computer

हर्नियाचे प्रकार, लक्षणं आणि उपचार पटकन वाचून घ्या आणि तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे ही वाचाच..

हर्निया हा तसा कुणालाही झालेला आढळतो. हा सामान्य आढळणारा विकार असला तरी नीट काळजीच्या अभावी अगदी जीवावरही बेतू शकतो. पटणार नाही, पण साधारण १०% लोकांना हा विकार होतो असं संशोधनात्मक सर्व्हे सांगतात.

हर्नियाचा शब्दश: अर्थ पाहायचा तर शरीरातल्या छिद्रांमधून एखादे इंद्रिय किंवा अवयव किंवा त्याचा एखादा भाग बाहेर येणे म्हणजे हर्निया. कधीकधी पोटातील स्नायू कमजोर होतात. अशावेळी सततच्या खोकल्यामुळे, नैसर्गिक विधींच्या वेळी पोटावर जोर येऊन हर्नियाचा त्रास उद्भवतो.

या हर्नियाचाच एक प्रकार आहे हिएटल हर्निया. या विकारात छाती व पोट यांच्यामध्ये असलेल्या डायफ्राम या स्नायूंच्या पडद्यातील छिद्रातून जठर छातीकडे सरकते. या छिद्राला हिएटस म्हणतात, त्यावरून या विकाराला हिएटल हर्निया हे नाव आहे. काही ठिकाणी यालाच स्टमक हर्नियाही संबोधले जाते. याचे मुख्यत्वेकरून स्लायडिंग व पॅराइसोफेगल असे दोन प्रकार आहेत. सामान्यतः अन्ननलिका ही हिएटसमधून जाऊन मग जठराला जोडली जाते. स्लायडिंग हर्नियामध्ये जठर आणि अन्ननलिकेचा खालचा भाग डायफ्राममधून छातीकडे सरकतो. बहुतांश लोक हर्नियाच्या या प्रकाराने त्रस्त असतात. पॅराइसोफेगल हर्निया हा प्रकार अधिक धोकादायक आहे. यामध्ये अन्ननलिका व जठर हे त्यांच्या मूळ जागीच राहतात. पण जठराचा काही भाग हिएटसमधून अन्ननलिकेच्या शेजारी सरकतो. हे होताना तो दबला जातो. त्यामुळे या भागाचा रक्तपुरवठाही बंद होऊ शकतो. त्यामुळे काही डॉक्टर याला स्ट्रँग्युलेटेड हर्निया म्हणतात.

आता हा ओळखणार कसा? असा विचार करत असाल ना? आजार कोणताही असला तरी तो ओळखला जातो ते त्याच्या लक्षणांवरून. अनेकांना हिएटल हर्नियाची लक्षणे दिसून येत नाहीत. सर्वसाधारणपणे हर्नियाची खालील लक्षणे आपण सांगू शकतो:

  • ऍसिडिटीमुळे छातीत होणारी जळजळ,
    -छातीत दुखणे,
    -ढेकर, गिळताना त्रास होणे,
    -तोंडाची चव जाणे,
    -पोट बिघडणे, उलट्या, श्वास घेण्यास अडचण येणे
  • पोट किंवा छातीत असह्य वेदना, पोटात वायू धरून शौचाला साफ न होणे, पोट बिघडणे, उलट्या ही स्ट्रँग्युलेटेड हर्नियाची लक्षणे असू शकतात. अशा वेळी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब उपचार घेतल्यास त्रास कमी होतो.

हर्नियाच्या कारणांचा मागोवा घेतला तर खालील बाबी आढळून येतात

-जन्माला येताना नेहमीपेक्षा मोठे हिएटल छिद्र असणे
-हिएटल छिद्राच्या जवळपास दुखापत होणे
-वयोमानापरत्वे डायफ्राममध्ये होणारे बदल
-गर्भधारणेमुळे, लघवी रोखून धरल्याने, जड वजन उचलल्याने, कफामुळे, स्थूलत्वामुळे उदरावरचा ताण वाढणे.
-अतिरिक्त वजन असणाऱ्या पन्नाशीच्या पुढील व्यक्तीना हर्निया होऊ शकतो.

हिएटल हर्नियाचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक असते. हिएटल हर्नियाच्या अचूक निदानासाठी डॉक्टर काही चाचण्या करतात

बेरियम टेस्ट
यामध्ये बेरियमचे द्रावण प्यायला लावतात. यामुळे इच्छित भागाचा एक्स-रे चांगला येतो. परिणामी डॉक्टर अधिक चांगल्या प्रकारे जठर व अन्ननलिकेची तपासणी करू शकतात.

एन्डोस्कोपी

यामध्ये एक लांब व बारीक नळी घशातून आत घालतात. तिच्या टोकाशी असलेल्या कॅमेऱ्याने अन्ननलिका आणि जठर यांचे स्पष्ट चित्र मिळते.

इसोफोगल मॅनोमेट्री

यामध्ये एक वेगळ्या प्रकारची नळी घशातून आत घालतात आणि त्याद्वारे गिळताना अन्ननलिकेतील दाब तपासला जातो. अशा निरनिराळ्या चाचण्या करण्याचा सल्ला देतात.

निदान झाले की पुढील टप्पा म्हणजे उपचार. पण लक्षणे दिसत नसतील तर बरेचदा उपचाराची गरज नसते. ऍसिडिटी किंवा तत्सम त्रास होत असल्यास डॉक्टर त्यावर उपचार करतात. यासाठी अँटासिड, जठराने जास्त आम्ल निर्माण करू नये यासाठीचे उपचार, जठरातील आम्ल अन्ननलिकेत येऊ नये यासाठी असलेले स्नायू मजबूत करण्यासाठीचे उपचार यांचा समावेश असतो. पॅराइसोफेगल हर्निया असणाऱ्या रुग्णांना डॉक्टर शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवतात. या शस्त्रक्रियेत प्रामुख्याने लॅप्रोस्कोपी केली जाते. ही शस्त्रक्रिया वेदनारहित व सुरक्षित असते. या शस्त्रक्रियेनंतर आरोग्यात होणारी सुधारणाही बाकीच्या पारंपरिक शस्त्रक्रियांंपेक्षा जलद असते. हे झाले उपचार अर्थात आजार झाल्यास त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग.

पण रोग झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी केलेले प्रयत्न नक्कीच चांगले, नाही का? विशेषतः हर्नियासारख्या विकारांमध्ये जीवनशैलीतील बदल खूप प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ

१. जेवण झाल्यानंतर ३ ते ४ तास व्यायाम करू नये.

२. आहारात आम्लयुक्त पदार्थ टाळावेत. शस्त्रक्रियेपश्चात २-३ महिन्यांपर्यंत मऊसर पदार्थ खावेत.

३. आहार बेताचा पण संतुलित असावा. वजन आटोक्यात ठेवावे.

४. धूम्रपान वर्ज्य करावे.

५. शरीरावर ताण पडेल असे घट्ट कपडे घालू नये.

रोग होऊ नये म्हणून आपल्या जीवनशैलीत केलेले बदल हे आपल्याला रोगापासून चार हात लांब ठेवतील हे नक्की.

सबस्क्राईब करा

* indicates required