computer

औषधाच्या पाकिटात असलेली ही छोटी चिट्ठी औषधाबद्दल काय सांगत असते? या चिट्ठीचं महत्त्व तुम्हाला माहित आहे का?

फार्मा कंपन्यांना काही गोष्टी अन्न आणि औषध नियामक प्रशासनाने बंधनकारक ठरवलेल्या आहेत. त्यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'पेशंट इन्फॉर्मेशन पॅकेज इन्सर्ट!'

पेशंट इन्फॉर्मेशन पॅकेज इन्सर्ट नाव जरी मोठे वाटत असले तरीही तुमच्या औषधांच्या खोक्यांमध्ये एक बारीक गुंडाळा करून ठेवलेली चिठ्ठी असते, तिला पेशंट इन्फॉर्मेशन पॅकेज इन्सर्ट म्हणतात. आता तुम्ही म्हणाल "हॉ, त्यात काय, ती असतेच. आमच्यासाठी काहीही लिहिलेले नसते त्यात. डॉक्टर नाहीतर केमिस्ट सांगेलच, काही असेल तर."

आपण काय करतो, फार तर कॉस्मेटिक उत्पादनाचे लिफलेट (पत्रक) वाचतो. (पॅकेज इन्सर्टला साध्या भाषेत लिफलेट म्हणतात) इतर औषधांचे पॅकेज इन्सर्ट आपण बिंदास कचऱ्यात फेकतो. पण हे पॅकेज इन्सर्ट तुमच्यासाठीच असते. कारण त्यात तुम्ही घेणार असलेल्या औषधांच्या बाबतीत अत्यंत महत्वाच्या गोष्टी लिहिलेल्या असतात.

साधारणतः १९६८ मध्ये हे पेशंट इन्फॉर्मेशन पॅकेज इन्सर्ट एका हृदय रोगाच्या औषधासाठी वापरण्यात आले. नंतर हळूहळू या पत्रकावर लिहिण्यात येणाऱ्या माहितीच्या तक्त्यामध्ये बदल करण्यात आले. आता ह्या छोट्या छोट्या अक्षरात काय असते? साधारणतः पत्रकात सर्वात वर औषध, त्याचा डोस, त्याचे दुष्परिणाम लिहिलेले असतात.

त्याखाली कशासोबत घ्यावे, काशासोबत घेऊ नये हे लिहिलेले असते.जास्तीचे औषध घेतले किंवा त्वचेवरील औषध पोटात गेले तर काय करता येईल हे लिहिलेले असते. शेवटी ते औषध कसे आणि कुठे ठेवावे. उरलेल्या किंवा जुन्या औषधाची विल्हेवाट कशी लावावी हे लिहिलेले असते.

बघा! नाहीतर आपल्यातले काही लोक डॉक्टरकडे न जाता "मागे त्याचसाठी दिले होते औषध!" म्हणून जुनेच औषध घेतात. पण अशी काही उत्पादने आहेत, त्यांचे पत्रक आपण वाचलेच पाहिजेत. मगच औषधे घ्यायला हवीत. जसे की अँटिबायोटिक्स!

भलेही आजकाल ही औषधे वापरायला हानिकारक नाहीत, तरीपण अॅम्पिसिलिनसारख्या काही अँटिबायोटिक्सचा दुष्परिणाम जाणवू शकतो. फेफरे मिरगीची औषधे घेऊन झोप येणे, चक्कर येणे असे दुष्परिणाम जाणवू शकतात आणि ते पत्रकात सांगितलेले असतात.

काही औषधे जशीच्या तशी वापरता येत नाहीत, त्यांना पाण्यात पातळ करून वापरावे लागते.काही औषधं घेताना दुधासोबत घेतले तर त्यांचा परिणाम होत नाही. काही औषधे दुसऱ्या औषधांबरोबर घेतली, तर त्यांचे परिणाम बदलू शकतात. पेशंटने स्वतः हे वाचणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हे पेशंटसाठी तज्ज्ञ लोकांनी लिहिलेले असते. सांगण्या-ऐकण्यात गैरसमज झाले तरी वाचण्यात गैरसमज होऊ शकत नाही. यामुळे आपण खूप मोठे मोठे दुष्परिणाम टाळू शकतो आणि पॅकेज इन्सर्ट पत्रकाचा मुख्य हेतू हाच आहे.

काही औषधे वापरण्यासाठी साधने आवश्यक असतात जसे की दम्यासाठी अस्थमा पंप वापरला जातो. हा पंप कसा वापरावा, याबद्दल माहिती असणारा कागद त्यात असतो.

औषधांचा प्रत्येक डोस हा मोजलेला आणि मापलेला असतो. त्याचे जास्तीचे डोस चुकून घेतले गेले असल्यास करावे लागणारे प्राथमिक उपचार पॅकेज इन्सर्ट लिफलेटमध्ये लिहिलेले असतात. काही वेळा शरीराच्या बाहेर वापरायची औषधे चुकून पोटात जातात. त्यावेळी कोणते घरगुती उपचार करावेत, ते किती घातक असू शकते हे सर्व लिफलेटवर लिहिलेले असते.

कॉस्मेटिक किंवा विषारी उत्पादनाची पत्रके चार भाषांमध्ये लिहिलेली असल्या कारणाने भाषेची अडचण येत नाही.

काही औषधे वापरताना त्यांची त्वचेवर किंवा कानामागे चाचणी करावी लागते. नाहीतर, काहीवेळा धोक्याचे ठरू शकते. चाचणी करावी, हेसुद्धा त्या छोट्याश्या पत्रकात लिहिलेले असते. काही वेळा खूप महत्त्वाच्या गोष्टी ह्या विशिष्ट प्रकारची चिन्हे वापरून लिहिलेल्या असतात. जसे की विषारी द्रव्य कचऱ्यात टाकू नये.ज्वलनशील पदार्थ लहान मुलांपासून दूर ठेवा.

तर हा छोटासा कागद, पत्रक, लिफलेट, पेशंट इन्फॉर्मेशन पॅकेज इन्सर्ट आपल्यासाठी खुप महत्वाचा असतो. मग पुढच्या वेळी औषध घेताना हे पत्रक नीट वाचा, बरं का!!!

 

लेखिका: क्षमा कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required