computer

विंचूदंशाचे मृत्यू आटोक्यात आणणारे पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर!! स्वकष्टातून MBBS ते संशोधन हा प्रेरणादायी प्रवास वाचायलाच हवा!!

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकांना त्यांच्या कर्तृत्वानुसार पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्रातील काही महान लोकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील एक नाव बघितल्यावर आरोग्यासारख्या मूलभूत विषयावर आपले संपूर्ण आयुष्य ओवाळून टाकणाऱ्या अवलिया व्यक्तिमत्वाचा खरा सन्मान झाल्याची भावना लोकांमध्ये आहे.

अनेकवेळा लोकांना अतिशय महान काम करणाऱ्या लोकांचे नाव त्यांना एखादा मोठा पुरस्कार मिळाला की माहिती होते. मग त्यांच्याबद्दल अधिक माहिती माध्यमांमध्ये आल्यावर त्यांचे काम किती उत्तुंग आहे याचा अंदाज लोकांना लागतो. डॉ. हिंमतराव बावस्कर हे असेच एक नाव. त्यांना पद्मश्री घोषित करून गौरविण्यात आले आहे.

डॉ. बावस्कर गेली अनेक वर्ष रायगड जिल्ह्यातील महाड येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. लाल विंचूमुळे होणारे मृत्यू त्यांनी केलेल्या शोधकार्यामुळे रोखले गेले आहेत. १९८२ साली लँसेंट सारख्या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये त्यांचे शोधकार्य प्रसिद्ध झाले आहे. याचबरोबर मेडिकल क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्यांनी वेळोवेळी लढा दिला आहे. याच सर्व कार्याचा गौरव आज बावस्करांच्या वयाच्या ७१ वर्षी झाला आहे.

डॉ. बावस्कर यांच्या आपल्या कामाबद्दल असलेले समर्पण समजून घेण्यासाठी एक गोष्ट पुरेशी आहे. १९८३ साली जेव्हा डॉ. बावस्कर लाल विंचू चावल्यावर लोकांवर उपचार करत असत, त्याचवेळी त्यांना त्यांचे वडील वारल्याचा निरोप आला. योगायोगाने अवघ्या ८ वर्षाच्या मुलाला त्यांच्याकडे आणण्यात आले होते. त्यावेळी वडिलांच्या अंत्यसंस्कारापेक्षा त्यांनी त्या विंचू दंशाने तडफडत असलेल्या मुलाला वाचवण्याला प्राधान्य दिले. मुलाच्या वडीलाला विश्वासात घेऊन त्यांनी त्या मुलावर उपचार सुरू केला. तब्बल २४ तास त्यांनी त्या मुलावर उपचार सुरू ठेवले. शेवटी ती मुलगा धोक्यातून बाहेर आला. या घटनेने मात्र त्यांचा आदर लोकांमध्ये द्विगुणित झाला.

औरंगाबाद येथील देहडसारख्या एका लहान गावात डॉ. बावस्कर यांचा ३ मार्च १९५१ रोजी जन्म झाला. एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात ते वाढले. पण मुलांना कुठल्याही परिस्थितीत शिकवायचे ह ध्यास त्यांच्या वडिलांनी घेतला होता. या ध्यासामुळे त्यांच्या वडिलांना बॅरिस्टर म्हटले जाई. मेडिकलचे शिक्षण सोपे नव्हते. एमबीबीएसला ऍडमिशन घेण्यासाठी डॉ. बावस्कर यांनी अनेक लहानमोठ्या नोकऱ्या केल्या. यात चहाचे कप धुण्यासारखी कामेही त्यांनी केली. या काळात आलेल्या डिप्रेशनमुळे त्यांनी एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली नाही. पण एकेक करत त्यांनी कित्येक अडचणींवर मात करत आपले एमबीबीएस पूर्ण केले. नागपूर येथून एमबीबीएस पूर्ण करून एखाद्या मोठ्या शहरात काम करण्याऐवजी त्यांनी महाडसारख्या छोट्या भागात आपले कार्यक्षेत्र सुरू केले.

महाडच्या सरकारी प्राथमिक केंद्रात त्यांनी सुरू केलेले काम पुढील ४० वर्षं सुरू होते. महाडला डॉक्टर म्हणून रुजू झाल्यावर त्यांना लाल विंचूमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाची माहिती झाली. त्यांना स्वतःला याचा त्रास झाला होता. हा असा परिसर होता, जिथे विंचूदंशाने मृत्यू ही सामान्य गोष्ट होती. लोकांना अंधश्रद्धेने घेरले होते. दवाखान्यात जाण्याऐवजी लोक जादूटोणावाल्यांकडे जात असत. त्यांनी या विषयाच्या मुळापर्यंत जाण्याचा ध्यास घेतला.

डॉ. बावस्करांनी सर्व माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांनी रुग्णांना होणारा त्रास जसे, उलटी, घाम, हायपरटेन्शन, सर्दी, दुखणे अशा गोष्टींचा अभ्यास केला. त्यांनी आता विंचूदंशाने होणाऱ्या मृत्यूचे मूळ शोधले होते. यावर त्यांनी परंपरागत पध्दतीने उपचार करून बघितला. त्यांनंतर त्यांनी एक रिपोर्ट तयार करून हाफकीन इन्स्टिट्यूटकडे पाठवला. हा रिपोर्ट लँसेंटमध्ये छापून आला. त्यांनी रुग्णांना prazosin या नावाचे औषध देण्यास सुरुवात केली. शेवटी त्यांनी अविरतपणे सुरू ठेवलेल्या कामाला यश मिळाले आणि विंचूदंशाने होणारे मृत्यू आटोक्यात आले. आपल्या या सर्व प्रवासावर डॉ. बावस्कर यांनी 'बॅरिस्टरचे कार्टं' ना नावाने पुस्तक लिहिले आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required