computer

'दिल की धडकन 'म्हणजे हृदयाच्या नियमित आणि अनियमित धडधडण्याविषयी सांगणार आहोत.

आपल्या शरीरातील अवयव तसे शांतताप्रेमी म्हणायचे. त्यांना नेमून दिलेली कामं ते कुरकुर न करता बिनबोभाट पार पाडत असतात. ह्या सगळ्या शांततामय वातावरणात एक असा अवयव आहे, जो आपलं कार्य कधी संथ गतीने चालतो,तर कधी जलदगतीने! कधी शांतपणे, तर कधी धडधडत जाणाऱ्या ट्रेनप्रमाणे. क्रिकेटच्या मॅचचा थरार अनुभवताना खास मैत्रीणीला प्रपोज करताना देखील तुम्हांला हाच अनुभव आला असेल. जीवनात असे अनेक प्रसंग येतात, जेव्हा ह्या अवयवाचं अस्तित्व प्रकर्षाने जाणवतं. थोडक्यात सांगायचं तर आज आम्ही तुम्हाला 'दिल की धडकन 'म्हणजे हृदयाच्या नियमित आणि अनियमित धडधडण्याविषयी सांगणार आहोत.

आपलं हृदय विशिष्ट लयीत -तालबध्द रितीने- सतत आकुंचन व प्रसरण पावत असते. आपल्या नेहेमीच्या भाषेत आपण त्याला 'पल्स रेट' असं म्हणतो. सर्वसाधारण प्रौढ व्यक्तिचा 'पल्स रेट' मिनिटाला ६० ते १०० ठोके असतो. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणाऱ्या तरुणांमध्ये कमी ठोके ही सामान्य बाब असू शकते. व्यायाम, वेदना आणि राग यामुळे एखाद्या व्यक्तीच्या हृदयाची गती बदलते. या लय म्हणजे रिदममध्ये पडणार्‍या फरकाला किंवा बदलाला वैद्यकीय परिभाषेत वेगवेगळी नावे आहेत. हृदयाची गती वेगवान असते तेव्हां त्याला वैद्यकीय भाषेत टॅकीकार्डिया, आणि धीमी असेल तर ब्रॅडीकार्डिया म्हणतात.

एखादी तरुण व्यक्ती जितकी तंदुरुस्त धडधाकट असेल, तितकी तिची हृदय गती कमी असते. उदाहरणार्थ ॲथलीट्सची हृदय गती सामान्यतः ६० पेक्षा कमी असते, कारण त्यांचे हृदय अत्यंत कार्यक्षम असते. बरं हे केवळ गती बद्दल नाही. हृदयाचे ठोके नियमित लयीत असले पाहिजेत. हृदयाचे दुहेरी ठोके असतात. यापैकी एक ठोका म्हणजे आधीच रक्ताभिसरण झालेल्या रक्ताला ऑक्सिजन देण्यासाठी हृदय आकुंचन पावते तेव्हाचा आणि दुसरा ठोका हृदय शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्ताचे अभिसरण करते तेव्हाचा. अशा दोन प्रकारच्या ठोक्यांमधील लय म्हणजे रिदम जेव्हा सातत्याने अनियमित होते तेव्हा हा डॉक्टरांचा विषय होतो. वैद्यकीय परिभाषेत त्याला अ-रिदमीया असे म्हणतात.

तुम्ही तुमच्या मनगटाच्या नाडीवर बोट ठेवून तुमची हृदय गती मोजू शकता. नाडी हा एक बिंदू आहे, ज्यावर हृदयाचे ठोके जाणवू शकतात. यासाठी मनगटाखेरीज इतर सर्वोत्तम जागा:
१. कोपरांच्या आतील बाजूस
२. मानेच्या बाजूकडील भाग
३. पायाचा वरचा भाग.

आता अनियमित हृदय लयीला वैद्यकीय भाषेत अ-रिदमिया असं म्हणतात हे आपण वाचलंच. पण याची कारणं काय असू शकतात ते आता बघू या.
अनेक कारणांमुळे हृदय चुकीच्या पद्धतीने कार्य करू शकते:
१)दारूचे अतिसेवन
२)मधुमेह 
३) कॉफी किंवा तत्सम पेयांचे अतिसेवन  
४)उच्च रक्तदाब 
५) हायपर-थायरॉईडीझम, किंवा अति-क्रियाशील थायरॉईड ग्रंथी 
६ )ताणतणाव 
७)धूम्रपान

टेकीकार्डिया (जलद अ-रिदमिया)
जलद अ-रिदमिया व्यायाम, भावनिक ताण, जास्त मद्यपान, धूम्रपान, किंवा सर्दी आणि ताप यावरील उत्तेजक घटक असलेल्या औषधांच्या वापरामुळे होऊ शकतो. अतिक्रियाशील थायरॉईड ग्रंथींमुळे (हायपर-थायरॉईडीझम) सुद्धां जलद अ-रिदमिया होऊ शकतो.

