computer

मायकेल जॅक्सनचा घात ज्या औषधानी केला त्या ओपीऑइड्चा आपल्याकडे सुळसुळाट झाला आहे. त्यांच्यापासून दूर राहा!

गेल्या काही दिवसांत तुमच्या मेलबॉक्समध्ये काही विशिष्ट औषधांचा प्रचार करणार्‍या मेल येऊन पडत असतील.प्रत्येक वेळा नाव वेगळं असेल,पण त्यात लपलेलं औषध तेच असेल!
या मेलचा सारांश सर्वसाधारणपणे असा असतो.

'जुनाट दुखण्यामुळे - कॅन्सरसारख्या व्याधीमुळे किंवा इतर कोणत्याही शारिरीक त्रासाने जर वेदना शमत नसतील तर ही औषधे घेऊन बघा. वेदनामुक्त जीवन जगा.'
साहजिकच तुमच्या मनात प्रश्न असा उभा राहील की खरोखर या औषधांनी वेदना थांबतात का? तर त्याचे उत्तर असे आहे की, होय! या औषधांनी वेदनामुक्त जीवन जगता येते. हे उत्तर वाचल्यावर तुम्ही विचाराल की हे औषध इतके चांगले असेल तर त्या औषधांपासून सावध रहा असा बोभाटा आम्ही का करतो आहे?

 

वाचकहो, याचं कारण असं आहे की ओपीऑइड्स या नावाने वर्गीकरण झालेल्या या औषधांचे व्यसन लागते आणि बर्‍याच वापरकर्त्यांचा शेवट मृत्यूत होतो. गेल्या दोन वर्षांच्या काळात अमेरिकेत लाखो लोकांचा दुर्दैवी मॄत्यू या औषधांनी ओढवला आहे. सुदैवाने अशी ही औषधे आपल्याकडे सहजासहजी मिळत नाहीत, पण अनधिकृत औषध विक्रेते याचा प्रचार करतात आणि पुरवठा करतात.

या औषधांवर प्रतिबंध घालण्यास अमेरिकेचे डोळे पण फार फार उशिरा उघडले आहेत.अनेक जाणत्या लोकांनी अनेक राज्यांत या कंपन्यांवर खटले टाकले आहेत. काहींचा निर्णय झाला आहे, तर काही खटले अजूनही प्रलंबित आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'टेवा फार्मास्युटीकल्स' या कंपनीला या खटल्यात दोषी ठरवण्यात आलेले आहे. आजच्या लेखात आपण या औषधाचा आणि टेवा फार्मास्युटीकल्स खटल्याचा आढावा घेणार आहोत.

या विषयावर अधिक काही सांगण्यापूर्वी ओपीऑइड्स म्हणजे काय हे समजून घेऊ या. अफूपासून तयार करण्यात येणारी वेदनाशामक औषधे म्हणजे ओपीऑइड्स! पराकोटीच्या वेदना होत असलेल्या रोग्याला या औषधांच्या सेवनाने वेदनेपासून मुक्ती मिळते. शरीराकडून येणारे वेदनेचे संदेश मेंदूपर्यंत न पोहचू देण्याचे कार्य हे औषध करत असते. सोबतच आपण एकदम ओक्के आहोत असंही वाटायला लागतं. सुखकर असे भास होतात. या सर्व गुणांमुळे कॅन्सर आणि इतर अति-वेदनाकारक जाणिवांपासून काही काळ आराम मिळतो. ओपीऑइड्सचे आपल्या वाचनात येणारे नाव म्हणजे मॉर्फीन, हे अफूपासून तयार केले जाते. याखेरीज 'सिंथेटिक' म्हणजे अफू न वापरता केवळ रसायनांचा वापर करून बनवलेली अनेक ओपीऑइड्स आहेत. ट्रॅमॅडॉल-फेन्टानिल ही सिंथेटिक ओपीऑइड्सची उदाहरणे सांगता येतील.
जर ही औषधे इतकी चांगली वेदनाशामक म्हणून काम करत असतील तर 'टेवा फार्मास्यूटिकल्स ' (आणि इतर कंपन्यांना) अमेरिकेत कोर्टात का खेचण्यात आले? त्यांना प्रचंड मोठ्या रकमेचे दंड का ठोठवण्यात आले? या कंपन्यांना त्यांच्या औषधांचे दुष्परीणाम माहिती असूनही त्यांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी ते प्रोत्साहीत करतात. या औषधांचा 'छुपे मार्केटींग करतात. या प्रचारामुळे वापरकर्त्यांची संख्या वाढते. अनेकांना या औषधांचे व्यसनच लागते- दिवसागणिक अधिकाधिक वापर होतो आणि या वापराचा शेवट मृत्यूत होतो.

