computer

डबघाईला आलेली इटालीयन कंपनी पार्लेने ४ लाखांत विकत घेतली आणि........!!

भारतात काही गोष्टींना त्यांच्या खऱ्या नावांनी नाही, तर त्या त्या क्षेत्रातील मोठ्या ब्रँड्सने ओळखले जाते. यावरून हे ब्रँड लोकांच्या मनात किती ठसले आहेत याची प्रचिती येते. लोकांना नूडल्स म्हणजे मॅगी वाटते, टूथपेस्ट म्हणजे कोलगेट, खोदकाम मशीन हे जेसीबी, फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स... उदाहरणं अनेक आहेत. त्याचप्रमाणे मिनरल वॉटर म्हणजे बिस्लरी हे समीकरणही तितकेच प्रसिद्ध आहे.

आपल्या यशाचा सर्वात मोठा पुरावा हा जेव्हा लोक आपल्याला कॉपी करायला लागतात हा असतो. या बाबतीत पण बिस्लेरीच आघाडीवर आहे. या दोन गोष्टी सिद्ध करतात की बिस्लेरी ही कंपनी किती खोलवर रुजली आहे. मार्केटमध्ये बिस्लेरी कमी आणि बेल्सरी, ब्रिसली अशी अनेक मिनरल वॉटर्स दिसतात. बिस्लेरीचे मार्केट लोकांना माहीत आहे म्हणून नावात थोडा बदल करून बिस्लेरीच्या मार्केटचा थोडा फायदा करून घ्यावे असे लोकांना वाटते.

बिस्लेरी हे निर्विवाद भारतातील मिनरल वॉटर क्षेत्रातील किंग आहेत. पण मार्केटिंग केले तर पाणी विकूनसुद्धा पैसे कमवता येतील हे बिस्लेरीने सिद्ध केले आहे. बिस्लेरीच्या भन्नाट जाहिराती नेहमीच लोकांच्या मनाचा ठाव घेतात. या बिस्लेरी कंपनीची स्टोरी पण वाचायला हवी अशीच आहे. आजच्या घडीला भारतातील ६०% मिनरल वॉटरचे मार्केट बिस्लेरीकडे आहे. हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता.

इटलीमध्ये एक उद्योजक राहत होते. हे उद्योजक असण्याबरोबर उद्योगी पण होते. व्यवसाय सांभाळताना विविध प्रयोग करत राहणे ही त्यांची आवड होती. एके दिवशी त्यांनी आयर्न सॉल्ट, सिंचोना नावाच्या झाडाची साल आणि औषधी वनस्पती(हर्ब्ज) एकत्र करून एक पेय तयार करायला घेतले. या उद्योजकांचे नाव होते, फेलिस बिस्लेरी! या पेय कंपनीचे नाव मग बिस्लेरीच झाले.

ही गोष्ट आहे खूप जुनी. अगदी १८५१ दरम्यानची. बिस्लेरींचे १९२१ ला निधन झाले आणि या कंपनीची मालकी ही बिस्लेरी यांचे मित्र डॉ. रोजी यांच्याकडे आली. या डॉ. रोजी यांचा एक मित्र या कंपनीचा कायदेशीर सल्लागारही होता. या वकिलाचा मुलगा खुशरू संतुक हा देखील वकीलच होता. भारतात बिस्लेरी आली ती या खुशरू संतुक यांच्यामुळे.

देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात अनेक नवे उद्योगधंदे उभे राहत होते. भारतात त्यावेळी पाणी टंचाई नसली तरी शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त होते. अशावेळी डॉ. रोजी यांचा उद्योगी मेंदू कामाला लागला. त्यांना मिनरल वॉटरसाठी भारतात भविष्य दिसत होते. या कामी मग त्यांनी खुशरू संतुक यांना जुंपले. १९६५ साल येता येता खुशरू संतुक यांनी ठाण्याला पहिला प्लांट उभा केला. ठाण्यातून आता बिस्लेरीच्या बाटल्या बाहेर पडायला लागल्या.

डॉ. रोजी आणि संतुक हे ठार वेडे झाले आहेत असे त्यावेळी लोकांना वाटत होते. कुणी पाणी विकते का? असे त्यांच्या या नव्या व्यवसायाबद्दल लोक म्हणत होते. पण या दोघांना मात्र आपल्या कामावर विश्वास होता. त्यांनी काम नेटाने सुरू ठेवले. मुंबईतील पाण्याची अवस्था त्यावेळी खूपच वाईट होती. हे निकृष्ट पाणी मुंबईकर तर पिऊन घेत. पण मुंबईत येणारे परदेशी पर्यटक किंवा श्रीमंत लोकांना बिस्लेरी म्हणजे मोठा आधार वाटायला लागला.

