computer

उष्ण्तेची लाट नक्की कशावरुन ठरवतात? अशावेळी काय काळजी घ्यावी हे जाणून घ्या!!

मुंबई आणि ठाण्यात पुढील २ दिवस हिट व्हेव म्हणजेच उष्णतेची लाट असेल असेल असे भारतीय वेधशाळेकडून सांगण्यात आले आहे. आता ही उष्णतेची लाट नेमकी काय असते आणि त्यावर काय उपाय योजावा हे यानिमित्ताने थोडे सविस्तर समजून घेणे आलेच. हे आताच समजून घ्या, जेणेकरून पुढील दोन दिवस नाहीतर पूर्ण उन्हाळा थोडा कमी त्रासदायक करता येईल.

उष्णतेची लाट ही फक्त उकाडा किंवा उष्मा अधिक जाणवायला लागला म्हणून घोषित होत नाही. जेव्हा सामान्य भागातील तापमान ४० अंश सेल्सिअस आणि डोंगरी भागातील तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले जाऊ लागते, तेव्हा उष्णतेची लाट आली आहे असे समजले जात असते.

सामान्य तापमानापेक्षा ४.५ - ६.४ अंश इतकी वाढ जेव्हा तापमानात दिसून येते तेव्हा उष्णतेची लाट आली असे समजायला हरकत नाही. भारतात ही लाट येण्याचा कालावधी हा मार्च ते जून हा असतो. यावर्षी मार्चमध्येच ही लाट घोषित करण्यात आली आहे. मे हा सर्वाधिक कठीण महिना समजला जातो. आता मार्चमध्येच ही परिस्थिती असेल तर यावर्षी मे मध्ये काय होईल याची नुसती कल्पनाच केलेली बरी.

राजस्थान आणि विदर्भ हे अति उष्णतेचे विभाग समजले जातात. पण महाराष्ट्र आणि देशातील इतरही अनेक प्रदेश या लाटेच्या फेऱ्यात अनेकदा येताना दिसतात. जसे सध्या मुंबई ठाण्यात सुरू आहे. या अति उष्णतेच्या भागात मे महिन्यात ४५ अंश सेल्सिअस तापमान सर्वसामान्य होऊन गेलेले असते.

या सर्वांची नोंद घेण्यासाठी इंडियन मॅटोरोजिकल डिपार्टमेंट म्हणजेच भारतीय वेधशाळा ही संस्था कार्यरत आहे. तापमान, आर्द्रता, दाब, वाऱ्याचा वेग अशा गोष्टींवरून ही संस्था उष्णता लाट आणि इतर गोष्टी ठरवते. वेधशाळेकडून तापमानाचे एक दिवस ते तीन महिन्यांपर्यंत अंदाज घोषित केले जात असतात.

आता या उष्णतेच्या लाटेचेही विविध प्रकार असतात. ते हिरव्या, पिवळ्या, नारिंगी आणि लाल रंगांनी दर्शवले जातात.

यात हिरवा पट्टा म्हणजे सर्वकाही व्यवस्थित आहे,

तर पिवळा पट्टा म्हणजे दोन दिवस उष्णतेची लाट असते आणि यात ज्यांना काही आजार आहेत किंवा वृद्ध गर्भवती यांना याचा धोका आहे असा असतो.

ऑरेंज अलर्ट म्हणजेच केशरी/नारिंगी इशारा म्हणजे येणारी उष्णतेची लाट ही ४ दिवस टिकते.यात मेहनतीचे काम करणाऱ्या लोकांना याचा धोका संभवत असतो.

रेड अलर्टचा अर्थ हा ६ दिवस उष्णता लाट टिकेल हा असतो. यात उष्माघात किंवा अतिउष्णतेमुळे होणाऱ्या रोगांची शक्यता. रेड अलर्ट म्हणजे लोकांनी मोठ्या प्रमाणावर सावधान असावे असाच अर्थ असतो.

या उष्णता लाटेमुळे लोक अधिक आजारी पडतात. अशक्तपणा, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या यामुळे उदभवताना दिसतात. आता यातून वाचण्यासाठी जर आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर मोठा त्रास वाचू शकतो.

या काळात सहसा दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर पडू नये. जास्तीतजास्त पाणी प्यावे, अगदी तहान लागलेली नसेल तरी. प्रवासातही पाणी सोबत ठेवावे. हलक्या रंगाचे आणि थोडे सैलसर कपडे घालून वावरावे. टोपी किंवा छत्री घेऊन बाहेर पडल्यास उत्तम.

या काळात जर कुणी उन्हामुळे आजारी पडला असेल तर त्याला थंड ठिकाणी कसे नेता येईल ते बघावे, कपडे सैल करावेत. हळूहळू पाणी पाजावे जेणेकरून उन्हाची तीव्रता कमी होईल. यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वेधशाळेचे अपडेट बघण्यासाठी टीव्ही किंवा नेटवर उष्णता लाटेबद्दल माहिती घेत राहिल्यास आपल्याला पुरेशी काळजी घेण्यास मदत मिळते.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required