computer

कोरोनाला हरवण्यासाठी चक्क इबोलावरचं औषध वापरतायत? रेमडेसीवीर औषधाबद्दल या गोष्टी जाणून घ्या !!

गेले काही महिने वैद्यकीय जगताची परिस्थिती 'रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग' अशी आहे. कोवीड जगभर वेगाने पसरतो आहे. त्यावर खात्रीलायक औषध अजूनही आपल्या हातात नाही. सोशल डिस्टन्सींग उपयुक्त असले तरी त्यामुळे अनेक देश आर्थिक गर्तेत ढकलले जात आहेत. आता परिस्थिती नाजूक आणि अगतिकतेची झाली आहे. एखाद्या औषधाच्या इलाजाने रोगी बरा होण्याची अंधूक शक्यता दिसली तरी ते औषध वापरले जाते आहे. सध्या इबोला या विषाणूवर गिलीयाड या कंपनीने शोधलेले रेमडेसीवीर हे औषध अमेरिकेत वापरण्यात येणार आहे.

कोवीडला टक्कर देणारे व्हॅक्सिन अजूनही जन्माला आलेले नाही. ते इतक्या घाईघाईत बनेल अशी शक्यताही दिसत नाही. शास्त्रज्ञांच्या मते इतक्या कमी वेळात व्हॅक्सिन बनवणे म्हणजे १०० वर्षाचं काम १० सेकंदात होईल अशी आशा बाळगण्यासारखं आहे. व्हॅक्सिन बनवणं अनेक वर्षांचं काम असतं. त्यात खात्रीचा मार्ग मिळण्याआधी अनेक प्रयत्न अपयशी ठरू शकतात. तरीपण अनेक कंपन्या शक्य तितक्या लवकर हे व्हॅक्सिन बनवण्याचा प्रयत्न करत आहेत.

आजच्या तारखेस एकूण १११ व्हॅक्सिन परिक्षणाखाली आहेत. १९७ उपचार पध्दती विचाराधीन आहेत.  त्या १११ व्हॅक्सिन्सपैकी फक्त ९ व्हॅक्सिन्स क्लिनीकल टेस्टींगच्या पातळीवर आहेत, म्हणजे माणसांवर वापर करण्याच्या तयारीत आहे. बाकी १०२ व्हॅक्सिन अजून प्री-क्लिनीकल म्हणजे माणसावर प्रयोग करण्यापूर्वीच्या पातळीवर आहेत. क्लिनीकल टेस्टिंगच्या तयारीत असलेले व्हॅक्सिन आधी छोट्या समूहात वापरले जाईल. त्यानंतर समूहातील माणसांची संख्या वाढवत नेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर त्याचे नोंदणीकरण आणि प्रत्यक्ष फॅक्टरीत तयार होई होईस्तो पुढचे वर्षं उजाडेल. त्यामुळे उपलब्ध असलेल्या औषधांचाच वापर करणे हा तात्पुरता मार्गच आपल्यासाठी मोकळा आहे.

काही दिवसांपूर्वी मलेररियावरचे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध कोवीडवर जालीम उपाय आहे अशा समजातून जगभरातून या औषधाची मागणी वाढली. या औषधाचा वापरही करून बघण्यात आला. पण काही दिवसांतच हे कळून आले की हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आपण समजत होतो तसे तितके प्रभावी नाही. त्यामुळे आता जगाचे लक्ष रेमडेसीवीर या औषधाकडे वळले आहे. रेमडेसीवीर जेलॅड या कंपनीचे उत्पादन आहे. या कंपनीने यापूर्वी एकेकाळी इबोला, मर्स, सार्स या व्हायरसशी लढताना प्राण्यांवर रेमडेसीवीर वापरून पाहिले होते. तेव्हा  उपलब्ध झालेल्या डेटावरून आता रेमडेसीवीर हे औषध कोविडवर वापरण्यासाठी अमेरिकन सरकारने परवानगी दिली आहे. 

रेमडेसीवीर हे रामबाण औषध नाही याची वैद्यकीय जगताला पूर्ण  कल्पना आहे. पण सध्या तरी हे औषध अ‍ॅड्जंक्टीव्ह थेरेपी म्हणजे सहायक चिकित्सा म्हणून रेमडेसीवीरचा वापर करावाच लागणार आहे. बर्‍याच रोग्यांना रेमडेसीवीर दिल्यावर असे लक्षात आले आहे की या औषधामुळे रोगी लवकर बरा होण्यास मदत होते आहे. एखादा रोगी जर १५ दिवसांत बरा होत असेल तर तो कालावधी ११ दिवसांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यामुळे रेमडेसीवीरचा वापर 'कॉशसली ऑप्टीमीस्टिक' म्हणजे सावध आशावादातून केला जातोय! हे औषध वापरण्यात अडचणी आहेत याची कल्पना असूनही ते काही जणांना मृत्यूच्या दारातून मागे खेचून आणेल असा डॉक्टरांचा आशावाद आहे. सोबत जर १५ दिवसांचा कालावधी ११ दिवसांपर्यंत खाली येत असेल तर त्याचा अर्थ असाही आहे की ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि बेड या सुविधा दुसर्‍या रोग्याला चार दिवस आधीच मिळणार आहेत. त्यामुळे साहजिकच मृत्यूचे प्रमाण कमी होणार असाही आशावाद आहे. 

कोवीड SARS-CoV2 या विषाणूमुळे होतो. एकदा शरीरात प्रवेश मिळाला की हा विषाणू  RdRp या एंझाइमच्या मदतीने आपल्या शरीरातल्या पेशींचा उपयोग फॅक्टरीसारखा करतो. काही वेळातच एका विषाणूंचे अनेक विषाणू होतात आणि हे जलद गतीने होत राहते. रेमडेसीवीरचे इंजेक्शन जर रोग्याला intravenous म्हणजे थेट रक्तवाहिनीत दिले तर RdRp या एंझाइमचे उत्पादन थांबते. परिणामी विषाणूची वाढ थांबते. जर्नल ऑफ बायोलॉजीकल केमेस्ट्रीने रेमडेसीवीरच्या वापराला दुजोरा दिला आहे.

आता गिलीयाड 'सिंपल' या अभ्यासगटाद्वारे रेमडेसीवीरच्या वापरातील शक्याशक्यतेचा अभ्यास करत आहे. सोबत WHO चा अभ्यासगट अमेरिकेची NIAID,  फ्रेंच सरकारचा अभ्यासगट Inserm’s DisCoVeRy आणि चीनच्या दोन प्रयोगशाळा रेमडेसीवीर कोवीडवर कसे वापरता येईल याचा अभ्यास करत आहेत. 

रेमडेसीवीरचा पुरेसा पुरवठा देण्याचे गिलीयाडने मान्य केले आहे. या जटिल समस्येचे उत्तर येत्या पंधरा दिवसात मिळेलच, तोपर्यंत सोशल डिस्टन्सींग हा एकच उपाय आपल्या हातात आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required