computer

ग्लेनमार्कच्या आयपीओसाठी अर्ज करण्यापूर्वी हे १० महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या!!

या बातमीसाठी थोडा उशीर झाला आहे हे खरं आहे पण अजूनही दोन दिवस आहेत, संधी हुकायला नको असं अनेकजण म्हणत आहेत. हे आम्ही बोलत आहोत 'ग्लेनमार्क लाईफ सायन्से'सच्या आयपीओबद्दल!!

आयपीओ म्हणजे काय हे आम्ही तुम्हाला 'झोमॅटो'च्या लेखात समजावून सांगितलं होतंच. म्हणून ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसच्या आयपीओची ढोबळ माहिती देण्यात आम्ही वेळ न घालवत नाही. आजच्या लेखात या कंपनीच्या आयपीओत अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला नेमके काय माहिती असावे तेच सांगणार आहोत.

१. ग्लेनमार्क फार्मा आपल्यासाठी नवी कंपनी नाही. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस ही ग्लेनमार्क फार्मा या औषध उत्पादन करणार्‍या कंपनीची आतापर्यंत उपकंपनी होती. म्हणजे पालक-बालक असा हा प्रकार आहे. आता आयपीओनंतर फार्मा आणि सायन्सेस या दोन कंपन्या वेगवेगळ्या होऊन काम करतील आणि त्यांचे शेअरबाजारातील लिस्टींग वेगवेगळे असेल. आर्थिक जगतात याला 'स्पीन-ऑफ' असे म्हणतात. १९७७ साली स्थापन झालेल्या ग्लेनमार्कने  ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले ते त्यांच्या एकाच उत्पादनाने, 'कँडीड' या मलमामुळे! तुमच्या घरातील औषधाचा कप्पा चेक करा, या मलमाची ट्यूब सापडेलच सापडेल!
त्यामुळे बरीच वर्षे ग्लेनमार्कची बाजारातील ओळख ' डर्मॅटॉलॉजी' म्हणजे स्कीन स्पेशालीस्ट अशीच होती. आजही जगाच्या कानाकोपर्‍यात ग्लेनमार्कची ही उत्पादने प्रसिध्द आहेत. थोडक्यात, कंपनी चांगल्या जातकुळीतील आहे.
पण आज आपण नव्या आयपीओबद्दल बोलणार आहोत, त्यामुळे जुन्या पालक ग्लेनमार्क फार्माबद्दल जास्त न बोलता या पालक आणि बालक या दोन कंपन्यांत काय फरक आहे ते समजून घेऊया.

२. औषधी कंपन्या दोन प्रकारच्या असतात. काही कंपन्यांना 'फॉर्म्युलेशन कंपनी म्हणून ओळखले जाते. या कंपन्या औषधाचा मूळ कच्चा माल विकत घेऊन त्यांचे 'डोसेस' बनवतात. तर दुसरा प्रकार म्हणजे काही कंपन्या 'एपीआय' कंपन्या म्हणून ओळखल्या जातात. एपीआय म्हणजे Active Pharmaceutical Ingredient. काही कंपन्या फॉर्म्युलेशन आणि एपीआय दोन्ही बनवतात. ग्लेनमार्क फार्मा फॉर्म्युलेशन आणि एपीआय दोन्हींचे उत्पादन करते, पण या आयपीओनंतर एपीआयचे काम ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस करणार आहे.

या क्षेत्राची फारशी माहिती नसलेल्या गुंतवणूकदारांना एक उदाहरण देऊन हा फरक समजावून सांगण्याचा एक प्रयत्न करूया!
ताप आला की आपण क्रोसीन घेतो. या क्रोसीनच्या गोळीचा एपीआय म्हणजे पॅरासिटेमॉल. हे पॅरासिटेमॉल विकत घेऊन त्यांच्या गोळ्या बनवणे म्हणजे 'फॉर्म्युलेशन'. सोप्या शब्दात सांगायचे तर बुंदी म्हणजे एपीआय आणि वळलेला लाडू म्हणजे  फॉर्म्युलेशन!!

३. आता एपीआय कसे बनतात? तर 'मॉलीक्यूल' पासून. मॉलीक्यूल म्हणजे शरीरात जाऊन प्रत्यक्ष काम करणारे रासायनिक रेणू . हे 'मॉलीक्यूल' जन्माला घालणे हे कंपनीच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट लॅब करत असतात. या मॉलीक्यूलच्या विकासानंतरच औषध जन्माला येऊ शकते .त्यामुळे मॉलीक्यूलवर मालकी हक्क असणे फार महत्वाचे असते. मॉलीक्यूल 'पेटंट' कायद्याखाली बंदिस्त नोंद केलेले असतात. त्यामुळे एखादा मॉलीक्यूल शोधल्यावर पुढची अनेक वर्षे कंपनीला मक्तेदारी मिळते. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसकडे अशा १२० मॉलीक्यूलची मालकी आहे ज्यांचे आजचे मूल्य काही अब्ज कोटी डॉलर्स आहे.

