अंमली पदार्थाविरूध्द अभियान : भाग १

26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन. संयुक्त राष्ट्र संघाने हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून जाहीर केलाय. कारण  याच दिवशी चीनमधल्या लिन झेक्सु या ऊमरावाने ह्युमेन गंगडाँग प्रांतात अफुची पिके जाळली आणि चीनमधल्या अफूच्या व्यवसायाचा बिमोड करण्यास प्रारंभ केला होता.

Image result for afim drugस्रोत

सर्वसाधारणपणे नेहमीच्या वापरातल्या औषधांनाही ड्रग्ज म्हणत असले तरी, ड्रग्ज म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर चरस, गांजा, अफू, गर्द, कोकेन हेच येते.

वस्तुतः शरीरातल्या नैसर्गिक प्रक्रियांचा वेग कमी जास्त करणारे आणि सदर प्रक्रियांवर अनुकुल प्रतिकुल परिणाम करणारे पदार्थ म्हणजे ड्रग्ज. त्या ड्रग्जचे मेडीसीनल (औषधी) ड्रग्ज किंवा रिक्रीएशनल (करमणुकीची) ड्रग्ज असे वर्गीकरण करता येईल. 

Flickrस्रोत

एखाद्या औषधाचा, आजार नसताना किंवा जास्त प्रमाणावर वापर केला तर तोही घातकच. अनेक तरूण मुले कोरेक्स सारखे कफ सिरप व्यसनासाठी वापरत असल्यानेच शेवटी त्याची निर्मिती बंद करावी लागली. अनेक व्यक्तिंना झोपेच्या गोळ्यांचेही असेच व्यसन लागलेले असते.


व्यसन म्हणजे काय?

यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा एखादा मुलगा रोज सकाळी एक ग्लास दुध पीत असेल तर 10/12 वर्षाचा होईपर्यंत तो एकच ग्लास दुध पीतो, आणि एखाद्या दिवशी दुध मिळाले नाही तरी, त्यावर पोटात कळा येणे, हातापायात गोळे येणे, घामाघूम होणे, जुलाब सुरू होणे, अस्वस्थ वाटणे असे परिणाम होणार नाहीत किंवा दुधाचे प्रमाण एक ग्लासापासुन 5/10 ग्लासापर्यंत वाढणार नाही. मात्र व्यसनकारक पदार्थांच्या बाबतीत अशी पदार्थाची अत्यंतिक आवश्यकता वाटते आणि शरीराराला या पदार्थांची वाढती गरज भासते हे परिणाम दिसतात. या परिणामांना व्यसन म्हणतात. प्रत्येक अंमली पदार्थाची व्यसनकारी क्षमता कमी जास्त असते आणि त्याच प्रमाणात त्याची घातकताही कमी जास्त असते.

हल्लीच्या काळात शहरी जीवनातले ताणतणाव आणि पाश्चात्य संस्कृतिचे अंधानुकरण, तरूण पिढीची क्रयक्षमता आणि अंमली पदार्थाची उपलब्धता या सगळ्या गोष्टींमुळे, अंमली पदार्थ आणि इतर धोकादायक पदार्थांच्या व्यापाराचे भारतातील प्रमाण चिंताजनक झालेले आहे. 


भारताचं स्थान

जागतिक नकाशावरच्या भौगोलीक स्थानामुळेही भारत हा अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील एक महत्वाचा दुवा बनलेला आहे. भारतात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो या मुख्य संस्थेव्यतिरीक्त, कस्टम्स, एक्साईज, अंमलबावणी मंत्रालय या केंद्रीय संस्था आणि राज्य पोलीस दले अंमली पदार्थाविरूध्द कारवाया करत असतात. पण पकडली जाणारी ड्रग्ज हे केवळ हिमनगाचे छोटेसे टोक आहे. विस्तीर्ण सागरी किनारा लाभलेला भारत हा आंतराराष्ट्रीय ड्रग तस्करीतील एक महत्वाचा घटक बनलेला असल्याचेही स्पष्ट लक्षण आहे. 

भारतात सर्वसाधारणपणे अंमली पदार्थांच्या व्यसनींचा वयोगट 18 ते 30 समजला जात असे पण मेफेड्रॉन (एमडी किंवा म्याऊ म्याऊ) सारख्या ड्रगमुळे तो 11 पर्यंत खाली उतरलेला आहे.  त्यामुळेच याकडे सर्वच पालकांनी गांभिर्याने पाहाणे आवश्यक आहे.

 

लेखक - श्री सुहास गोखले (सेवा निवृत्त पोलीस अधिकारी)

सबस्क्राईब करा

* indicates required