त्याकाळी बिस्लेरीचे पाणी बाटली आणि बिस्लेरी सोडा अशा दोन उत्पादनांच्या स्वरुपात उपलब्ध होते. पंचतारांकित हॉटेल्स आणि मोठी रेस्टॉरंटस् सोडली तर त्यावेळी बाहेर कुणाला बिस्लेरी दिसतही नसे. एवढ्याने कंपनी मोठी होत नाही हे रोझी आणि संतुक यांना ठाऊक होते. पहिला प्लांट पडल्यावर अवघ्या ४ वर्षांत कंपनी विकायला निघाली. ही बातमी पार्ले कंपनीच्या चौहान बंधूंना समजली. त्यांनी १९६९ साली अवघ्या ४ लाखांत बिस्लेरी कंपनी विकत घेतली.

पार्लेच्या जोडीने बिस्लेरीने हळूहळू हातपाय पसरण्यास सुरुवात केली. सोडा, कोल्ड्रिंक अशी प्रॉडक्टस् त्यांनी बाजारात आणली. आता बिस्लेरी हे नाव देशभर पसरले. त्यांनी मग कार्बोनेटेड आणि नॉन कॉर्बोनेटेड अशा दोन प्रकारची मिनरल वॉटर्स बाजारात सादर केली. यातून मिनरल वॉटर मार्केट वाढण्यास मदत होत गेली.

कंपनीकडून अनेक प्रोडक्ट आणली गेली. परिणामी बिस्लेरी हे नाव सर्वसामान्य लोकांना माहीत झाले. २००६ साली त्यांनी आपल्या बॉटलवरील लेबलचा रंग बदलला. निळा रंग जाऊन हिरवा रंग आला. पाणी विकणाऱ्या बहुतेक कंपन्यांची लेबल्स निळीच होती. आता या हिरव्या रंगामुळे निळ्या लेबल असणाऱ्या ब्रँडसपासून बिस्लेरीची बाटली वेगळी उठून दिसायला लागली. आता हजारो कंपन्या मिनरल वॉटर मार्केटमध्ये शिरल्या असल्या तरी आजही बिस्लेरी ६०% मार्केट काबीज करून आहे.

बिस्लेरीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि क्वालिटीसोबत तडजोड न करण्याची वृत्ती यामुळे आजही ब्रांड आघाडीवर आहे. बिस्लेरीने एक भारी आयडिया केली. जागा बघून किंमत ठेवायची. आज रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर मिळणारी बिस्लेरी आणि फाईव्ह स्टार हॉटेल, मल्टिप्लेक्स येथे मिळणारी बिस्लेरी यांच्या किमतीत मोठी तफावत असते. बिस्लेरी लोकांना कशी आपली वाटेल यासाठी पार्लेची एक टीम नेहमी संशोधन करण्यात गुंतलेली असते.

बिस्लेरीच्या जाहिरातीही आगळ्यावेगळ्या असतात, ज्याचा थेट फायदा त्यांना मार्केटमध्ये होतो. 'हर पाणी की बॉटल बिस्लेरी नही होती,' या जाहिरातीने लोकांच्या मनात बिस्लेरीच घ्यायला हवी हे समीकरण चांगलेच ठसवले. आज बिस्लेरीचे जगभरात १०३ प्लांटस् आहेत. २०२३ पर्यंत बिस्लेरीची मार्केट व्हॅल्यू ही ६० बिलियन डॉलर होईल असे सांगितले जाते. एक पाणी विकणारी कंपनी इतका महाकाय पैसा कमवू शकते हे बिस्लेरीने सिद्ध केले आहे.

डॉ. रोझी यांनी सुरुवात करून मिनरल वॉटर इंडस्ट्रीचा मोठा पाया भारतात घातला. पण लवकर हिंमत हरल्याने त्यांनी अवघ्या चार लाखांत कंपनी विकली. ही कंपनी आज किती महाकाय झाली हे जग बघत आहे. यावरून आपल्याला एखाद्या क्षेत्रात भविष्य दिसत असेल तर लवकर हिंमत न सोडणे अशी मोठी शिकवण मिळते. वास्तविक बिस्लेरीचा प्रवास, मार्केटिंग स्ट्रॅटेजी आणि त्यांचे यश हे कुठल्याही उद्योगधंद्यात उतरू पाहणाऱ्या व्यक्तीसाठी मोठी केस स्टडी ठरू शकते.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required