४. दुसर्‍या कंपन्यांसाठी माल म्हणजे औषधे/एपीआय बनवून देणे याला contract development and manufacturing operations (CDMO) असे म्हणतात. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस या क्षेत्रातही अग्रेसर आहे. टेवा -टॉरंट फार्मा- अरबिंदो फार्मा या आणि इतर अनेक कंपन्या ग्लेनमार्कच्या सेवेचा फायदा घेतात.

५. गुजरातमध्ये अंकलेश्वर- दाहेज -महाराष्ट्रात मोहोळ आणि कुरकुंभ येथील चार मोठ्या फॅक्टरींमधून ग्लेनमार्कचे उत्पादन चालते. २०१५ पासून आतापर्यंत अमेरीकन US Food and Drug Administration (FDA) ने ३८ वेळा या फॅक्टरी आणि लॅबचे ऑडीट केले आहे. आतापर्यंत एकही वॉर्नींग लेटर अथवा एक्स्पोर्टसाठी धोकादायक असल्याची नोटीस कंपनीला मिळालेली नाही. याखेरीज इतर कंपन्यांनी ४३२ वेळा ऑडीट केले आहे. या ऑडीटमध्येही कंपनी विरोधात काहीही मुद्दे मांडलेले नाहीत. याचा अर्थ असा की ही कंपनी जागतीक दर्जाची कंपनी आहे.

६. आतापर्यंत जे महत्वाचे मुद्दे आपण वाचलेत ते कंपनीच्या संशोधन -उत्पादन आणि कार्यक्षमतेबद्दल होते, पण शेअर बाजारात केवळ इतक्याच मुद्द्यांचा विचार केला जात नाही. आयपीओच्या माध्यमातून मिळणारे शेअर्स आपल्या म्हणजे ग्राहकाच्या गळ्यात महाग -चढ्या भावात तर बांधले जात नाहीत ना, हे पण तपासावे लागते. यासाठी त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या P/E Ratio सोबत तुलना केली जाते. हा रेशीओ म्हणजे बाजारभाव आणि एका शेअरमागे होणारे उत्पन्न यांचे गुणोत्तर असते. P/E Ratio= Earnings per share/Market value per shareहे गुणोत्तर जास्त असेल तर शेअर महाग आहे असे समजले जाते. या क्षेत्रात डिव्हीज लॅब/ लॉरस लॅब्ज/ शिल्पा मेडीकेअर या कंपन्यांचा P/E Ratio अनुक्रमे ६४/३६/३६ असा आहे. ग्लेनमार्कचा विचार केला तर हा रेशीओ २५.०९ आहे म्हणजेच खूप कमी आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना हा शेअर स्वस्तात मिळतो आहे.

७. आता विचार करू या सटोडीयांच्या ग्रे मार्केटचा म्हणजे नोंदणी आधीच खाजगी व्यवहारात खरेदी-विक्री करणार्‍या दलालांचा! हे सौदे पूर्णपणे अनधिकृत असले तरी त्यावरून नोंदणीनंतर कंपनीच्या शेअरचा भाव काय असेल याची अटकळ बांधता येते. ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसचा शेअर ३०% अधिक किमतीत नोंदला जाईल असा या ग्रे-मार्केटचा अंदाज आहे.

८. हा आयपीओ येण्याच्या एक दिवस अगोदर एका अँकर इन्व्हेस्टरने ४५४ कोटींही गुंतवणूक केल्याने  बाजारात मिळणार्‍या शेअरची संख्या घटणार आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता वाढलेली आहे.

 

९. आज कंपनीच्या आयपीओचा पहिलाच दिवस होता. या एकाच दिवसात, पहिल्या तासात आयपीओ अनेक पटीने भरला गेला आहे. जर मागणी अशीच राहीली तर शेअरचे वाटप झाल्यावर नोंदणीच्या दिवशी भावाचा भडका उडण्याची शक्यता आहे

१०. नव्या गुंतवणूकदारांसाठी : शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या सल्लागाराचा विचार घ्या. अर्ज ऑनलाईन करता येतो. शेअर मिळाले तर उत्तम, पण न मिळाल्यास पैसे अडकून राहत नाहीत.

सबस्क्राईब करा

* indicates required