computer

मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर बसवलेले भिंग परत बदलावे लागते का?

केस पांढरे होणे, सैल पडलेली आणि सुरकुतलेली त्वचा त्यांच्यासारखीच वाढत्या वयाची अजून एक खूण म्हणजे मोतीबिंदूसारख्या डोळ्यांच्या समस्या. वस्तू धूसर दिसणे हे याचे मुख्य लक्षण. हे नक्की कशामुळे होते?

आपल्या डोळ्यांत जेव्हा एखाद्या वस्तूची प्रतिमा तयार होते तेव्हा ती वस्तू डोळ्यांना दिसते. त्यासाठी त्या वस्तूपासून निघालेले किरण कॉर्निया, कॉर्नियामागे असलेले लेन्स आणि शेवटी रेटिना असा प्रवास करतात. रेटिनावर म्हणजे डोळ्यातील पडद्यावर हे किरण आदळतात आणि मेंदूकडे संकेत पाठवले जाऊन आपल्याला वस्तू दिसते. वयोमानानुसार किंवा अन्य काही कारणांनी जेव्हा लेन्सधील तंतू पांढरट होऊ लागतात तेव्हा लेन्स अर्धपारदर्शक बनल्याने किरण डोळ्यांच्या पडद्यापर्यंत पोहोचण्यात अडथळा निर्माण होतो. यामुळे व्यक्तीला धूसर दिसू लागते. पारदर्शक काचेवर अथवा चष्म्यासमोर वाफ साचल्यावर जसे दिसते तशा वस्तू अस्पष्ट दिसू लागतात. या विकाराला मोतीबिंदू म्हणतात.

यावरचा उपाय म्हणजे शस्त्रक्रियेने हे धुरकट झालेले लेन्स काढून टाकून त्याऐवजी नवीन भिंग बसवणे.

मात्र अनेक लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेविषयी काही शंका असतात. त्यातील सगळ्यात कॉमन शंका म्हणजे मोतीबिंदू परत होईल का, बसवलेले नवीन भिंग किंवा लेन्स कालांतराने परत बदलावे लागेल का, चष्मा लावावा लागेल का वगैरे वगैरे. सर्वप्रथम, ज्या डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली असेल त्या डोळ्याला परत मोतीबिंदू होत नाही. याचे कारण बदललेले भिंग हे कृत्रिम असते, त्यामुळे त्यातील स्नायुतंतू पांढरे होणे यासारखे प्रकार होत नाहीत. पण कधीकधी या भिंगाची जागा थोडीशी बदलावी लागते किंवा मोतीबिंदू झाल्यावर त्या डोळ्याचा नंबर बदलतो. अशा वेळी एक छोटी शस्त्रक्रिया करावी लागते. यात अजून एक लेन्स आधीच्या लेन्सवर बसवले जाते. याला पिगीबॅक इम्प्लांट म्हणतात. पिगीबॅक लेन्समुळे मूळ लेन्सची क्षमता सुधारते. यामुळे डोळ्याचा फोकस जास्त स्पष्ट होतो.

या दुसऱ्या शस्त्रक्रियेची गरज कधी भासते?

मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यापूर्वी, डॉक्टर नेत्रगोलकाचे (आयबॉलचे) मोजमाप घेतो. त्यावेळी कॉर्निया(पारपटल)ची वक्रता आणि डोळ्याची अक्षीय लांबी मोजली जाते. हे मोजमाप आणि काही विशिष्ट सूत्रे वापरून नंतर रोपण करायच्या भिंगाचा आकार ठरवला जातो. मात्र ही सूत्रे तयार करताना काही अंदाज गृहीत धरलेले असतात. ते कधीकधी सर्व रुग्णांसाठी अचूक ठरत नाहीत. त्यामुळे काही रुग्णांसाठी भाकीत केलेले परिणाम सगळ्यांसाठीच प्रत्यक्षात येत नाहीत. अशा वेळी पहिली रोपण शस्त्रक्रिया सुधारण्यासाठी दुसऱ्या शस्त्रक्रियेची गरज भासते. कधीकधी रुग्ण पहिल्या शस्त्रक्रियेनंतर समाधानी नसतो, त्याला अजूनही धूसर दिसत असते. तसेच कधीकधी नेत्रभिंगाचा आकार कालांतराने बदलू शकतो. अशा परिस्थितीतही या आकाराशी जुळेल असे भिंग बसवण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. पण बहुतेक लोकांना अशा अडचणी येत नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. शिवाय या अडचणी आल्या तरी त्यावर चष्मा वापरणे किंवा लेझर किरण वापरून नेत्रगोलकाचा आकार पूर्ववत करणे हे पर्याय असतात. पण कधीकधी हे पर्याय निवडणे शक्य नसते, अशा वेळी ही शस्त्रक्रिया उपयुक्त ठरते.

शस्त्रक्रियेच्या आधी चष्म्यासाठीचे (ऑपरेशननंतर लागणाऱ्या) मोजमाप केले जाते. नेत्रतज्ज्ञ डोळ्यांच्या इतर तपासण्या करतात. या मोजमापांनुसार, पिगीबॅक लेन्सचा आकार आणि प्रकार ठरवला जातो. तसेच जेथे छेद द्यायचा आहे त्या जागेचीही तपासणी केली जाते. ही छोटी शस्त्रक्रिया आहे, त्यामुळे ती लवकर होते आणि रुग्ण बहुतेकदा त्याच दिवशी घरी जाऊ शकतो.

या शस्त्रक्रियेचे दुष्परिणाम म्हणजे शस्त्रक्रियेनंतर होणारे इन्फेक्शन किंवा हॅमरेज आणि फार क्वचित अंधत्व. पण याचे प्रमाण फारच कमी म्हणजे दहा हजारात एक असे आहे. आज मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतरची ही करेक्टिव्ह शस्त्रक्रिया अनेक रुग्णांसाठी वरदान ठरली आहे आणि ते नव्याने वाचन, टीव्ही पाहणे, आपली नित्यकर्मे सुरळीतपणे पार पाडणे यांचा आनंद घेत आहेत.

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required