computer

रोज १०,००० पावले चालण्याचे फायदे तर जाणून घ्या आणि चालायला सुरवातही करा!!

निरोगी आयुष्य जगण्यासाठी व्यायामाचे महत्त्व खूप आहे. आजकाल सगळेजण आपल्या तब्येतीला जपतात, मग भले प्रत्येकाच्या व्यायामाच्या पद्धती वेगळ्या का असेनात. कोणाला चालण्याचा व्यायाम आवडतो, कोणाला योगा, झुंबा, जिम तर काही जणांना एखादा मैदानी खेळ खेळायला आवडतो. यातला कुठला प्रकार चांगला हे सांगणे अवघड आहे, पण चालण्याचा व्यायाम हा साधा, सोपा आणि सहज करण्यासारखा व्यायाम!! त्यात १०,००० पावले चालणे सर्वात आरोग्यदायी मानले जाते. मग आज आपण पाहूयात की रोज १०,००० पावले चालण्याचा फायदा काय? चालणे चांगले की इतर व्यायाम चांगला? रोज अर्धातास व्यायाम करण्याचा पर्याय कोणासाठी चांगला? दोन्ही पर्याय कश्याप्रकारे उपयोगी पडतात हे समजून घेऊयात.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार निरोगी आणि सशक्त राहण्यासाठी आठवड्यातून १५० मिनिटे व्यायाम करणे गरजेचे असते. त्यातही मध्यम आणि उच्च-तीव्रतेच्या दोन्ही प्रकारच्या व्यायामाची शिफारस केली जाते. दर आठवड्याला किमान पाच दिवस ३० मिनिटे व्यायाम करण्यामुळे तुम्हाला तब्येत चांगली राखणे सोपे जाईल. आणि व्यायामामुळे शरीर लवचिक बनते हा जादाचा फायदा तर आहेच.

 

रोज १०,००० पावले चालण्याचा व्यायाम हा कुणालाही करता येतो. म्हणजे पाहा, समजा एखाद्याकडे वेळ नसेल किंवा आजारी असल्यामुळे तो व्यायाम करू शकत नसेल, वयोवृध्द माणसं किंवा जर डॉक्टरांनी तरा सल्ला दिला असेल तर त्यांच्यासाठी नक्कीच चांगला आहे. या व्यायामाचे मुख्य उद्दिष्ट शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणे हेच आहे. बैठ्या जीवनपद्धतीमुळे अनेक आजार जडतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल नियमितपणे केल्याने तुमचे एकंदर आरोग्य सुधारते आणि तुमचे वजन कमी करण्यात/वजन राखण्यातही मदत होते.

दररोज १०,००० पावले चालणे हा नियमितपणे करण्याजोगा सोपा व्यायाम आहे. जवळच्या अंतरावर चालणे, कुत्र्यासोबत फिरणे, मुलांसोबत खेळणे यामुळे हे उद्दिष्ट सहज पूर्ण होते. त्यामुळे तुम्ही उत्साही आणि प्रेरित राहता. याचे आरोग्याला फायदे खूप आहेत. हे तुमचे सांधे निरोगी ठेवण्यास मदत करते आणि संधिवात आणि इतर हाडांशी संबंधित समस्यांसारखे आजार होण्याचा धोका कमी करते.

घराबाहेर चालण्यामुळे मेंदूच्या पेशींना उत्तेजित होतात. त्यामुळे आकलनशक्ती, एकाग्रता सुधारण्यास मदत होते. आणि तणाव कमी करण्याचा तर हा एक सर्वात उत्तम मार्ग आहे.

तुम्ही जर brisk walking म्हणजेच वेगाने चालणे आणि जॉगिंग करून तुमचे १०,००० पावले चालण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले तर तुमचे वजन कमी होण्यास देखील मदत होऊ शकते.

रोज अर्धा तास व्यायाम करण्याचेही फायदे आहेतच. जीवनशैली जास्त सक्रिय असणाऱ्या लोकांना म्हणजे बाईकर्स, खेळाडू यांना उच्च तीव्रतेचे वर्कआउट आवश्यक आहेत. तरुण खेळाडू किंवा ज्यांना शरीर कमवायचे आहे त्यांच्यासाठी उच्च तीव्रतेचे व्यायाम चांगले ठरतात.

खरंतर चालणे आणि व्यायाम या दोन गोष्टी एकत्र करणे हे सर्वात चांगले आहे. तुम्ही आठवड्यातून एक दिवसाआड चालणे आणि व्यायाम करणे निवडू शकता. त्यानंतर तुम्ही एक दिवस साध्या स्ट्रेचिंगसाठी आणि एक दिवस विश्रांतीसाठी ठेवू शकता. त्यामुळे एकाच प्रकारचा व्यायाम करायचा कंटाळा येत नाही. आणि उत्साह कायम राहतो.
कमी-ते-मध्यम तीव्रतेच्या कार्डिओ व्यायामप्रकारात चालणे, पोहणे, सायकलिंग हेही व्यायाम येतात.

"Health is wealth" त्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरतेच.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required