computer

भाग २ : कोरोनीलच्या भानगडीत आयुर्वेदाचं नुकसान कसं होत आहे? वाचा संपूर्ण प्रकरण !!

भाग १ : कोरोनील म्हणजे कोरोनावर रामबाण उपाय? पण आधी या महत्त्वाच्या गोष्टी वाचल्या का ?

ही दोन लेखांची मालिका आहे. पहिल्या भागात तुम्ही कोरोनील या पतंजलीच्या औषधाबद्दलचे मुद्दे, आक्षेप आणि पुष्टी याबद्दल वाचलंत. औषधांच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कोणते नियम आणि कायदे आहेत हे ही तुम्ही पहिल्या भागात पाह्यलं असेल. आता पुढचा मुद्दा आहे क्लिनिकल ट्रायल्स आणि कोरोनीलसारख्या इतर औषधांचा.

कोणतेही औषध मानवी वापरापूर्वी अनेक वेगवेगळ्या पातळीवरच्या परिक्षणांतून जात असते. ज्याला 'फेज' असे म्हणतात.

फेज १ - औषधाचा शोध लागून उपयुक्ततेची शक्यता आजमावणे. या पातळीवर केवळ एक उपयुक्त ठरू शकेल असा रासायनिक पदार्थ या पलीकडे त्याला मान्यता नसते.

फेज २ - या टप्प्यावर प्रयोगशाळेतील प्राण्यांवर या औषधाची चाचणी घेण्यात येते. या परिक्षणाला प्री-क्लिनिकल टेस्ट असे म्हणतात.

फेज ३ - या पातळीवर हे औषध रोग्यांवर केवळ चाचणी म्हणून वापरण्यात येते. त्यासाठी दोन वेगवेगळ्या गटातल्या रोग्यांना एकाच वेळी औषध देण्यात येते. एका गटाला औषधाचे डोस देण्यात येतात तर दुसर्‍या गटाला प्लासीबो म्हणजे औषध दिले आहे असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात जे दिले जाते ते औषध नसते, तर औषधासारखेच पण निरुपद्रवी डोस असतात. त्या दोन्ही गटाचे अहवाल बघून औषधाची उपयुक्तता कळते.

फेज ४ - या टप्प्यावर औषध ड्रग कंट्रोलर या सरकारी संस्थेकडे तपासणीस पाठवले जाते.

फेज ५ - ड्रग कंट्रोलरच्या परवानगीने औषध बाजारात विक्रीस येते. पण कंपनीला वापराचे अनेक तपशिल द्यावे लागतात. या पातळीवर पोहचलेल्या औषधांवर पण बंदी आल्याचे बर्‍याच वेळा घडले आहे.

सीटीआरआयच्या संकेतस्थळाने "interventional randomized parallel group placebo controlled, single centric trial in which impact of Indian traditional Ayurvedic treatment regime for nCoV-2 (COVID-19) will be accessed असे म्हटले आहे. आतापर्यंतचा अनुभव असे सांगतो की औषधाचा एक रेणू म्हणजेच मॉलिक्यूल ( मूळ रासायनीक पदार्थ) सिध्द होण्यासाठी काही वर्षे लागतात. आता बनवलेले व्हॅक्सीन या पातळीवर पोहचायला तर आणखी दहा वर्षसुद्धा लागू शकतात. तर पतंजलीने केवळ दोन महिन्यात हे केले असेल तर त्याला चटावरचे श्राध्द म्हणावे लागेल. घटकाभर असं समजून चालू की कोरोनीलने या सर्व चाचण्या पार केल्या आहेत. पण त्यांनी ज्या प्रकारे या औषधाची जाहिरात केली आहे ती बघता बाजारात असाच दावा करणारी अनेक औषधे यायला वेळ लागणार नाही. जाहिरात करताना आक्षेपार्ह मजकूर दुसर्‍या प्रकारच्या शब्दाच्या आडून देणे फार सोपे असते. त्यांचा दावा असाच असेल की जे पतंजलीच्या कोरोनीलमध्ये आहे तेच आयुर्वेदीक पदार्थ आमच्याही मिश्रणात आहेत. याचे एक उदाहरण आपण बघू या!

एक महत्वाची गोष्ट अशी की अशा गोंधळामुळे आयुर्वेद औषध पध्दतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. जडीबुटी म्हणजे निव्वळ फसवाफसवी असा गैरसमज निर्माण होतो आहे. आधीच अ‍ॅलॉपॅथी विरुध्द इतर सगळ्या पॅथ्या असा लढा चालू आहेच त्यात गैरसमजांची भर पडते आहे.

यासाठी बोभाटाने शुध्द आयुर्वेदीक औषधाचे निर्माते हिमालया आणि पतंजलीच्या संकेतस्थळावर जाऊन तुलनात्मक अभ्यास केला तर असे आढळून आले की -

१. कोरोनील ज्या वनस्पतींचा वापर करून बनवण्यात आले आहे, अगदी त्याच वनस्पती वापरून हिमालया औषधे कंपनीत बनतात. पण त्या कंपनीने या महामारीवर रामबाण उपाय आहे असे कुठेही म्हटले नाहीय.

२. हिमालयाची गणना जीएमपी म्हणजे आंतरराष्ट्रीय गूड मॅन्यूफॅक्चरींग प्रॅक्टीसचे मानांकन मिळवून आहे. पतंजलीला जीएमपी मानांकन असल्याची नोंद नाही.

३. हिमालया ड्र्ग कंपनीच्या रीसर्च आणि डेव्हलपमेंटच्या पध्दती जागतिक पातळीवरच्या आहेत. याचे उदाहरण म्हणून हा परिच्छेद वाचा .

"आमच्या क्लिनिकल ट्रायल एम्स -दिल्ली-अपोलो हॉस्पीटल चेन्नई, आयएमएस -बनारसहिंदू विद्यापीठ, मेयो क्लिनीक न्यूयॉर्क आणि रशिया येथे घेण्यात आलेल्या आहेत. हिमालयाच्या क्लिनिकल ट्रायलचे १२०० रिपोर्ट आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिध्द झालेले आहेत."

थोडक्यात सांगायचे तर पतंजलीच्या दाव्यामुळे अनेक टेस्ट न केलेली औषधे बाजारात येतील आणि परिणामतः आयुर्वेद औषध निर्माते टीकेचे बळी ठरतील.

आता येत्या काही दिवसांत पतंजलीचा दावा किती योग्य आहे ते कळेलच. पण आमची वाचकांना अशी विनंती आहे की औषध ओटीसी पध्दतीने म्हणजेच विना प्रिस्क्रिप्शन मिळत असेल् तरी योग्य सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.

सबस्क्राईब करा

* indicates required