computer

हरनाझ संधूचा आजार नक्की काय आहे? तो कसा होतो? लक्षणे आणि त्यावर उपाय तरी काय?

सेलिब्रिटींना सोशल मिडीयावर या ना त्या कारणाने नेहमीच ट्रोल केले जाते. कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून, तर कधी त्यांच्या पेहरावावरून! सेलिब्रिटींसाठी ट्रोलींग हा काही नवा प्रकार राहिलेला नाही. २०२१ साली भारताला मिस युनिव्हर्सचा किताब पटकावून देणाऱ्या हरनाझ संधूही असंच ट्रोल केलं जात आहे, तेही तिच्या पेहरावासाठी किंवा तिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नाही. तर, अलीकडे तिने पोस्ट केलेल्या काही फोटो मधून तिचे वजन वाढल्याचे दिसत आहे आणि या कारणाने तिला ट्रोल केले जात आहे.

मॉडेलिंग किंवा ॲक्टिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी कसे दिसावे याचे काही मापदंड विनाकारण ठरले आहेत. हरनाझच्या वजनात नेहमीपेक्षा थोडी वाढ झाल्यानंतर काही लोकांनी तिच्या फोटोवर ती लठ्ठ असल्याच्या कमेंट्स केल्या. या ट्रोल्सकडे तिने साफ दुर्लक्ष केले आहे. मात्र एका प्रसार माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हरनाझने आपल्याला सेलिक डिसीज असल्याचे स्पष्ट केले आहे. या आजारपणामुळे ती आपल्या वजनावर फारसे नियंत्रण ठेऊ शकत नाही आणि मुख्य म्हणजे या आजारावर अजून कुठले औषधही सापडलेले नाही. हरनाझचा हा आजार नेमका आहे तरी काय आणि त्याची लक्षणे काय असतात? हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

सिलियाक डिसीज हा एक अनुवांशिक आजार आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची पचनसंस्था आणि त्यातही लहान आतडे फारच कमकुवत असते. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला ग्लुटेनयुक्त अन्न अजिबात पचत नाही. त्यात यासाठी कसलेच विशिष्ट औषध नसल्याने त्यांना आपल्या आहारातून ग्लुटेन असणारे पदार्थ वर्ज्य करावे लागतात. गहू, राई, बार्ली अशा धान्यात ग्लुटेन असते. तसेच ब्रेड, पास्ता, पिझ्झा असे बेकारी पदार्थ आणि काही डाळींमध्ये देखील ग्लुटेन असते.

ज्या व्यक्तींना हे ग्लुटेन पचवता येत नाही अशा व्यक्तींची ही समस्या वेळीच लक्षात आली नाही तर पुढे जाऊन त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. वेळेत लक्षात आले तरी यावर कुठलाही ठोस उपचार करता येत नाही, पण किमान रुग्णाला आपण कोणते पथ्य पाळले पाहिजे हे तरी समजते.

सिलीयाक आजाराची लक्षणे

या आजारात पोटात दुखी, अतिसार, वजन कमी होणे किंवा वजन वाढणे, गॅस धरणे, भूक न लागणे आणि त्वचेची आग होणे, रॅशेस उठणे अशी लक्षणे दिसून येतात. लक्षणे फारशी गंभीर नाहीत पण याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जाऊन आणखी गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

सिलीयाक आजार ओळखण्यासाठी रक्ताच्या काही तपासण्या आणि इंडोस्कोपी करावी लागते, ज्याला ड्यूओडीनल बायोप्सी म्हटले जाते. यावर ग्लुटेनयुक्त आहार पूर्णतः वर्ज्य करणे एवढाच एकमेव उपाय सध्या तरी अवलंबला जातो.

प्रत्येक रुग्णाच्या प्रतिकारशक्तीनुसार प्रत्येकाची लक्षणे वेगवेगळी असू शकतात, ज्यामुळे सिलीयाक आजाराचे निदान करणे कठीण होऊन जाते. अतिसार, थकवा, पोटदुखी, उलट्या-मळमळ ही काही याची सामान्य लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये डोकेदुखी, सांधेदुखी, माऊथ अल्सर, हाडे ठिसूळ होणे, अशी लक्षणे दिसतात. तसेच काही लोकांमध्ये तर अशी कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत.

सिलीयाक आजारावर अजूनपर्यंत तरी कोणतीही यशस्वी उपचार पद्धती शोधता आलेली नाही. त्यामुळे रुग्णांना खाण्यापिण्याची पथ्ये पाळण्याशिवाय काहीच पर्याय नाही. ग्लुटेन असेल असे पदार्थ वर्ज्य करण्याशिवाय रुग्णाकडे कोणताच पर्याय राहत नाही.

सिलीयाक डिसीजने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी संत्री, केळी, सफरचंद, पालक, बटाटा, मका, मशरूम, कांदा, ब्रोकोली, हे काही पदार्थ आहेत जे ग्लुटेन फ्री असतात.

हा आजार जनुकीय गुंतागुंतीमुळे होऊ शकतो. नुकताच जेडा स्मिथचाही असाच वेगळा आजार समोर आला होता. त्यामुळे लोकांनी दिसण्यावरुन कुणाची टर उडवताना थोडा संयम बाळगावा नाहीतर केलेले ट्रोलिंग असंवेदनशीलतेचे उदाहरण म्हणून लोकांच्या लक्षात राहिल!!

मेघश्री श्रेष्ठी