ब्रॅडिकार्डीया (मंद अ-रिदमिया)
वेदना, भूक, थकवा, पचन विकार उदाहरणार्थ जुलाब आणि उलट्या यामुळे मंद अ-रिदमिया होऊ शकतो. कमी सक्रिय थायरॉईड ग्रंथींमुळे संथ अ-रिदमिया होऊ शकतो.

अ-रिदमियाचे परिणाम निरुपद्रवी, तर कधी जीवघेणे असू शकतात. काही जीवघेण्या अ-रिदमियामध्ये कोणतीही लक्षणे उद्भवत नाहीत आणि काहींमध्ये गंभीर लक्षणे दिसू शकतात.

अ-रिदमियामुळे अशक्तपणा, व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे, धाप लागणे, चक्कर येणे, बेशुद्धावस्था किंवा मृत्यू होऊ शकतो. अ-रिदमियामुळे छातीत दुखणे आणि धाप लागणे यासह हृदय विकाराची लक्षणे वाढू शकतात. अशी लक्षणे उद्भवल्यास त्याकडे त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.

आता या समस्येचे स्वरुप . निदान आणि  उपचार काय हा पुढचा प्रश्न आहेच नाही का? 

इलेक्ट्रोकार्डियोग्राफी
इलेक्ट्रोकार्डियोग्राफी किंवा इसीजी ही अ-रिदमिया आणि त्याचे कारण निश्चित करण्यासाठी मुख्य निदान प्रक्रिया आहे. अ-रिदमिया अनेकदा अधूनमधून होत असल्यामुळे हृदयाची गती सतत रेकॉर्ड करणारा पोर्टेबल ईसीजी मॉनिटर उपयुक्त ठरतो.
क्वचितच उद्भवणारी, पण धोकादायक गती शोधण्यासाठी, डॉक्टर कधीकधी डाव्या कॉलरबोनच्या त्वचेखाली रेकॉर्डिंग यंत्र रोपण करतात. हे यंत्र हृदयाच्या अनियमित गतीचे रेकॉर्डिंग इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रसारित करते. हृदयाची जीवघेणी अनियमित गती असलेल्या लोकांना  रुग्णालयात दाखल केले जाते. त्यांच्या हृदयाची गती सतत रेकॉर्ड केली जाते आणि टेलिव्हिजन मॉनिटरवर ती प्रदर्शित होते.

इलेक्ट्रो-फिजियाॅलॉजिकल चाचणी
इलेक्ट्रो-फिजियाॅलॉजिकल चाचणी दरम्यान लहान इलेक्ट्रोड असलेले कॅथेटर्स रक्तवाहिनीद्वारे हृदयामध्ये जोडले जातात. हृदयाला उत्तेजित करण्यासाठी इलेक्ट्रोड्सचा वापर केला जातो आणि हृदयाच्या प्रतिसादाचे परीक्षण केले जाते, ज्यामुळे अ-रिदमियाचा प्रकार आणि उपचारपद्धतीचे पर्याय ठरवले जाऊ शकतात.

उपचार
हृदयाची निरुपद्रवी परंतु त्रासदायक गती असलेल्या लोकांसाठी अ-रिदमिया निरुपद्रवी आहे याची खात्री देणे हा उपचार पुरेसा असू शकते. कधीकधी अ-रिदमिया कमी वेळा उद्भवतात किंवा डॉक्टर एखाद्या व्यक्तीची औषधे बदलतात तेव्हा थांबतात. अल्कोहोल, कॅफीन टाळणे आणि धूम्रपान न करणे याची देखील मदत होते. जर फक्त व्यायामादरम्यान धडधड होत असेल तर कठीण व्यायाम टाळणे श्रेयस्कर असते. काहीवेळा उपचार प्रभावी आहेत की नाहीत हे डाॅक्टरांना समजेपर्यंत पेशंटला वाहन चालवणे थांबवावे लागते.

औषधे
असह्य लक्षणे किंवा हृदयाला धोका निर्माण करणाऱ्या जलद किंवा मंद गती नियमित करण्यासाठी अँटी-अ-रिदमिक औषधे उपयुक्त आहेत, मात्र कोणतेही एक औषध सर्वांसाठी लागू होत नाही. काहीवेळा  समाधानकारक प्रतिसाद मिळेपर्यंत अनेक औषधे वापरून पहावी लागतात.
(शाळेच्या पुस्तकात आपल्याला 'नॉर्मल पल्स रेट' मिनिटाला ७२ ठोके असतो हे वाक्य लक्षात असेलच. पण लक्षात घ्या हे  विधान सर्वसाधारण आहे. तेव्हा थोड्याश्या फरकाने घाबरू नका हे इथे नमूद करणे महत्वाचे आहे)

सबस्क्राईब करा

* indicates required