computer

भरपूर पाणी प्यायल्याने जीव जाता जाता राहिला ? नक्की काय घडलं आहे ?

कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक घरघुती उपाय सुचवले जात आहेत. यात सर्वात सोपा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे. तसे पाहायला गेले तर पाणी पिणे हे तसेही आरोग्यासाठी चांगलेच आहे, पण कोरोना काळात हे महत्त्व आणखी स्पष्ट झालं.

आज आम्ही जी बातमी घेऊन आलो आहोत त्यात मात्र भरपूर पाणी प्यायल्याने एका व्यक्तीचा जीव धोक्यात आला आहे.

इंग्लंडमधील ल्युक विल्यमसन हा ३४ वर्षीय सरकारी अधिकारी आहे. सगळीकडून पाणी पिण्याचे सल्ले मिळत असल्याने त्याने पाणी पिण्याचा काही धरबंधच ठेवला नाही. त्याला दिवसाला दोन लिटर पाणी पिणे एवढेच सांगितले गेले होते, पण त्याने दिवसाला पाच लिटर पाणी प्यायला सुरुवात केली. यामुळे झाले असे की त्याच्या शरीरातील सोडियमची पातळी कमी झाली.

परिणामी एके दिवशी ल्युक बाथरूमध्ये चक्कर येऊन पडला. लॉकडाऊन असल्याने कुणी मदतीला देखील आले नाही. अँबूलन्स यायला पाऊणतास लागले. तोवर ल्युक बेशुद्ध अवस्थेत पडला होता.

डॉक्टरांनी ल्युकच्या या परिस्थितीचे कारण अति पाणी पिणे हे सांगितले आहे. अति पाणी पिण्यामुळे त्याच्या मेंदूला सूज आली होती. उपचारासाठी  त्याला आयसीयूत ठेवावे लागले, तसेच त्याला व्हेंटिलेटरवर देखील ठेवले गेले होते. आता ल्युक बरा झाला असला तरी तो मृत्युच्या दाढेतून परतला आहे हे विसरून चालणार नाही.

नेमकं काय घडलं हे आपण आता विज्ञानाच्या भाषेत जाणून घेऊया.

तज्ञांच्या मते प्रमाणाबाहेर पाणी पिणे हे शरीराचे संतुलन बिघडवू शकते.प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने सोडियमचे प्रमाण कमी होते. परिणामी मळमळ, उलट्या होणे, अशक्त वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. वैद्यकीय भाषेत याला हायपोनाट्रेमिया असे म्हणतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महिलांनी २.७ लिटर आणि पुरुषांनी ३.७ लिटर पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले असते. हे प्रमाणही वातावरणानुसार बदलत असते.

एकंदरीत एका एक प्रमाण आवश्यक आहे. यानिमित्ताने भरपूर पाणी न पिता प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे हा आपण सगळ्यांनी धडा घ्यायला हवा.

सबस्क्राईब करा

* indicates required