computer

मृत्युचं थैमान घालणारा 'चमकी बुखार' आहे तरी काय ? तो बालकांचेच बळी का घेतो ?

गेला महिनाभर बिहारमधल्या मुझफ्फरपूर शहरातले सरकारी श्रीकृष्ण हॉस्पिटल आक्रोशाने भरून गेलेय. चमकी बुखारच्या साथीने १००हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे आणि हे बालमृत्यूचे थैमान थांबण्याचे नाव घेत नाही आहे.  AES ॲक्युट इन्सफेलायटीस सिंड्रोम म्हणजे चमकी बुखार या रोगाची साथ पुन्हा एकदा पसरली आहे. पुन्हा एकदा म्हणण्याचं कारण की गेली अनेक वर्षे हा रोग इकडे थैमान घालतो आहे. अचानक येणारा ताप, त्यानंतर आकडी आणि काही तासांतच मृत्यू असे स्वरूप असलेला हा चमकी बुखार म्हणजे मेंदूला सूज येण्याचा आजार आहे.

स्रोत

AES ऍक्युट इन्सफेलायटीस हे या आजाराचे फारच ढोबळ वर्णन आहे. हा आजार फक्त इन्सफेलायटीस नसून तो मेनेनजायटीस, इन्सलोपॅथी किंवा सेरेब्रल मलेरिया असा काहीही असू शकतो. AES हा सर्वसाधारण मेंदूचा कोणताही आजार दर्शवणारा शब्द आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या मेंदूज्वराचा नेमके निदान करणे खूप आवश्यक आहे.

पण एका प्रश्नाचे उत्तर अजूनही सापडत नाही, तो म्हणजे प्रत्येक वेळी हा आजार याच दरम्यान का येतो? तो बालकांचेच बळी का घेतो आणि शेवटचा प्रश्न ह्या आजाराला प्रतिबंध करायला आरोग्य यंत्रणा का कमी पडते आहे?

कारणे बघायची झालीच तर ती अशी एक नाहीत. पण अनेक कारणं एकत्र आहेत.

-कुपोषण
-उन्हाचा तडाखा आणि
-लिचीसारख्या फळांवर ताव मारणे.

लिची फळांमुळे असा होतो बालकांचा मृत्यू ?

पहिली दोन कारणे सार्वत्रिक आहेत.  पण शेवटचे कारण कुपोषणाशी निगडीत आहे. या मोसमात या भागात लिचीचे पीक येते. उपाशी आणि कुपोषित मुलं शेतात या फळावर ताव मारतात. लिचीमधल्या एका घटकामुळे रक्ताची शरीरात साखर ग्रहण करण्याची ताकद कमी होते. आधीच ही मुलं कुपोषित असतात. लिचीमुळे रक्तात साखर कमी उतरते. हे साखर कमी असलेले रक्त मेंदूची साखरेची मागणी पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मेंदूला सूज येते. मेंदूला सूज आली की आकडी यायला सुरुवात होते. आकडी आली की मेंदूचे इतर कार्य थांबते. रक्तातले सोडियम पोटॅशियमचे प्रमाण बिघडते. मुलं बेशुद्ध पडतात आणि काही तासांतच मृत्यू होतो!!!

बिहारच्या या भागात ही साथ पहिल्यांदा आली आहे असे नाही.  २००५,२०१२, २०१३ आणि २०१४ मध्येही ही साथ आली होती. २०१४ च्या एका वर्षात सातशेहून अधिक मृत्यू या आजाराने झाले आहेत. आता २०१९ मध्येसुद्धा तशीच परिस्थिती आहे.  पण लिचीच्या अतिसेवनामुळे असे काही होते ही थिअरी आता मागे पडते आहे. जेव्हा दिवसभरात सतत ३८ अंशापेक्षा जास्त तापमान आणि बाष्पाचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक वाढले, त्यादिवसांत हा रोग बळावताना दिसतो आहे. थोडक्यात, कारणे शोधण्यातला गोंधळ अजूनही आहेच.

आजारी पडलेली मुलं हॉस्पिटलमध्ये पोहचण्यासाठी लागणारा वेळ ही पण एक चिंतेची बाब आहे. हा ताप सर्वसाधारणपणे संध्याकाळी ४ ते ७च्या तासांमध्ये येतो. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार होईपर्यंत रुग्ण बेशुध्द पडतो किंवा त्याला आकडी येते. प्रत्यक्षात श्रीकृष्ण मेडिकलसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहचता-पोहचता ६ ते ७ तासांचा उशीर झालेला असतो. हा उशीर रुग्णाच्या जीवावर बेततो.

बिहारमधले सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे ढिसाळ व्यवस्थापन यात भर घालते. एकाच वेळी आलेल्या अनेक रुग्णांना सामावून घेण्याची कमतरता, ऐनवेळी असणारी औषधांची अनुलब्धता, आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची कमतरता या सगळ्याचा एकत्र परिणाम म्हणजे मृत्यूची लाट!

हे टाळण्यासाठी कुपोषणाचा मुद्दा आधी राज्य पातळीवर सोडवणे ही पहिली पायरी असेल.पण आलेली साथ मावळली की पुढची साथ येईपर्यंत व्यवस्थेला येणारी मरगळ ही खेदाची गोष्ट आहे.