणारे रुग्ण असू शकतात . 

असे असेल तर चीनमध्ये घबराट का पसरली आहे?


चीनमध्ये घबराट पसरण्याची २ म्हत्वाची कारणे आहेत.
१ चिनी सरकारने राबवलेल्या झिरो टोलरन्स धोरणामुळे जनतेत रोगाला विरोध करण्याची नैसर्गिक क्षमता कमी झाली आहे. यामध्ये वृध्दांचे प्रमाण अधिक आहे.
२ चिनी सरकारने बनवलेले व्हॅक्सिन आपण किंवा जगात इतरत्र बनवल्र्ल्या व्हॅक्सिनपेक्षा दुर्बळ आहे. या व्हॅक्सिनची विरोध करण्याची क्षमता ५४% आहे. 

आपल्याकडील परिस्थिती कशी वेगळी आहे ?


१ आपल्या देशात व्हॅक्सिनचे २२० कोटी डोजेस वापरले गेले आहेत.
२ आपल्या व्हॅक्सिनची रोगाला विरोध करण्याची क्षमता अधिक आहे. 
३ बर्‍याच लोकांना नकळत रोगाची लागण होऊन ते बरे झाले आहेत. त्यामुळे 'हायब्रिड इम्यूनिटी' समाजात तयार झाली आहे .

तर मग आपल्याला घाबरण्याचे कारणच नाही असे समजायचे का ?

 

.कोणत्या विषाणूला गृहित धरून चालणे फारच घोडचूक ठरते. आधी सांगीतल्याप्रमाणे उत्परिवर्तीन फारच वेगाने होऊ शकते.हा रोग आहे. हा विषाणू नवा आहे. त्यामुळे सतर्क आणि सावध राहणे आणि आरोग्याच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रोगाची लक्षणे आहेत तीच आहेत. इतर रोग जसे मधुमेह वगैरे असणार्‍यांना धोका अधिक आहे. तेव्हा मंडळी योग्य ती काळजी घ्या इतकेच आता सांगणे योग्य असेल 

सबस्क्राईब करा

* indicates required