फेन्टानिल (आणि त्यासारखी) औषधे घेतल्यामुळे एप्रिल २०२० ते २०२१ या एका वर्षात अमेरिकेत एक लाख लोक मरण पावले आहेत. हे आकडे युनायटेड स्टेट्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनया संस्थेने प्रसारित केलेल्या वृत्तानुसार आहेत. गेल्या काही वर्षात अमेरिकेत फेन्टानील सतत घेतल्याने व्यसन लागलेल्यांची संख्या वाढतच जाते आहे. आतापर्यंत साधारण हा आकडा पाच लाखांच्या वर गेला असेल असा अंदाज आहे. अनेक संस्था, अनेक राज्यांनी फेन्टानील आणि त्यासारखी औषधे बनवणार्‍या कंपन्यांवर ३३०० खटले कोर्टात दाखल केलेले आहेत. त्यांचा दावा एका महत्वाच्या मुद्द्यावर आहे तो म्हणजे या औषधाच्या दुष्पपरिणामाची पुरेशी कल्पना न देता या कंपन्यांनी या औषधांचे छुपे 'मार्केटींग' केले आहे.

आता हे छुपे मार्केटींग कसे केले जाते याचा एक उत्तम नमुना वाचकांसमोर मांडत आहोत. १९९०च्या दरम्यान भारतात ट्रॅमॅडॉल हे औषध 'अल्ट्रासेट' या नावाने उपलब्ध झाले. हे पण एक प्रकारचे सवय लावणारे 'पेन किलर' आहे .मुंबईतल्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये व्यवसाय करणार्‍या छोट्यामोठ्या डॉक्टरांच्या चिठ्ठीवर ते सहज उपलब्ध असायचे. सगळ्या 'पेन किलरचा बाप' अशी ख्याती असलेले हे औषध किती घातक आहे याची कल्पना कधीच कोणीही कोणाला दिली नाही. काही वर्षांतच या ट्रॅमॅडॉलचा खप पंजाबमध्येही अतोनात व्हायला सुरुवात झाली. भारतातले ट्रॅमॅडॉल छुप्या मार्गाने नायजेरीयातील बोको हारामसारख्या अतिरेकी संघटनांना पुरवले जाऊ लागले. म्हणून २०१८ साली आपल्या सरकारने त्यावर बंदी घातली. त्यानंतर लगेच 'जर्नल ऑफ पेन रिसर्च'च्या अंकात अनेक डॉक्टरांनी आशिया खंडातील भारतासारख्या देशात ट्रॅमॅडॉलसारख्या औषधाला पर्यायच नाही असे कथन करणारे संशोधनात्मक लेख लिहिले. हे लेख लिहिणार्‍यांना Grünenthal GmbH अर्थपुरवठा करण्यात आला. डॉक्टरांना फायझर-जॉन्सन अँड जॉन्सन -मुंडीफार्मा या कंपन्यांनी संशोधनाचे आणि त्यावर लेक्चर देण्याचे पैसे दिले. या सगळ्या कंपन्यात सॅकलर नावाच्या फ्रान्समधील कुटुंबाची मोठी गुंतवणूक आहे आणि त्यांच्या मूळ कंपनीचे नाव आहे पर्ड्यू फार्मा!! वर उल्लेख केलेल्या ३३०० खटल्यात अर्थातच सॅकलर कुटुंब आणि त्यांच्या कंपन्यांना कोर्टाने मोठा आर्थिक दंड ठोठावला आहे.
आता गेल्याच आठवड्यात फेन्टानीलच्या दाव्यात 'टेवा फार्मास्यूटीकल्स' ही कंपनी दोषी असल्याचे कोर्टाने मान्य केले आहे. यानंतरचा खटला नुकसानभरपाईचा असेल. तो उभा राहण्याआधीच 'टेवा फार्मास्यूटीकल्स' अपीलात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता या सगळ्याचा भारताशी काय संबंध आहे हे समजल्याशिवाय या प्रकरणाची दाहकता आपल्याला कळणार नाही.

