computer

केसगळती, ॲलोपेशिया आणि ऑस्कर २०२२ मधली गाजलेली थप्पड!! हा आजार नेमका काय आहे, का होतो आणि त्याचे परिणाम काय?

यंदाच्या, म्हणजेच २०२२च्या ऑस्कर सोहळ्यातला सर्वाधिक रंगतदार क्षण कोणता? विल स्मिथ याला 'किंग रिचर्ड'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तो? नाही. तुम्ही हा सोहळा पाहिला असेल, तर काहीही विचार न करता तुमचं उत्तर तयार असेल - ज्या क्षणी विल स्मिथने सूत्रसंचालक ख्रिस रॉक याच्या श्रीमुखात भडकावली तो क्षण!! आणि हो, हा प्रसंग सोहळ्याची रंजकता वाढवण्यासाठी निर्मिलेला खोटाखोटा प्रसंग नव्हता, तर ती थप्पड आणि त्यामागचा संताप अगदी वास्तव होतं. आणि (कदाचित) म्हणूनच हा प्रसंग जास्त नाट्यमय वाटला.

ख्रिस रॉकने मार खायला त्याचा आगाऊपणाच कारणीभूत ठरला. विल स्मिथची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ हिच्या केस गळण्यावरून क्रिस रॉक याने ऑस्करसारख्या जागतिक पातळीवरच्या जाहीर समारंभात टीकाटिप्पणी केली. स्मिथचं पित्त खवळलं ते यामुळेच.

जेडा पिंकेट पन्नास वर्षाची आहे आणि गेल्या काही काळापासून ती ॲलोपेशिया या विकाराने त्रस्त आहे. सामान्यांना समजेल अशा भाषेत बोलायचं तर ॲलोपेशिया म्हणजे एक प्रकारचं टक्कल. मराठीमध्ये याला चाई पडणं असं म्हणतात. यामध्ये शरीरात दीर्घकाळ दाह होऊन त्याचा केशमुळांवर परिणाम होतो आणि केस गळायला लागतात. यामध्ये कधीकधी ठराविक भागातले सर्व केस गळून जातात आणि त्या ठिकाणी छोटे गोलाकार पॅचेस तयार होतात. याला ॲलोपेशिया ॲरियाटा असं म्हणतात. २० ते ४० वयोगटाच्या तरुणांमध्ये हा विकार जास्त करून आढळून येतो. कधी कधी संपूर्ण टाळूवरचे केस गळतात. याला ॲलोपेशिया टोटॅलिस असं नाव आहे.

याची कारणं काय?
ॲलोपेशिया या विकाराचं एक असं निश्चित कारण नाही. अनेक घटक यासाठी जबाबदार आहेत. यामध्ये अनुवंशिकतेचा वाटा मोठा आहे. ताणतणाव हा अजून एक घटक आहे. पण याचा अर्थ असा नाही, की ताणतणाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हा त्रास होतो.
यासाठी कारणीभूत असलेला एक अतिमहत्त्वाचा घटक म्हणजे ऑटोइम्युन प्रतिसाद. यामध्ये व्यक्तीची प्रतिकारयंत्रणा म्हणजेच इम्युन सिस्टीम केशमुळांना बाह्य घटक किंवा फॉरेन बॉडी समजून त्यांच्यावर हल्ला करते. यामध्ये केसांच्या मुळांचं नुकसान होऊन केस गळतात.

यावर उपचार कोणते?
मुख्यतः कोणत्या प्रकारचा ॲलोपेशिया आहे आणि केस किती प्रमाणात गळत आहेत, यावरून उपचारांची दिशा ठरवता येते. जर ॲलोपेशिया ॲरियाटा या विकारामुळे केस गळत असतील, तर अनेकदा ते परत येतात. मात्र ॲलोपेशिया टोटॅलिस मध्ये तसं होत नाही. अशा रुग्णांना स्टिरॉइड क्रीम्स दिली जातात. पण ५०% पेक्षा जास्त केसगळती असेल अशा रुग्णांसाठीच हा उपाय सुचवला जातो. ५०% पेक्षा कमी केस गळत असतील, तर अनेकदा वेट अँड वॉच चा सल्ला दिला जातो. काही महिन्यात किंवा वर्षभरात अनेकजणांचे केस परत नव्याने येतात. या व्यतिरिक्त स्टिरॉइड इंजेक्शन्स आणि लाईट थेरपीज हेही उपाय आहेत.

पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचा असा एक पैलू आहे, तो म्हणजे ॲलोपेशियामुळे होणारे मानसिक परिणाम.
आजही जगभरात रंग, बांधा, उंची यावरून टीकाटिपणी, टिंगल टवाळी या गोष्टी आढळून येतात. टक्कल, विशेषतः स्त्रियांचं, हा असाच एक चेष्टेचा विषय आहे. अनेकदा रुग्ण यातून निर्माण होणारा मानसिक ताण सहन करू शकत नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी ॲलोपेशियाच्या उपचारांबरोबरच कौन्सिलिंग आणि सायकोथेरपी हेही उपचार केले जातात. याचं कारण म्हणजे केस गळती आणि मानसिक ताणतणाव यांचं दुष्टचक्र आहे. ते थांबवण्यासाठी दोन्ही बाजूंनी उपचार व्हायला हवेत.
पण काहीही म्हणा, विल स्मिथच्या निमित्ताने निदान या संवेदनशील प्रश्नाला वाचा फोडली गेली. हेही नसे थोडके!

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required