computer

सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत??

आख्ख्या जगाला शेकडो ज्या भारतीय गोष्टीचे सर्वात जास्त आकर्षण वाटत आले आहे ते म्हणजे 'भारतीय मसाले'.अगदी इकडे येऊन त्यांना तो खजिना लुटून न्यावासा वाटला इतके ते आकर्षण होते. आणि त्याला कारण ही तसेच आहे, आपल्या प्रत्येक मसाल्याचा पदार्थ हा सर्व बाबतीत सर्वगुण संपन्न असा आहे, त्यापैकी एक महत्वाचा आणि अगदी प्रत्येक घरामध्ये अत्यावश्यक पदार्थ म्हणजे 'जिरे'.संस्कृत मध्ये याला 'जिरक' असे अगदी त्याच्या कामाला साजेसे नाव आहे. जिरक म्हणजे थोडक्यात जो अन्न जिरवतो तो!  याला जिरेगिरे किंवा जिरू असंही काही ठिकाणी म्हणलं जातं.

आजच्या फास्टफूड च्या जमान्यात सर्वसामान्य लोकांना दोन गोष्टींचा प्रामुख्याने त्रास सहन करावा लागतो ते म्हणजे अपचन -आम्ल पित्त आणि त्याचा परिणाम म्हणून वाढणारे वजन. धावपळीच्या या युगात जे  जिरे तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो ते कसे ते आपण पुढील माहितीमध्ये पाहूया.

आयुर्वेदानुसार जिरे  पाचक आहे, उष्ण प्रवृत्तीचे आहे. भारतीय स्वयंपाकामध्ये गृहिणी रोजच्या रोज जिऱ्याचा वापर करतच असते, पण त्याच्या खर्‍या आरोग्यदायी गुणांचाफायदा घ्यायचा असेल  जिऱ्याचे पाणी हे सर्व ड्रुष्टीने योग्य मानले जाते.

जिरे रात्रभर पाण्यात भिजवले असता त्यामधले 'बायोऍक्टिव्ह कंपाऊंड' पाण्यामध्ये पूर्णपणे मिसळतात व जीरे फुगते यामुळे त्याची सर्व सत्वे पाण्यात उतरतात. असे हे पाणी सकाळी जाग आल्यावर रिकाम्या पोटी घेण्याचे खूप फायदे आहेत. जिऱ्यामध्ये अगदी कमी कॅलरी असतात, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम तसेच आयर्न  भरपूर प्रमाणात असते. जिऱ्या मध्ये flavonoids नावाचं एक घटक असतो जो अँटि ऑक्सिडंट म्हणून  काम करतो. शरीरात वर्षानुवर्षे साचून राहिलेली चरबी (body fat) कमी करण्यास जिरे पाणी अत्यंत उपयुक्त ठरते.

 

 

नियमित सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिण्याने होणारे काही ठळक फायदे-

▪️तुम्हाला जर अपचनाचा त्रास होत असेल तर नियमित जिरे पाणी प्यायल्याने ही समस्या दूर होऊ शकते.सकाळी पाणी पिल्याने आपले शरीर दिवसभराच्या कामासाठी सज्ज होते.

▪️जिर्‍याच्या पाण्यामुळे आपली चयापचय क्रिया सुधारते आणि त्यामुळे अतिरिक्त चरबी साठून राहत नाही आणि परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

▪️ सकाळी आपल्याला छोटी मोठी भूक लागलेली असते, त्यावेळी काहीही इतर खाण्यापेक्षा हे पाणी पिल्यास भूक मंदावते.

▪️ वजन कमी करण्यास जिऱ्याचे पाणी पिणे हा सर्वात सोपा मार्ग आहे.

▪️ महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता सुद्धा या पाण्याने कमी होते.विशेषतः ज्या महिलांना PCOS चा त्रास आहे त्यांना या पाण्याने बराच आराम मिळू शकतो. तसेच ज्या महिला बाळाला स्तनपान करतात त्यांच्यासाठी ही जिऱ्याचे सेवन लाभदायक आहे.

▪️ पोट फुगणे तसेच अपचनामुळे होणारी पोटदुखी रात्रभर भिजवलेले जिरे पाणी प्यायल्याने कमी होऊ शकते.

जिऱ्याचे पाणी करण्याची योग्य पदप्याय१ ग्लास पाणी उकळून त्यामध्ये२ चमचे जिरे घालावे व रात्रभर झाकून ठेवावे.सकाळी ते पाणी गाळून घ्यावे.

टिप- जिर्‍याच्या पाण्याबरोबर दालचिनी पावडर, लिंबू रस किंवा मेथी दाणे हे सुद्धा घेऊ शकता. आपल्या प्रकृतीनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्याने हे उपाय करावेत.

तर असे हे बहुगुणी जिरे अगदी सहज उपलब्ध आहे, जेवणामध्ये रुची वाढवण्याबरोबरच अनेक उपयुक्त गुणधर्म यामध्ये समावलेले आहेत. त्याचा पुरेपूर उपयोग आपण करून घेऊया.

-मोनाली कुलकर्णी.

सबस्क्राईब करा

* indicates required