या सर्व प्रकरणात भारताची समस्या फारच गंभीर आणि दुहेरी स्वरुपाची आहे. आपल्याकडे मॉर्फीन हे पेनकिलर अधिकृतपणे वापरात आहे. मॉर्फीनची आवश्यकता कॅन्सरसारख्या रोगाने ग्रस्त सुमारे २५ लाख लोकांना आहे. या रोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्यांना आयुष्याचे शेवटचे काही दिवस मॉर्फीनच्या आधारावरच काढावे लागतात. त्यांना पुरेसे मॉर्फीन बर्‍याचवेळा देता येत नाही कारण मॉर्फीन हे हे अफूची लागवड करून त्यातून बनवले जाते. भारतात अफूची लागवड करण्याची परवानगी फक्त तीन राज्यांना - राजस्थान-मध्य प्रदेश-उत्तरप्रदेश- यांनाच आहे. या राज्यात निघणारे अफूचे पीक सरकारी 'अल्कलॉइड फॅक्टरी'ला देण्याचे कडक निर्बंध आहेत. पण शेवटी हे सरकारी काम आहे, फॅक्टरीपर्यंत अफूचे पूर्ण पीक पोहचतच नाही. परिणामी मॉर्फीनचे उत्पादन कमी होते. अशावेळी फेन्टानील (आणि त्यासारखी) सिन्थेटीक औषधे उपयुक्त ठरतात. पण त्यावर सरकारी बंदी आही आहे. थोडक्यात धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी अवस्था आहे.

आता यापुढे जी समस्या मांडणार आहोत अधिकच गंभीर स्वरुपाची आहे. सध्या भारतात Pain Management Centre चा सुळसुळाट झाला आहे. या सेंटरच्या माध्यमातून फेन्टानिल/ट्रॅमॅडॉल वगळता इतर अनेक उत्पादने भारतात विकली जातात. हे एक प्रकारचे ड्रग पुशिंग ही पेन मॅनेजमेंट सेंटर चालवत असतात. औषधे बनवणार्‍या कंपन्या या डॉक्टरांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या इतके पैसे देतात की खप वाढतच जातो आहे. आज जे अमेरिकेत घडते आहे ते भारतात घडायला फारसा वेळ लागणार नाही हे स्पष्टच आहे.

आपल्यासमोर आणखी एक गंभीर समस्या काही वर्षांतच उभी राहणार आहे त्याची कल्पना इथे दिलीच पाहीजे. कॅनडा आणि अमेरिकेतील काही राज्यांत कॅनाबीज म्हणजे गांजाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या कंपन्यांचे पब्लिक इश्यू येऊन त्यांच्या समभागाचे त्या देशात लिस्टींग झालेले आहे. त्यांची उत्पादने वेगवेगळ्या नावाने विकली जात आहेत. तुमच्या मेलबॉक्समध्ये 'गमी बेअर्स' सारख्या नावाने याची प्रचारात्मक मेलही बर्‍याच वेळी आलेली असेल. सावध राहा! हा धोक्याचा पुढचा टप्पा आहे.

 

शेवटी एक महत्वाचा मुद्दा सांगीतल्याशिवाय या लेखाची भूमिका स्पष्ट होणार नाही. आपण गेली दोन वर्षे सातत्याने पॅरासिटॉमॉल सारखी वेदनानाशक औषधे घेत आहोत. त्याचे पण दुष्परीणाम फेन्टानील/ट्रॅमॅडॉलसारखेच आहेत का??

नाही! आपण जी वेदनाशामक औषधे नियमित वापरतो त्याचा आणि या औषधांचा काहीही संबंध नाही. पॅरासिटॉमॉलसारखी सर्व औषधे 'सेफ' आहेत. गैरसमज होऊ नयेत म्हणून हे इथे स्पष्ट करत आहोत.

सबस्क्राईब करा

* indicates required