computer

आजारी पडल्यावर गुगल करणं पडू शकतं महागात.....

जर तुम्हाला खोकला येत असेल, तुम्ही गोळ्या घेतल्या, कफ सिरप पण ट्राय करून बघितले तरी फरक दिसत नाहीये, मग तुम्ही घरगुती उपाय करून बघितला तरी फरक दिसत नसला की तुम्ही काय करता? बरेच लोक अशावेळी गुगल बाबाचा आसरा घेतात. पण थांबा राव!! जरी गुगल केल्यावर जगातली कुठलीही माहिती एका सेकंदात मिळत असली तरी इंटरनेटवरची प्रत्येक वेळी ही गोष्ट खरी असेल असं नाही. नुकतंच एका रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की  गेल्या तीन वर्षात कुठल्याही आजाराचा उपचार नेटवर शोधण्याच्या घटना वाढल्या आहेत.

मंडळी, माहितीसाठी लोक गुगलवर विश्वास ठेवतात. कारण एक शंका विचरल्यावर गुगल लाखो उत्तरं देते. तिथून माहिती मिळते हे तर खरं आहे, पण तिथे मिळणारी सगळी माहिती खरी नसते राव!! 

आता समजा, तुम्ही गुगल केले खोकला कशमुळे होतो? तर तिथे काहीही कारणापासून ते खोकला टीबीमुळे होतो असे सांगणाऱ्या बऱ्याच लिंक मिळतात. पण खोकला तर हवेतील बदलामुळे पण होऊ शकतो. आता तुमचा खोकला हा टीबीमुळे आहे की हवाबदलामुळे हे कसे समजेल? एक जोक फिरत असतो की जर तुम्ही गुगलवर मला अमका रोग झाला आहे का हे शोधलंत तर तिथे तुम्हाला तुमची लक्षणं कॅन्सरची आहेत हेच पटवून दिले जाईल. मुळात जास्त लोकांनी त्या बेवलिंकवर क्लिक करावं यासाठी खोटी आणि अतिशयोक्त माहिती या वेबसाइट्सवर असते. बरेचदा ते लिहिणाऱ्यांचा आणि मेडिकल शिक्षणाचा काहीएक संबंध नसतो.  

मुळात प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असतो आणि त्याच्यावरचा उपचारही प्रत्येकासाठी वेगळा असतो. अशावेळी जिथे जनरलाइजेशन करुन काहीही लिहिलेले असते, असं काहीतरी वाचून त्याप्रमाणे स्वतःचा उपचार करणे घातक ठरू शकते.

लोक गुगलवर सांगितलेली लक्षणे स्वतःच्या शरीरातल्या बदलांशी जोड़ून पाहतात आणि आपल्याला काहीतरी भयंकर आजार झाला आहे असा गैरसमज करून घेतात. अशावेळी काळजीपूर्वक डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही योग्य!! उशीर झाला तर परिस्थिती चिघळायची शक्यता जास्त. आपल्या युवराजच्या आईने नेटवर नाही, पण बाबालोकांवर विश्वास ठेवला आणि त्याचा कॅन्सर बळावला. कदाचित वेळेत उपचार घेतलेत तर थोडक्यात निभेल, जितका वेळ लावाल तितकं कोणाच्याही आरोग्यासाठी वाईटच, नाही का?

चांगले डॉक्टर्स हे कधीही नेटवरील माहितीपेक्षा चांगले असतात. वर्षभरात एकदा पूर्ण बॉडी चेकअप केले तर असा कुठलाही तोटा होण्याची शक्यता नसते. म्हणून शक्य झाले तर बॉडी चेकअप करणे कधीही उत्तम. मंडळी, जान है तो जहान है म्हटले जाते म्हणून इंटरनेटवरील माहितीवर विसंबून आरोग्यासारख्या महत्वाच्या गोष्टीसोबत खेळ करू नका.

 

लेखक : वैभव पाटील.