अंमली पदार्थविरोधी अभियान : भाग ३ - अंमली पदार्थांचा प्रवास !!

तुम्ही आतापर्यंत अंमली पदार्थांचं सेवन आणि त्याच्या परिणामांविषयी वाचलंत. आता या भागात बघूया हे अंमली पदार्थ जगभरात कसे पोहोचतात आणि याचा भारताशी कसा संबंध आहे.

या संदर्भात श्री सुहास गोखले काय म्हणतात ते बघूया!!

जगामध्ये चोरट्या अफुच्या लागवडीसाठी कुप्रसिध्द असलेल्या दोन प्रदेशांच्या नेमका मधोमध भारत आहे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी खूप उपयुक्तसुद्धा. याला कारणीभूत आहेत भारताच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर असलेली बंदरं आणि  त्याव्यतिरीक्तही असलेली अनेक ठिकाणं. यामुळं  भारताला अंमली पदार्थाच्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारपेठेत ट्रानशिपमेंट पॉईंट म्हणून महत्वाचे स्थान आहे.


सुवर्ण त्रिकोण:

याबाबत विचारात घेण्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे भारताचे भौगोलीक स्थान. अफूच्या निर्मीतीत आघाडीवर असलेल्या थायलंड-लाओस आणि ब्रम्हदेश या सुवर्ण त्रिकोणातल्या ब्रम्हदेशाची सीमा भारताशी जोडलेली आहे. याप्रदेशात अफूनिर्मीतीचं प्रमाण 1980 मध्ये 200 टन होतं. पण तेच प्रमाण  1981 मध्ये 700 टनापर्यंत वाढलं होतं. अफूपासून हेरॉईन या घातक अंमली पदार्थाची निर्मीती करणाऱ्या चोरट्या प्रयोगशाळा या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. अफू आणि हेरॉईनची तस्करी बँकॉक, ब्रम्हदेश आणि मलेशिया इथून अमेरिका व इतर युरोपियन देशांपर्यत हवाई आणि सागरी मार्गाने होते. मिळालेल्या पुराव्यांप्रमाणे भारत हा या तस्करीमधील महत्वाचा ट्रान्झिट पॉईंट बनलेला आहे. सुवर्ण त्रिकोणात तयार होणारे हेरॉईन भारतामार्गे अमेरिकेपर्यंत पोहोचते. यामार्गावर असलेल्या मेघालय, असाम या पूर्वेकडील राज्यातही या हेरॉईनमधला काही भाग झिरपत असल्याने त्या राज्यातही व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठे आहे.

Image result for drugs smuggling afghanistanस्रोत

 

सुवर्ण चंद्रकोरः

इराण, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशाची बनलेली सुवर्ण चंद्रकोर हा अफूची निर्मिती करणारा दुसरा भूप्रदेश आहे. 1980 मध्ये या प्रदेशात खसखशीची लागवड फार अल्प प्रमाणात झाली होती. खसखस म्हणजे तुम्हांला माहीत नसेल, तर ते असतं अफूचं बी.  अंदाजे 80 टन हेरॉईन निर्मिती  होईल एवढी म्हणजे 800 टन खसखशीच्या बोंडांचं उत्पन्न घेण्यात  आलं होतं. मात्र इराणमधल्या अयातुल्लांची क्रांती आणि अफगाणिस्तानमध्ये रशियाच्या हस्तक्षेपामुळे ही निर्मिती आणि तस्करी खूपच कमी प्रमाणात झाली होती. यामुळे पाकिस्तान हा साखळीमधला महत्वाचा देश बनलेला आहे. अमेरिकेच्या वर्चस्वामुळे पाकीस्तानमध्ये अंमली पदार्थाच्या विक्रीविरूध्द अत्यंत कडक कायदे करण्यात आले आहेत. मात्र तरीही पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम प्रांतात हेरॉईनची उघड विक्री होताना दिसते. पाकिस्तान भारताचा शेजारी असल्याने याबाबत भारताच्या समस्या वाढलेल्या आहेत. हल्लीच्या काळात पाकिस्तानातून भूमार्गाने हेरॉईन भारतात आणले जाते आणि यासाठी काश्मिर ते राजस्थानपर्यंतच्या सीमारेषा तसेच नेपाळ मार्गेही तस्करी होत असते. पूर्वेकडील माओवादीही हत्यारांच्या बदल्यात अंमली पदार्थांची देवाणघेवाण करतात.

 

अत्यंत वास्तववादी चित्रीकरण असलेल्या सरफरोश चित्रपटात दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीचे संबंध अतिशय छान दाखवले होते. आधुनिक दहशतवादी कारवाया केवळ उत्साहाच्या जोरावर होत नाहीत तर त्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळही लागते. त्यामुळे  दहशतवादी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेले आढळतात. यातुनच नार्को टेररिझमची संकल्पना आली आहे. आयसिस, अल कायदापासून दाऊद ईब्राहीमपर्यंत प्रत्येक दहशतवादी संघटनेची एक शाखा अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतलेली आहे.

(क्रमश:)

सबस्क्राईब करा

* indicates required