computer

अजूनही शास्त्रज्ञांच्या पूर्णपणे आवाक्यात न आलेला विकार-अल्झायमर!! त्याची कारणे, निदान, परिणाम आणि उपचारांबद्दल तर जाणून घ्या.

विस्मरण हे माणसाला मिळालेले वरदान आहे. मात्र हेच वरदान काही लोकांच्या बाबतीत शापासमान ठरू शकते. ह्या वाक्याने विचारांचा गोंधळ उडाला असेल ना? पण गोंधळून जाऊ नका. हे कधी होते, तर विस्मरणाशी संबंधित विकार माणसाला जडतो आणि त्याचे दैनंदिन आयुष्य अवघड करतो. असाच एक विकार म्हणजे अल्झायमर. हा आजार माणसाला आयुष्यातून उठवतो.

अल्झायमर म्हणजे काय?

अल्झायमर म्हणजे मेंदूचा असा विकार ज्यात स्मरणशक्ती आणि विचारक्षमता यांचा हळूहळू ऱ्हास होतो. याचे कारण मेंदूतील पेशी क्षय पावण्यास सुरुवात होते. हा विकार बळावल्यास रोजच्या आयुष्यातील सोप्या गोष्टी करणेही अवघड जाते. एका सर्वेक्षणानुसार भारतातसह साऱ्या जगात वाढत्या वयोमर्यादेनुसार अल्झायमर पीडितांची संख्या वाढली आहे.

ह्या विकाराला अल्झायमर हे नाव कसे मिळाले?

१९०६ मध्ये डॉक्टर अल्झायमर नावाच्या डॉक्टरने असाधारण मानसिक आजार झालेल्या एका मृत स्त्रीच्या मेंदूतील पेशींमध्ये झालेल्या बदलांचा अभ्यास केला त्यावेळी त्या महिलेचा स्मृतीभ्रंश, भाषाविषयक अडचणी, तिची अकल्पित वर्तणूक यांसारख्या अनेक गोष्टी आणि त्यांचा मेंदूतील बदलांशी संबंध अशा अनेक गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. त्यावरून या असाधारण विकाराला अल्झायमर हे नाव मिळाले.

अल्झायमरच्या पायऱ्या कोणत्या?

अल्झायमरची पहिली पायरी आहे माइल्ड अल्झायमर. ह्यात मोठ्या प्रमाणावर विस्मरण होते. शिवाय विचार, तर्क, स्मृती यांसारख्या आकलनात्मक क्षमतांंमध्ये समस्या निर्माण होतात. यात पैशांचे व्यवहार, बिलांची पेमेंट्स करणे यांत अडचणी येतात. नेहमीच्या साध्यासुध्या कामालाही खूप वेळ लागतो. पुढील पायरी म्हणजे मॉडरेट अल्झायमर. या टप्प्यात मेंदू नियंत्रित करत असलेल्या भाषा, बोधपातळीवरचे विचार यांमध्ये गडबड सुरू होते. या पायरीवर गोंधळ, स्मृतीभ्रंश (मेमरी लॉस) मोठ्या प्रमाणावर होतो. या टप्प्यात रुग्ण अनेकदा त्यांच्या जवळच्या लोकांनाही ओळखेनासे होतात. नवीन गोष्टी शिकताना त्यांना अडचणी येतात. तिसरी पायरी म्हणजे सीव्हीअर अल्झायमर. या स्टेजला रुग्णाला दैनंदिन व्यवहारांंसाठीही शुश्रूषा करणाऱ्यांवर अवलंबून राहावे लागते.

अल्झायमर झाला आहे हे कसे ओळखायचे?

कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ हा छोट्या गोष्टींनी होतो हे वाक्य अल्झायमर या विकारात तंतोतंत लागू होतं. माणसाच्या विस्मरणाची सुरुवात ही रोजच्या आयुष्यातील रोजचे सकाळचे औषध घेतले की नाही? अशा छोट्या छोट्या गोष्टींंच्या विस्मरणाने होते. पुढेपुढे स्वतःचे नाव, पत्ता अशा गोष्टींचे विस्मरण होते. त्यानंतर दैनंदिन व्यवहारातील साध्यासरळ गोष्टी करणे कठीण होते. यामध्ये अगदी एखाद्या गोष्टीचा वास ओळखू न येण्यासारख्या गोष्टीही मोडतात, तथापि हे मान्य केले जात नाही. याशिवाय व्यक्तिमत्त्वात झालेला बदल, विचारांची दिशा हरवणे, मूड आणि वागण्यात बदल होणे या अन्य बाबीही आहेत. मात्र लक्षणे दिसू लागल्यावर लवकरात लवकर डॉक्टरांकडून अचूक निदान करून घेणे कधीही चांगलेच.

अल्झायमरचा मेंदूवर काय परिणाम होतो?

