computer

घरातल्या या १० वस्तूंनाही एक्सपायरी डेट असते!! जाणून घ्या कोणती गोष्ट किती काळ वापरावी..

आपण नेहमी दुकानात खरेदी करायला गेल्यावर खाद्य पदार्थाच्या एक्सपायरी तारखांकडे लक्ष देतो. ती तारीख तो खाद्यपदार्थ किती दिवस टिकणार आहे याबद्दल माहिती देतो. पण तुम्हाला माहीत आहे का, जश्या खाद्य पदार्थांवर एक्सपायरी तारखा असतात तश्याच इतर काही वस्तू वापरण्यासाठी सुद्धा असतात? आज आम्ही अश्या १० दैनंदिन वस्तू बद्दल सांगणार आहोत ज्याची एक्सपायरी (कालबाह्यता) किती आहे हे कदाचित तुम्हाला माहिती नसेल.

टूथब्रश ( 3 महिने)

तुम्ही टूथब्रश दिवसातून एकदा किंवा दोनवेळा वापरत असाल. टूथब्रशची एक्सपायरी तारीख दिलेली नसते. पण तुम्ही तो जितका जास्त वापरता तितका तो कालांतराने कमी प्रभावी होतो. बहुतेक डेंटल असोसिएशन दर तीन महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदलण्याची शिफारस करतात. तुमचे डॉक्टर ही हे सांगत असतील. जर अधिक काळ वापरला तर टूथब्रशचे केस झिजतात आणि ब्रश योग्यरीत्या काम करत नाही. हिरड्यावर घासले गेल्यास त्यांनाही इजा होऊ शकते.

उशा (2,३) वर्षे

रात्री चांगली झोप येण्यासाठी आणि मानेला आधार देण्यासाठी तुमच्याकडे आरामदायी उशी असणे आवश्यक आहे. उशा तश्या वर्षानुवर्षे टिकतात. पण साधारणपणे त्या किती दिवस वापराव्यात? हे तपासण्यासाठी बऱ्याचदा ब्रांडेड उशांच्या कव्हरवर स्टॅम्प छापलेला असतो. उशांवर डोके ठेवून झोपल्याने त्यावर शरीरातील तेल, मृत त्वचेच्या पेशी साठतात. त्यामुळे जंतूसंसर्ग होतो. तिथे धुळीच्या कणांना वाढण्यासाठी योग्य वातावरण मिळते. जरी अभ्रे बदलले तरी उशा २-३ वर्षांनी बदलणे गरजेचे असते.

चप्पल (6 महिने)

वर्षानुवर्षे तीच चप्पल वापरायची सगळ्यांना सवय असते. बरेच जण चप्पल तुटत नाहीत तोपर्यंत वापरतात. पण ही सवय चांगली नाही. वारंवार चप्पल धुतली जात नाही. त्यामुळेच पायाला बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. खूप घाम आल्याने सुद्धा अनेक जंतू त्यावर असतात. चप्पलमुळे ते सगळीकडे पसरतात. म्हणून त्या दर ६ महिन्यांनी त्या बदलल्या पाहिजेत असं म्हणतात.

टॉवेल (१-३ वर्ष )

तुम्हाला माहीत आहे का , की तुमचा आवडता टॉवेल 1-3 वर्षांत बदलणे गरजेचे असते. बाथरूममध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॉवेल आहे. जर त्यावर जंतू असतील तर अंघोळ करून उपयोग काय ? म्हणून जर टॉवेल नियमितपणे धुतले नाहीत तर ते अनेक आजारांचे कारण बनतात. त्यामुळे टॉवेल कितीही सुंदर असला तरी तो तीन वर्षांपेक्षा जास्त काळ वापरू नका. तसेच ओला असल्यास त्याचा अत्यंत कुबट वास येत असेल तर तो नक्की बदला.

स्पंज (२ आठवडे )

स्पंज साफ सफाई करण्यासाठी सोपे असतात. पण त्यावर सगळ्यात जास्त जंतू असतात. त्यावर बुरशी बसते आणि अन्न साठल्याने खूप खराब होतात. ते वारंवार गरम पाण्याने धुतले पाहिजे आणि १५ दिवसात बदलले पाहिजे. 

कंगवा (१ वर्ष )

कंगवा तुमच्या निरोगी केसांची काळजी घेतो आणि मस्त केशरचना बनवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण अनेकांना हे माहित नाही की आठवड्यातून एकदा तरी हेअरब्रश साफ न केल्यास तुमचे केस खराब होऊ शकतात. डोक्यावरची त्वचा निरोगी ठेवायची असल्यास कंगवा तुटला नसेल तरीही बदलावा.

चॉपिंग बोर्ड (१ वर्ष)

जर तुम्ही स्वयंपाकघरात लाकडी चॉपिंग बोर्ड वापरत असाल तर लक्षात ठेवा तो एका वर्षानंतर बदलायला हवा. कारण सुरीने कापताना त्यावर खोल चिरा पडतात आणि त्यामध्ये अन्नाचे कण साठतात. शिवाय त्याच्या खालच्या भागात बुरशी तयार होते. जरी तुम्ही धुवून वाळवले तरी ते जंतू राहतात. प्लास्टिक चॉपिंगबोर्ड सुद्धा अधिक काळ वापरणे चांगले नाही.

परफ्यूम्स (१-३ वर्ष )

परफ्यूम्समुळे शरीराची दुर्गंधीं कमी होते आणि त्या वासाने आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की परफ्यूमचीही एक्सपायरी डेट असते. तुम्हाला तुमचा परफ्यूम जास्त काळ टिकवायचा असेल तर ते थंड, अंधाऱ्या ठिकाणी ठेवा. जर तुमच्या परफ्यूमचा रंग किंवा वास बदलला तर लगेच फेकून द्या. तुम्ही सीलबंद बाटली तीन वर्षांपर्यंत ठेवू शकता, तर उघडलेली बाटली एक वर्षांपर्यंत वापरू शकता.

स्पोर्ट शूज ( खेळण्याचे बूट १ वर्ष )

स्पोर्ट शूज हे रोज व्यायाम करताना आणि फिरताना वापरले जातात. त्यामध्ये पायाला आराम मिळण्यासाठी कुशनिंग असते. आपण खूप वर्ष टिकावेत म्हणून मोठ्या ब्रान्डसचे शूज विकत घेतो. पण तुमच्या सांध्याच्या चांगल्या आरोग्यासाठी हे वर्षभराने बदलणे सगळ्यात चांगले ठरते. कारण त्याचे सोल आणि आतली कुशनिंग कालांतराने तितकी प्रभावी राहत नाही. तसेच ते धुतले न गेल्यास त्यात जीवजंतू बसतात आणि मोजे वापरले तरीही पायांला त्याचा संसर्ग होऊ शकतो.

 हँड सॅनिटायझर (2-3 वर्षे)

COVID-19 मध्ये हँड सॅनिटायझर सगळ्यात जास्त वापरले गेले आहेत. अजूनही त्याचा वापर होतो आहे. जंतूंपासून संरक्षण करण्‍यासाठी हे अतिशय उत्तम आहे. पण हँड सॅनिटायझरही कालबाह्य होते. त्याच्या लेबलवर किंवा तळाला नीट पाहिल्यावर तुम्हाला दिसेल. २-३ वर्षानंतर त्याची जंतू मारण्याची कार्यक्षमता कमी होते. अगदी तुम्ही घरात वस्तूंवर किंवा इतर किटकांवर मारण्यासाठी जंतुनाशक वापरत असाल तेही बदलावे.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली, आवडल्यास जरूर शेयर करा.

शीतल दरंदळे