computer

कानातला मळ काढणे हा फक्त टाइमपासचा विषय नाही, जाणून घ्या शास्त्रीय माहिती!

आपल्या शरीरात अनेक स्त्राव तयार होत असतात. या स्त्रावांमुळे त्या-त्या भागाचे संरक्षण होत असते. कानातला मळ कानाच्या संरक्षणासाठी तो उपयोगी ठरतो. पण कधीकधी तो त्रासदायक ठरू शकतो. कानात मळ काढण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करतो. पण सगळेच उपाय पूर्णपणे सुरक्षित असतातच असे नाही. मुळात कानात मळ तयार का होतो? तो कधी अपायकारक ठरतो याची महिती आज आपण करून घेऊयात.
 

कानातल्या मळाला (इअरवॅक्स) सेरुमेन असेही म्हणतात. हा कानात तयार होणारा एक चिकट पदार्थ आहे. ह्यामध्ये मृत त्वचेच्या पेशी असतात. कानाच्या अस्तरात असलेल्या ग्रंथींद्वारे तो तयार होत असतो. हा मळ तयार होणे शरीरशास्त्रानुसार ते एक सामान्य लक्षण आहे. तसेच बाहेरच्या संसर्गाचा शरीरात प्रवेश रोखण्यासाठी शरीराची ही एक नैसर्गिक पद्धत आहे. आपले केस वाढत असतात, तशीच हीसुद्धा एक नैसर्गिक क्रिया आहे. कानाच्या पडद्याच्या सुरक्षेसाठी संरक्षण यंत्रणा म्हणून हा मळ तयार होतो आणि जसा तयार होतो तसा मळ हळूहळू कानातून बाहेरही काढला जातो. कानाच्या पोकळीमध्ये अत्यंत लहान केस असतात. त्यांना 'सिलिया' असे म्हणतात. हे लहान केस मळ तयार करण्याचे काम करतात. कानाच्या त्वचेची वाढ देखील बाह्य दिशेने असल्याने मळ कानाच्या पोकळीतून बाहेर ढकलला जातो. तसे पाहिल्यास हा मळ निरुपद्रवी आणि गुळगुळीत असतो. दोन्ही कानातील मळ नेहमीच सारखा असू शकत नाही. एका कानात दुसऱ्यापेक्षा जास्त प्रमाणात मळ असू शकतो.

जेव्हा हा मळ घट्ट होऊन कानात साठतो तेव्हा तो अपायकारक ठरतो. श्रवणशक्ती कमी होते, कान बंद होतो. काही प्रमाणात वेदना जाणवतात किंवा कान खूप दुखतो. कारण कानाच्या पोकळीमध्ये अडथळा निर्माण होतो. कानाच्या संसर्गामुळे हे होण्याची शक्यता आहे. सतत मोठ्या आवाजात ऐकणे किंवा हेडफोन्सचा अतिवापर यामुळे या समस्या होऊ शकतात.

त्यावर उपाय म्हणून कॉटन बड्सचा वापर होतो. पण त्यामुळे मळ कानाच्या आतल्या बाजूला ढकलला जातो. तेव्हा हा मळ कानाच्या आतल्या भागाला जाऊन चिटकतो जिथे स्वच्छता होऊ शकत नाही. तसेच इअरवॅक्समध्ये बाहेरील बॅक्टेरिया असू शकतात ज्यामुळे तो आत ढकलला गेल्याने संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे कापूस पूर्णपणे सुरक्षित नसतो. कानातील मळ काढण्यासाठी ईअर कँडल देखील वापरतात. पण संशोधनांनुसार कानातील मळ साफ करण्यासाठी इयर कँडल पुरेशी प्रभावी नाही. तसेच ती वापरणे धोकादायक आहे. त्यामुळे कान आणि चेहरा भाजण्याची शक्यता असते. शिवाय मेण कानात जाऊन कानाच्या पडद्याचे नुकसना होऊ शकते आणि बहिरेपणा येऊ शकतो.

कान स्वच्छ करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईयर ड्रॉप्स प्रभावी ठरतात. त्यामध्ये पेरॉक्साइड, सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम क्लोराइड असतं. परंतु अशी औषधं मेडिकलमधून स्वतः आणू नयेत, नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुम्हाला मळाचा जास्त त्रास होत असेल तर डॉक्टर कान पाण्याने स्वच्छ करण्याचा सल्ला देतात. त्याला सिरिंजिंग असेही म्हणतात. यामध्ये मळ साफ करण्यासाठी सिरिंजमधून कानाच्या नलिकांवर पाण्याचे फवारे मारले जातात..पण त्याचीही एक पद्धत असते. ती समजून घेऊन उपाय करावेत.

कानात घरगुती उपाय एका मर्यादेपर्यंत करावेत. समस्या समजून घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. तसेच हेडफोनचा अतिवापर करणे टाळावे. ही माहिती कशी वाटली जरूर कळवा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required