अल्झायमरच्या सुरुवातीच्या काळात मेंदूत घातक स्वरूपाचे बदल होतात. यात मेंदूतील प्रथिनांच्या असामान्य बांधणीचा अंतर्भाव होतो. आधी सक्षमपणे काम करणाऱ्या मेंदूतील न्युरॉन्सचे काम बंद पडते. त्यांचा इतर न्युरॉन्सशी असलेला संपर्क तुटतो. ही झीज होण्याची सुरुवात मेंदूतील हिप्पोकँपस आणि एंटॉरहिनल कॉर्टेक्सपासून होते. हे दोन्ही भाग स्मृतींशी संबंधित आहेत. न्युरॉन्सची जसजशी जास्त प्रमाणात हानी होते तसतसा मेंदूचा अधिकचा भाग आकुंचित होतो. उत्तरोत्तर हे प्रमाण वाढत जाते.

अल्झायमरची कारणे कोणती?

वय हे अल्झायमर होण्याच्या कारणांपैकी एक आहे. सामान्यतः ६०+ हे अल्झायमर होण्याचे वय मानले जाते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना ह्याचा धोका अधिक असतो. जनुकीय परिवर्तन म्हणजे जीन्समध्ये होणारे बदल हे अजून एक कारण आहे. मात्र हे सहसा आजाराच्या पहिल्या टप्प्यात आढळून येते. अनेक वर्षे मेंदूत होणारे गुंतागुंतीचे बदल, डाऊन सिंड्रोमचे रुग्ण, मधुमेह, हृदयविकार, बीपी सारखे जीवनशैलीशी संबंधित आजार हीही अल्झायमरची संभाव्य कारणे आहेत.

अल्झायमरचे निदान कसे करतात?

अल्झायमरचे निदान करण्यासाठी विविध शारीरिक, मानसिक चाचण्या केल्या जातात. शारीरिक चाचण्यांमध्ये रक्त, लघवीसारख्या नेहमीच्या चाचण्या, सीटी स्कॅन, एमआरआय, पेट स्कॅन इ. मेंदूच्या चाचण्या समाविष्ट असतात. जोडीला एखाद्या गोष्टीकडे लक्ष असणे, समस्या सोडवणे (प्रॉब्लेम सॉल्व्हींग), स्मृतीचाचणी (मेमरी टेस्टींग) यांच्या मानसिक चाचण्यादेखील केल्या जातात. याव्यतिरिक्त रुग्णांच्या केअर टेकर्सकडून मिळालेल्या माहितीवरून, प्रत्यक्ष रुग्णांना प्रश्न विचारून त्यांच्या वर्तणुकीत काही बदल आहेत का याच्या अभ्यासाद्वारे डॉक्टरांना निदान करता येते.

अल्झायमरवर कोणते उपचार आहेत?

अल्झायमर या विकारावर एक असा निश्चित उपचार नाही. शास्त्रज्ञ अल्झायमर होण्याची प्रक्रिया हळूहळू किंवा उशिरा व्हावी यासाठी काय करता येईल यावर संशोधन करत आहेत. हा आजार होऊ नये यासाठी शारीरिक हालचाल, व्यायाम, योग्य आहार, आकलनात्मक प्रशिक्षण (कॉग्निटिव्ह ट्रेनिंग) यासारख्या उपायांचा अवलंब करता येईल का यावरही संशोधन सुरू आहे.
अल्झायमरवरच्या उपचारांत डोनेपेझिल, रिव्हास्टिग्माईन, गॅलांटामाईन ही औषधे वापरली जातात. ही औषधे न्यूरॉन्समध्ये संदेशांचे वहन करणाऱ्या न्यूरोट्रान्समीटर्स या रसायनांची पातळी नियंत्रित ठेवतात. शिवाय अल्झायमरच्या रुग्णांंसाठी आज अनेक सपोर्ट ग्रुप्स किंवा आधारगट अस्तित्वात आहेत. हे सपोर्ट ग्रुप्स रुग्णांच्या केअरटेकर्सना त्यांच्या भावना, अनुभव, उपयुक्त ठरतील अशा टिप्स शेअर करण्यासाठी प्रवृत्त करतात.

अजूनही शास्त्रज्ञांच्या पूर्णपणे आवाक्यात न आलेला असा हा विकार. रुग्णाचे जगण्याचे भान हरवणारा, त्याला परावलंबी बनवणारा आणि कणाकणाने झिजवणारा. भविष्यात यावर प्रभावी उपचार विकसित केले जातीलही. पण तोपर्यंत काय? हा प्रश्न कायम आहे. निरोगी जीवनशैली, योग्य आहार आणि सतत कार्यरत राहणे ही त्रिसूत्री आजार रोखण्यासाठी मदत करते असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. निदान तेवढे तरी करूयात!

सबस्क्राईब करा

* indicates required